Tarun Bharat

शिवाजी पथावरच भरला मासळी बाजार

  वार्ताहर /   राजापूर  

स्वतंत्र मच्छीमार्केट असतानाही रस्त्याशेजारी बसून मच्छीविक्री करणाऱया विक्रेत्यांवर नगर परिषदेकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने शुक्रवारी मच्छीमार्केटमधील विक्रेत्यांनी शिवाजीपथावरच मच्छी विक्रीसाठी बसून आपला राग व्यक्त केला. त्यामुळे शिवाजीपथावरच सर्व मासळी बाजार भरल्याचे चित्र दिसत होते. बाजारपेठेत तसेच रस्त्यावर बसून मच्छी विक्रीमुळे दुर्गंधी पसरत असून अशांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.   

राजापूर बाजारपेठेत तसेच जवाहर चौक, शिवाजीपथ मार्गावर बसून मच्छी विक्री करणाऱया महिला नगर परिषदेसाठी नेहमी डोकेदुखी ठरत आहेत. राजापूर शहरात वैशिष्टय़पूर्ण अनुदानामधून 39 लाख 71 हजार 52 रूपये निधी खर्च करून मच्छी व मटण मार्केट उभारण्यात आले आहे. या इमारतीच्या निम्मा भागात मच्छी विक्रेते असून निम्मा भाग अद्यापही रिकामा आहे. मच्छी विक्रीसाठी स्वतंत्र इमारत असतानाही काही मच्छी विक्रेत्या महिला शहरातील रस्त्याकडेला बसून मच्छी विक्री करीत आहेत. याचा परिणाम मच्छीमार्केटमधील व्यवसायावर होत आहे.

बाजारपेठेत मच्छी मिळत असल्याने अनेकजण मच्छीमार्केटकडे जात नाहीत. परिणामी रस्त्यावर बसणाऱया महिलांची मच्छी संपते, मात्र मार्केटमध्ये विक्री होत नाही. त्यामुळे मच्छी मार्केटमधील मच्छीविक्रेते नाराज आहेत. बाजारपेठेत रस्त्यावर बसणाऱया मच्छीविक्रेत्यांमुळे दुर्गंधी पसरते. असे असताना अद्यापही नगर परिषदेकडून अशा मच्छीविक्रेत्यांवर ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या मच्छीमार्केटमधील मच्छी विक्रेत्यांनी शुक्रवारी मासे घेऊन सरळ शिवाजी पथावर ठाण मांडले. रस्त्यावर बसून मच्छीविक्री करणाऱया महिलांच्या बाजूला रस्त्याकडेने सर्व महिला मच्छी विक्रीसाठी बसल्या होत्या. त्यामुळे शिवाजी पथावर मासळी बाजार भरला की काय, असा प्रश्न शहरवासीयांना पडला होता. मच्छी विक्रेत्यांकडून त्याच ठिकाणी मासे कापून दिले जात होते. माशाचे पाणी त्याच ठिकाणी टाकले जात होते. याबाबत जर्जा सरु झाल्याने अखेर नगर परिषद प्रशासनाने या महिलांना तेथून हटवून पून्हा मच्छीमार्केटमध्ये बसण्यास सांगितले. त्यामुळे आक्रमक झालेल्या महिलांनी थेट नगर परिषद गाठत रस्त्यावर बसून मच्छी विक्री करणाऱयांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत गप्प बसणार नाही, असा पवित्रा घेतला.

Related Stories

फक्त एकच हाती होतं, ‘देवाचा धावा’

NIKHIL_N

नागपूर-मडगाव साप्ताहिक फेस्टिवल स्पेशल ट्रेनच्या वेळापत्रकात बदल

Archana Banage

कोरोनामुळे राजापूर नगर परिषदेच्या 15 कोटींच्या कामांना खीळ

Patil_p

लेप्टोस्पायरोसीससाठी 222 गावे जोखीमग्रस्त

NIKHIL_N

उभादांडा- आडारी पुलाच्या कामाचे केसरकरांच्या हस्ते भूमीपूजन

Anuja Kudatarkar

ग्रामपंचायत निगुडे येथे महिलांना कापडी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण

Anuja Kudatarkar