शिवरायांवरील इंग्रजीतील पहिले पुस्तक : लेखक डॉ. बाळकृष्ण यांचे अप्रतिम लेखन : लष्करी जवानांना युद्धनीतीचे धडे : इंद्रजित सावंत यांची पुनर्प्रकाशनाची संकल्पना यशस्वी
प्रतिनिधी / कोल्हापूर
युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराजांवरील इंग्रजी भाषेतील पहिले पुस्तक शिवाजी द गेट' लिहण्याचे महान कार्य डॉ. बाळकृष्ण यांनी केले. संस्थानकाळात राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य असणाऱ्या डॉ. बाळकृष्ण यांनी 1936 साली शहाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास इंग्रजी भाषेतून जगापुढे आणला. त्यांच्यामुळे शिवरायांचे कार्य, शौर्य आणि कर्तृत्व देश-विदेशात सर्वदूर पोहचले. डॉ. बाळकृष्ण यांच्या निधनानंतर त्यांनी लिहिलेले पुस्तक इतिहास अभ्यासक, संशोधक वगळता इतरांच्या विस्मरणात गेले. पण 2016 मध्ये या पुस्तकाचे पाच खंडात पुनर्प्रकाशन झाले आणि आज देशातील प्रत्येक विद्यापीठांबरोबरच भारतीय लष्कराची प्रभावी रेजिमेंट असणाऱ्या मराठा रेजिमेंटच्या सर्व युनिटमध्ये
शिवाजी द गेट’ हे पुस्तक भारतीय जवानांना ऊर्जा देत आहे.
सध्या पाकिस्तानमध्ये असणाऱ्या मुल्तानमध्ये 22 डिसेंबर 1882 या दिवशी जन्मलेल्या डॉ. बाळकृष्ण यांच्या अभ्यासू लेखणीतून `शिवाजी द गेट' पुस्तकाचा जन्म झाला. अर्थशास्त्राचे प्रोफेसर असणाऱ्या डॉ. बाळकृष्ण यांनी लंडन विद्यापीठातून त्याकाळी पीएचडी केली होती. पुढे तेथे कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात प्राचार्य म्हणून आले. त्याकाळी राजर्षी शाहू महाराजांचे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज कोल्हापूर संस्थानचे अधिपती होते. त्यांनी डॉ. बाळकृष्ण यांना प्रोत्साहन दिले. डॉ. बाळकृष्ण यांनी राधानगरीतील `कृष्णपुंज' बंगल्यात `शिवाजी द गेट' पुस्तक लिहिले. त्यांच्या विषयी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत सांगतात, या पुस्तकाचे चार खंड आहेत. पहिला खंड हा शहाजी महाराजांवर आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या खंडात शिवाजी महाराजांचा सहआधार इतिहास आहे. चौथा खंड शिवचरित्राचे रसग्रहण आहे. डॉ. बाळकृष्ण यांनी शहाजी महाराजांचा उल्लेख `द किंगमेकर' असा केला आहे, तर राजमाता जिजाऊंना त्यांनी शिवरायांच्या प्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड असे म्हटले आहे. शिवाजी द मॅन अँड हिज वर्क, शिवरायांचे प्रशासन, लष्करी, युद्ध नीतीवर लेखन केलेल्या डॉ. बाळकृष्ण यांनी शिवचरित्र लिहिताना इतिहासातील साधने, दुर्मीळ कागदपत्रे, ग्रंथ यांचा किती बारकाईने अभ्यास केला असेल, याची कल्पना येते, असे इंद्रजित सावंत सांगतात.
