Tarun Bharat

शिवसेनेत बंड, सरकार धोक्यात?

सेनानेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची सुरतेहून ‘स्वारी’

हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपसोबत जाण्याचे ठाकरेंना आवाहन

प्रतिनिधी/ मुंबई, सुरत

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी दूत पाठवले आहेत. तथापि एकनाथ शिंदे यांनी ‘हिंदुत्वाच्या मुद्यावर मविआला सोडचिठ्ठी देण्यासह भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची’ अटच घातली आहे. त्यामुळे सत्ताधारी हतबल झाल्याचे चित्र आहे. तर मविआचे चालक-पालक शरद पवार यांनी हा शिवसेनाचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगत सरकार पडल्यास विरोधी पक्षात बसण्याची तयारी दर्शवली आहे. सध्या ते दिल्लीत असले तरी तातडीने मुंबईला रवाना झाल्याचे वृत्त आहे. या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या आमदारांना दिल्लीला पाचारण केल्याचे म्हटले जात आहे. दिवसभरातील वेगवान घडामोडीनंतर भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्या मध्यस्थीने एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट होण्याची शक्यता रात्री उशिरा वर्तवली जात होती. एकूण वर्षातील सर्वात मोठा दिवस असलेल्या 21 जून रोजी राज्यातही मोठमोठय़ा घडामोडी घडल्याने मोठा विचित्र योगायोग झाल्याचे समोर आले आहे.  दिवसभरात या घडामोडी घडत असताना वर्षा, मातोश्रीसह विविध ठिकाणी बैठकांवर बैठक झडत होत्या. राज्यसभेतील मविआ उमेदवाराच्या पराभवानंतर शिवसेना आणि मविआतील बेबनाव हळूहळू उघड होत होता.  

आमदारांच्या आग्रहाखातरच आपण विधान परिषदेसाठी पाचवा उमेदवार देत असल्याचे सांगितले होते. या नाराज आमदारांना एक प्लॅटफॉर्म देत असून ते सरकार, मुख्यमंत्री आणि एकूणच धोरणाविरोधात नाराज असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. तथापि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी फारसे प्रयत्न केले नसल्याचे या घटनेमुळे स्पष्ट झाले आहे. या घटनाक्रमामुळे भाजपसाठी पोषक आणि उपयुक्त वातावरण झाल्याचे दिसत असले तरी सध्या त्यांनी वेट ऍण्ड वॉचची भूमिका दिसत आहे.

मंगळवारचा दिवस उजाडला तोच ‘एकनाथ शिंदे नॉटरिचेबल असल्याच्या आणि त्यांच्या मोबाईलला गुजराती टय़ून ऐकू येत असल्याच्या’ वृत्ताने. आपल्या समर्थक आमदारांसह ते गुजरातमध्ये असल्याचेही दुपारच्या दरम्यान स्पष्ट झाले. ते भाजपच्या छावणीमध्ये दाखल झाल्याचे समजल्यानंतरही डॅमेज कंट्रोलची भूमिका घेण्याऐवजी शिवसेनेच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटनेते पदावरुन हकालपट्टीचे वृत्त आले आणि बंडावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले. या निर्णयामुळे शिंदे यांच्या परतीचे दोर शिवसेनेनेच कापल्यासारखे झाले आणि त्यांना पूरक अशी भूमिका घेतल्याची चर्चा सुरु झाली. गटनेतेपदावरुन दूर केल्याचे समजताच एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ‘आपण बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचे शिवसैनिक असून सत्तेसाठी हिंदुत्वाशी प्रतारणा करणार नाही’ असे ट्विट केले. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा उल्लेखही न केल्याने शिवसेनेमध्ये फूट पडणार हेही स्पष्ट झाले. त्याचबरोबर शिवसेनेलाच जय महाराष्ट्र करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे आणि सरकारला धोका निर्माण झाल्याची कल्पना येताच उद्धव ठाकरे यांनी तातडीने मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांना सुरतमध्ये चर्चेसाठी पाठवले. त्याचबरोबर आक्रमक भूमिका घेत शिवसैनिकांना सेनाभवनासमोर जमण्याचे आदेश दिले. सायंकाळनंतर गर्दी वाढू लागली आणि शिंदे यांच्या विरोधातील घोषणांनी वातावरण तप्त झाले. खबरदारी म्हणून मुंबईत असणाऱया आमदारांची तातडीने बैठक बोलावली. या बैठकीला 27 आमदार उपस्थित असल्याची माहिती शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली. तसेच मुंबईत असलेल्या शिवसेना समर्थक आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये सुरक्षित ठिकाणी हलविल्याचे सांगितले.

