Tarun Bharat

शेअर बाजारात तेजीची घोडदौड कायम

पुन्हा शेअरबाजार नव्या उंचीवर : सेन्सेक्स 46,666  वर झेपावला

वृत्तसंस्था / मुंबई 

भारतीय भांडवली बाजारातील मागील काही दिवसांचा प्रवास हा तेजीसोबत सुरु आहे. परंतु यामध्येही नवीन विक्रमाची नोंद करत शेअर बाजाराने भक्कम स्थिती निर्माण केल्याचे पहावयास मिळाले आहे. चालू आठवडय़ातील तिसऱया दिवशी बुधवारी शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर गुंतवणुकीच्या प्रभावाने बीएसई सेन्सेक्सला 46 हजार 500 चा टप्पा गाठणे शक्य झाल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.

दिवसभरातील प्रमुख कंपन्यांच्या मदतीने दिवसअखेर बुधवारी सेन्सेक्स 403.29 अंकांनी वधारुन निर्देशांक 46,666.46 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 114.85 अंकांनी वधारुन निर्देशांक 13,682.70 वर स्थिरावला आहे.

दिग्गज कंपन्यांमध्ये प्रामुख्याने एचडीएफसी, एचडीएफसी बँक, टीसीएस आणि भारती एअरटेल यांच्या समभागांनी तेजी प्राप्त केली होती. तसेच बीएसईमधील लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य प्रथमच 185.11 लाख कोटी रुपयांच्या घरात राहिल्याची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी दिवसभरातील व्यवहारादरम्यान काही काळ सेन्सेक्सने 46,704.97 तर निफ्टीने 13,692.35 चा उच्चांक गाठला होता.

प्रमुख क्षेत्राची मजल

चालू आठवडय़ातील तिसऱया दिवशी बुधवारी शेअर बाजाराने प्राप्त केलेल्या नव्या उंचीमध्ये प्रामुख्याने धातू, रियल्टी या क्षेत्रातील समभागांच्या सकारात्मक कामगिरीचा वाटा अधिक होता. याने शेअर बाजाराला बळकटी निर्माण झाली आहे. तर वाहन आणि औषध क्षेत्रानेही योग्य मजल मारल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे.

सध्या विविध रेटिंग्स कंपन्या भारतासह जागतिक अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर सुधारणार असल्याचा अंदाज व्यक्त करत आहेत. याचा सकारात्मक लाभ भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदरांना होणार असल्याचा अंदाजही शेअर बाजार तज्ञांनी व्यक्त केला आहे.

Related Stories

थायरोकेअर समभागाचा 26 टक्के परतावा

Amit Kulkarni

शाओमीची स्टोअर ऑन व्हिल्स योजना सुरू

Patil_p

ओप्पोने कारखान्यातील काम थांबविले

Patil_p

महिंद्रा लॉजिस्टीकचा बजाज इलेक्ट्रिकलशी करार

Amit Kulkarni

शिपरॉकेट खरेदी करणार हिस्सेदारी

Patil_p

एअर इंडियाला मुदतवाढ नाही

Patil_p