Tarun Bharat

शिवसेनेचे आक्रमक राजकारणाचे संकेत

खासदार संजय राऊत यांच्या संपर्क दौऱ्यानंतर ‘आमचं ठरलंय’च्या बेडीतून सुटेल

Advertisements

कोल्हापूर /संतोष पाटील

विधानसभा निवडणुकीत भाजपसह दोन्ही काँग्रेसचा सामना शिवसेनेला करावा लागणार आहे. सर्वच निवडणुकांत दोन्ही काँग्रेससोबत समझोता केल्यास शिवसेनेची ताकद असलेल्या सहा तालुक्यातील नेत्यांची विधानसभा निवडणुकीत गोची होणार हे स्पष्ट आहे. उत्तर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने घेतलेली माघार, त्यानंतर केलेली मदत आणि जिल्हाप्रमुख संजय पवार यांना राज्यसभेची दिलेली उमेदवारी हे टायमिंग साधत खासदार संजय पवार यांनी जिह्यातील सेना नेत्यांचे ‘आमचं ठरलंय’चे राजकीय ऋणानुबंधाचे पाश तोडण्याचा प्रयत्न केला. नुसत आमचं ठरलंय असे म्हणणाऱयांना घरी बसवू असे व्यासपीठावर टाळ्या घेणारे भाषण करुन सेनेला गतवैभव मिळणार नाही. तर शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा खांदा का घ्यावा लागत आहे, याचेही सिंहावलोकन करण्याची गरज आहे.

शिवसेनेला डावलून जिह्यात दोन्ही काँग्रेसला राजकारण करता येणार नाही. आमचं ठरलंय म्हणत पडद्यामागे राजकारण यापुढे बंद करा, असा सुचक इशारा देत शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेची यापुढील वाटचाल आक्रमक राजकारणाची असेल असे स्पष्ट केले आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांत महाविकास आघाडीच्या पंगतीत सन्मानाने स्थान मिळवण्याचा सेनेचा प्रयत्न असणार आहे. यापूर्वीच गटा-तटात विभागलेली जिह्यातील शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राजकारणात बळीचा बकरा होऊ नये याची काळजी घेतली जाईल. तालुक्यासह संस्थात्मक निवडणुकीत आपला गड राखण्यासाठी आमचं ठरलंयच्या चक्रव्युहात अडकलेली सेना खरच यातून बाहेर पडेल काय हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे आपल्या पद्धतीने जिह्याला राजकीय हवा देत असल्याने याला शह देण्यासाठी खासदार संजय मंडलिक यांनी सर्वात प्रथम आमचं ठरलंय याला भेद देत जिल्हा बँकेत सवता सुभा मांडला. जिह्यातील राजकारणात दोन्ही कॉग्रेसकडून शिवसेनेला गृहीत धरुनच वाटचाल सुरू असल्याची खदखद शिवसेनेत होती. तालुक्यातील राजकारण करताना भविष्यात दोन्ही काँग्रेसशी एकहात करावे लागणार आहे. या विचारातून शिवसेना जिल्हा बँकेच्या राजकारणात सवता सुभा मांडला. शिवसेनेची ही डरकाळी गटाच्या राजकारणात उठ्ठे काढण्यासाठी होती. मागील पाच वर्षात महापालिकेत तसेच मागील जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत सेना दोन्ही काँग्रेसच्या मागून जावे लागले. उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेने निवडणूक रणांगणातून माघार घेतली. कधी काळी जिह्यातील सहा आमदार असणारी सेना आता एकावर आली. सेनेचे जिह्यात दोन खासदार असले तरी संस्थापक ताकद गटा-तटात अडकली आहे.

सेना बॅकफुटवर का गेली?

अतिशय जलद आणि आक्रमक राजकीय खेळी करणारे म्हणून पालकमंत्री सतेज पाटील परिचित आहेत. आमचं ठरलंय असे सांगत लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील काँग्रेस-राष्ट्रवादीची युती असूनही विरोधी आघाडीच्या तत्कालीन शिवसेना उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना पाठबळ दिले. संजय मंडलिक यांच्या विजयात सतेज पाटील यांचा सिंहाचा वाटा होता हे कोणीही नाकारु शकत नाही. जिह्यात शिवसेनेची घटलेली ताकद ही जिह्यातील नेत्यांची अंतर्गत लाथाळ्या आणि गटातटाच्या राजकारणाचा परिपाक आहे. संस्थात्मक राजकाणात वेगळी भूमिका, तालुकास्तरावर सवता सुभा, विधानसभेला स्वाभिमानाची गर्जना, असे अनेक राजकीय रंगाचा पेहरावा केल्यानेच शिवसेना जिह्यात बॅकफुट गेली. शिवसेनेचे अनेक तालुक्यातील राजकारण पक्षीय परिघाबाहेर जाऊन गटातटाच्या पाठिंब्यावर आले आहे. पक्षीय राजकारणाला विकासकामांचा मुलामा दिला तरच शिवसेना आमचं ठरलंय सारख्या ऋणानुबंधातून बाहेर पडू शकेल.