`शिवाजी द गेट’ चे 2016 मध्ये पुनर्प्रकाशन
डॉ. बाळकृष्ण यांचे 21 ऑक्टोबर 1940 रोजी निधन झाले. त्याच काळात छत्रपती राजाराम महाराजही कालवश झाले. पुढे शिवाजी द गेट' पुस्तक इतिहासाचे अभ्यासक वगळता इतरांसाठी विस्मरणात गेले. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी या पुस्तकाचे पुनर्प्रकाशन करण्याचा निर्णय घेतला. 2016 मध्ये शिवाजी द ग्रेटचे पाच खंडात नव्या रूपात प्रकाशन झाले. पाचव्या खंडात सावंत यांनी 144 पृष्ठाचे संपादकीय लिहिले आहे. या पुस्तकाच्या हजारो प्रतींची विक्री झाली आहे. तत्कालिन पालकमंत्री आणि भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारामुळे
शिवाजी द गेट’ देशातील प्रत्येक विद्यापीठात पोहचले आहे. इतिहासाच्या विद्यार्थ्यांसाठी ते मार्गदर्शक ठरले आहे.
मराठा रेजिमेंटला प्रेरणा आणि ऊर्जा
4 फेब्रुवारी 2019 रोजी मराठा रेजिमेंटला 250 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने बेळगावच्या मराठा रेजिमेंटमध्ये व्ही युनियन कार्यक्रम होणार होता. यावेळी गोविंद कालवट कमांडर होते. कार्यक्रमाला येणाऱ्या देशभरातील मराठा रेजिमेंटच्या आजी माजी अधिकाऱयांसह रेजिमेंटच्या युनिटला वेगळी भेटवस्तू देण्याचे त्यांचे नियोजन होते. त्यांचा कोल्हापूरच्या `शिवगर्जना’ या महानाटÎाचे निर्माता, दिग्दर्शक स्वप्निल यादव यांच्याशी संपर्क झाला. चर्चेत कालवट यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील अस्सल अशा इंग्रजीतील पुस्तकाविषयी विचारणा केली.
यादव यांनी इंद्रजित सावंत यांनी पुनर्प्रकाशित केलेल्या डॉ. बाळकृष्ण यांच्या शिवाजी द गेट' या पुस्तकाची माहिती दिली. पाच खंड तातडीने पाठवूनही दिले. ते पाहून कालवट भारावून गेले. त्यांनी तब्बल 200 प्रतींची देण्याची विनंती सावंत यांना केली. कार्यक्रमात मराठा रेजिमेंटचे कर्नल ऑफ रेजिमेंट पीजेएस पन्नू यांच्या हस्ते
शिवाजी द गेट’ पुस्तक आजी माजी अधिकाऱयांसह रेजिमेंटच्या देशातील 26 युनिटस् आणि मुख्य गंथालयांना देण्यात आले. आज मराठा रेजिमेंटमधील प्रत्येक अधिकारी आणि जवानाला`शिवाजी द गेट’ प्रेरणा, ऊर्जा देत आहे, याचा अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया इंद्रजित सावंत आणि स्वप्निल यादव यांनी दिली.


शिवरायांच्या युद्धनीतीवरील स्वतंत्र पुस्तकाचा प्रस्ताव
कमांडर गोविंद कालवट यांनी इंद्रजित सावंत यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीती, लष्करी प्रशासन यावर स्वतंत्र पुस्तक लिहण्याचा प्रस्ताव दिला आहे.
डॉ. बाळकृष्ण यांनी ग्रंथसंपदा
डॉ. बाळकृष्ण यांनी धर्म, अर्थशास्त्र, राजकारण आणि तत्वज्ञावरील अनेक पुस्तके लिहिली आहे. त्यातील शिवाजी द ग्रेट पुस्तक सर्वाधिक प्रसिद्ध आहे.
शिवाजी विद्यापीठाची संकल्पना डॉ. बाळकृष्ण यांची
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने श्री शिवाजी विश्वविद्यालय अर्थात युनिव्हर्सिटी (विद्यापीठ) स्थापन करावे, अशी सर्वप्रथम कल्पना डॉ. बाळकृष्ण यांनी मांडली होती. त्याला तत्कालिन छत्रपती राजाराम महाराज यांनी सहमती दिली होती. पण दोघांचेही अकाली निधन झाले.