शिंदेंमधील धर्मवीर जागृत

‘गर्व से कहो हम हिंदू है’ असा मंत्र देणाऱया बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्वविरोधी पक्षांबरोबर आघाडी करणे आणि त्यांच्याबरोबर राहून शिवसेनेने हिंदुत्वाचा वफथा अभिमान बाळगणे एकनाथ शिंदे यांना पसंत नव्हते. त्यामुळे त्यांची पक्षात घुसमट होत होती. मुख्यमंत्री शिवसेनेचा असतानाही पक्षाच्या आमदारांना पुरेसा निधी मिळत नव्हता. त्यामुळे त्यांची तक्रार होती. मात्र मुख्यमंत्रीच स्वपक्षीय आमदारांना भेटत नसल्याने आपली व्यथा सांगायची कुणाकडे, अशी अनेक आमदारांची तक्रार होती. अर्थसंकल्प अधिवेशनात काही आमदार मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले असता भेट होऊ शकली नाही. त्यामुळे गटनेते या नात्याने त्यांनी शिंदे यांची भेट घेतली होती. त्यापूर्वी कोरोना आणि आजारपणामुळे मुख्यमंत्र्यांची भेट घेणे कोणालाही शक्य होत नव्हते. त्यानंतरही मुख्यमंत्री भेटत नाही म्हणून ओरड करता येत नव्हती. त्यामुळे आमदारांची घुसमट होत होती. त्याला या बंडामुळे वाचा फुटली आहे.

बेबनाव झाला उघड

राज्यसभा निवडणुकीतील पराभवही शिंदे यांच्या जिव्हारी लागला होता. छत्रपती संभाजीराजे यांना शिवसेना पुरस्कृत उमेदवारी दिली असती तर इतरांची मते मिळून ते विजयी झाले असते आणि शिवसेनेचा लौकिक अधिक वाढला असता. पण झाले उलटेच. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार उभे राहिले आणि शिवसेनेच्या एका उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला. महाविकास आघाडीची मते भाजप उमेदवाराला जाऊन त्यांच्या उमेदवाराला शक्य नसलेला विजय मिळाला. महाविकास आघाडीतील बेबनाब तेथेच थांबला नाही तर विधान परिषदेत त्याची प्रचिती आली. राज्यसभा निवडणुकीपासून दिसलेला महाविकास आघाडीचा बेबनाव विधान परिषद निवडणुकीत अधिक प्रकर्षाने दिसून आला आणि त्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सहकाऱयांसह बंडखोरीचे पाऊल उचलले.

‘धर्मवीर’नंतर ठाकरे-शिंदेंमध्ये विसंवाद

धर्मवीर चित्रपटातील आनंद दिघे आणि राज ठाकरे यांच्या भेटीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या हॉस्पिटलमध्ये भेटीतही हिंदुत्वावरील संवाद पुढे जाऊन शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील विसंवादाचा ठरला. तेव्हापासून शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील दरी वाढत गेली. त्यातच भर म्हणून राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेपासून शिवसेनेच्या नेतफत्वाने शिंदेंना डावलले. ती सलही शिंदेंच्या मनात राहिली आणि हा विसंवाद वाढतच गेला.

विधान परिषदेच्या वादळाने शिवसेनेची फरफट

राज्यसभा निवडणुकीतील निकालाने राज्यात वादळ येण्याची सूचना दिली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेल्यानंतर विधान परिषद निवडणुकीत हे वादळ आले आणि शिवसेनेत मोठा गोंधळ माजवून गेले. विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान सुरु असतानाच शिवसेनेतील बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे विधानभवनाबाहेर पडले ते पुन्हा परत आलेच नाहीत. त्यांनी काही आमदारांसह सुरत गाठले. त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे विदेशात गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर मात्र विधान परिषद निवडणुकीतील निकालाने शिवसेनेतील बंडावर शिक्कामोर्तब झाले. तर दिवसभर या वादळाचे पडसाद उमटत राहिल्याने शिवसेनेची फरपट होत असल्याचे समोर आले आहे.

मविआतील घुसमटीचा स्फोट

विधान परिषदेच्या निवडणुकीत राज्यसभेप्रमाणे भाजपने करिष्मा दाखवला. भाजपचे त्यांच्या मतांच्या गणिताप्रमाणे चार उमेदवार निवडून येणार होते. मात्र त्यांनी पाच उमेदवार उभे केले. शिवाय सदाभाऊ खोत यांच्या रूपाने भाजपने एक अपक्ष पुरस्कृत उमेदवार उभा केला. मात्र एकूण मतांची मांडणी करून सहावा उमेदवार निवडून येणार नाही असे दिसताच भाजपने सदाभाऊ खोत यांचा अर्ज मागे घेतला आणि पाच उमेदवार देऊन महाविकास आघाडीपुढे आव्हान उभे केले. भाजपचे हे आव्हान महाविकास आघाडीच्या पडझडीस आणि शिवसेनेच्या बंडाळीस कारणीभूत ठरले आहे. भाजपला 20 मते अधिक मिळाली आहेत. ती मते शिवसेना, काँग्रेस यांची आहेत. त्यामुळे शिवसेनेची आणि काँग्रेसची मतेही भाजपकडे गेली. महाविकास आघाडीत जी घुसमट होती तिचा स्फोट झाला. गुप्त मतदानामुळे शिवसेना आणि अन्य नाराज आमदारांनी भाजपला साथ दिल्याचे स्पष्ट होताच शिवसेनेतील नाराजी उफाळून आली. परिणामी 56 आमदार असलेल्या शिवसेनेतील 20 आमदारच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर मातोश्रीवर दाखल झाले.