यासाठीच संजय राऊतांचा इशारा

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत शिवसेनेने झगडून अधिकच्या जागा पदरात पाडून घेतल्या. गोकुळमध्ये खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र विरेंद्र मंडलिक यांचा आश्चर्यकारकरित्या पराभव झाला. जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची शासननियुक्त संचालकपदी निवड होऊनही संघातील एन्ट्री रोखली होती. जिल्हा परिषद अध्यक्षपदी राहुल पाटील यांच्या निवडीत शिवसेनेने साथ दिल्यानंतरही पदाधिकारी निवडीत डावलले गेल्याची शिवसेनेची भावना आहे. महापालिकेच्या राजकारणात दोन्ही काँग्रेसला शिवसेनेने मदत केली. दोन खासदार निवडून येऊनही विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात फासे उलटे पडले. येत्या महापालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेस नुरा कुस्ती खेळून शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवतील अशी भिती शिवसैनिकांत आहे. पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे मातोश्रीवर असलेल्या संबंधांचा वापर करत जिह्यातील शिवसेना नेत्यांनी आणलेले आदेश पुन्हा फिरवत असल्याची खदखद शिवसेना पदाधिकाऱयात आहे. दोन्ही काँग्रेसची साथ आहे म्हणून नव्हे तर शिवसेनेचे जिह्यात स्वतंत्र स्थान आहे. शिवसेनेच्या पक्षांतर्गत आणि बाहेरील राजकीय कुरघोडय़ांचा परिणाम पक्षीय ताकदीवर होऊ नये याची दखल मातोश्रीवर घेतली जाणार असल्याचे संकेत दोन्ही काँग्रेसह शिवसेनेच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याची व्यवस्था खासदार संजय राऊत यांनी कोल्हापुरात संपर्क मेळाव्यातून केली.

जिल्हा परिषद सत्तेचा मार्ग या तालुक्यातून जातो

जिह्यातील बारा पंचायत समितीमध्ये 144 सदस्यांपैकी तब्बल 65 सदस्य व जिल्हा परिषदेच्या 67 पैकी 30 सदस्य करवीर, हातकणंगले व शिरोळ या शिवसेनेची ताकद असलेल्या तालुक्यातून येतात. शहरात भाजपचा वाढलेला मतांचा टक्का शिवसेनेचे लक्ष वेधत आहे. महापालिका निवडणुकीत ताकद दाखवायची आहे. मागील महापालिका निवडणुकीत सेनेचे 20 उमेदवार थोडक्या मतांत पडले होते. याठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीची खेळी सरस ठरली होती. महापालिका आणि जिल्हापरिषद सभागृहात सेनेला सन्मानाने दोन्ही काँग्रेसच्या पंगतीला बसायचे आहे. तर मागील विधानसभेतील सहा आमदार ही सुज नव्हे ताकदच होती हे सिध्द करायचे आहे.

Related Stories

केडीसीसीच्या मोबाईल बँकिंग व अद्यावत वेबसाईटचा आज शुभारंभ

Abhijeet Shinde

कोल्हापूर : मंडळांना 4 फुटापर्यंत गणेशमूर्तींना परवानगी

Abhijeet Shinde

कोल्हापुरात कोरोनाने वृद्धाचा मृत्यू, नवे रूग्ण 15, कोरोनामुक्त 5

Abhijeet Shinde

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचा ‘विश्वासघात’-महाराष्ट्र राज्य किसान सभेचा आरोप

Sumit Tambekar

कोल्हापुरात पर्यटक आणि भाविकांना फटका; रणरणत्या उन्हात बोचणाऱ्या खडीतून दर्शनासाठी पायापीठ

Archana Banage

पेरणी साधण्यासाठी कुरीचे ‘ जू ‘ तरुणांच्या खांद्यावर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!