नार्वेकर, फाटक खास दूत

वर्षावर टप्प्याटप्प्याने आमदार दाखल होत असताना उद्धव ठाकरे यांनी काही मोजक्या पदाधिकाऱयांबरोबर बैठक घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळ असणारे परंतु एकनाथ शिंदे यांचे सहकारी रवींद्र फाटक यांच्यामार्फत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्र्यांचा खास निरोप पाठवून त्यांचे मन मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते. त्याचवेळी भाजपचे आमदार संजय कुटे आणि अन्य वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी सुरतला गेले होते.

भाजपचे वेट ऍण्ड वॉच

शिवसेनेतील बंडाळीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी उपयुक्त वातावरण निर्माण होऊनसुद्धा केवळ वेट ऍण्ड वॉच हीच भूमिका भाजप नेत्यांनी व्यक्त केली आहे. सरकारच्या स्थापनेपासून ते पडण्याची वक्तव्ये करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही कोणतीही टोकाची प्रतिक्रिया दिलेली नाही. शिवसेनेतील बंडाळी हा त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे. त्यावर आपण काहीही बोलणार नाही, असे म्हटले आहे. कदाचित दोन वर्षांपूर्वी झालेला पहाटेचा शपथविधी आणि दोन दिवसातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावा लागलेला राजीनामा या घटना ताज्या आहेत. त्यामुळे भाजप नेतेही सावध भूमिका घेत असावेत, असे म्हटले जात आहे. म्हणूनच सरकार बनवायला आवडेल, पण त्याची आम्हाला घाई नाही. सध्यातरी आमची भूमिका वेट ऍण्ड वॉचची राहील, असे चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

गुजरातमध्ये तहाची बोलणी

एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरुन हकालपट्टी करणाऱया शिवसेनेने दुसरीकडे त्यांच्या मनधरणीचेही प्रयत्न चालवले आहेत. सुरतमधील हॉटेल मेरेडियनमध्ये तळ ठोकलेल्या शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांची नियुक्ती केली आहे. सुरतेमध्ये आश्रय घेतलेल्या शिंदे यांच्या दिमतीला भाजपच्या गुजरात शाखेने तगडा बंदोबस्त दिला आहे. मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन नार्वेकर आणि फाटक पोहोचले खरे, परंतु त्यांना तिथे मोठय़ा सुरक्षा यंत्रणेला सामोरे जावे लागले. तब्बल पाऊण तासांच्या प्रतीक्षेनंतर या दोघांची शिंदे यांच्याशी भेट झाली. या तिघांची जवळपास एक तास चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या या दोन दूतांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.

मुख्यमंत्र्यांसह रश्मी ठाकरेंशीही चर्चा

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरुन शिंदे यांनी चर्चा केली. परंतु शिंदे यांनी मविआमध्ये शिवसेनेने राहू नये, असा स्पष्ट संदेश दिला. भाजपशी शिवसेनेने युती केल्यास पक्षात राहू, असेही त्यांनी सांगितले. रश्मी ठाकरे यांच्याशी बोलताना शिंदे यांनी दीर्घकाळापासूनची आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. आमच्या भावना समजून घ्या, मविआमध्ये कोणताही समन्वय नाही. पक्षाचे आमदार, मंत्र्यांना विचारले जात नाही. पक्ष मूळ विचारधारेपासून भरकटला आहे. लोकांचीही नाराजी आहे, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या.

रश्मी ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर शिंदे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशीही चर्चा केली. आपणासाठी मी गेल्या 24 तासात एवढा वाईट झालो का? अशी विचारणा केली. आपण कोणत्याही पक्षाशी चर्चा केली नाही, कोणत्याही कागदावर सहय़ा केल्या नाहीत, मग गटनेतेपदावरुन हकालपट्टी कशासाठी? अशी विचारणा केल्याचे समजते.

Related Stories

लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अटकेत

datta jadhav

जम्मूमध्ये कडेकोट बंदोबस्तात भारत जोडो यात्रा

Patil_p

रशिया- युक्रेन : सायबर युद्ध

Patil_p

तीन राजधान्यांची योजना आंध्रकडून मागे

Patil_p

शरद पवारांच्या भेटीसाठी प्रशांत किशोर ‘सिल्व्हर ओक’वर दाखल

Archana Banage

फेनाई, रिगन चेन्नीयन एफसीशी करारबद्ध

Patil_p
error: Content is protected !!