मोर्चा, निषेध रॅलीने शासनाचा निषेध
शेतकरी विरोधी कायदा रद्द करा- महाविकास आघाडी
कायदा योग्यच, देशव्यापी बंद हे पाकिटमारांचे आंदोलन-भाजपा
प्रतिनिधी / मिरज
केंद्र शासनाने लागू केलेला तीन कृषी सुधारणा कायदा रद्द करावा, या मागणीसाठी मंगळवारी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंद आंदोलनाला मिरज शहर आणि परिसरातून पाठिंबा मिळत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना महाविकास आघाडी कार्यकर्त्यांसह मिरज शहर सुधार समिती, भीम आर्मी, बहुजन मुस्लिम संघटनांच्या कार्यकर्यांनी मोर्चा आणि निषेध रॅली कडून नवा शेतकरी कायदा रद्द करावा अशी मागणी करत केंद्र सरकारचा निषेध केला. तर दुसरीकडे भाजपनेही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आंदोलन करून देशव्यापी बंद हे पाकिटमार दलालांचे आंदोलन आहे. नवा कृषी सुधारणा कायदा हा शेतकरी हिताचा असल्याचा दावा करण्यात आला.
नव्या कृषी कायद्या विरोधात दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत भारत बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात मिरज शहर आणि ग्रामीण भागातही विविध स्तरातून पाठिंबा मिळत आहे. दुपारी 11 नंतर शहरातील बहुतांशी दुकाने बंद करण्यात आली. तर काही दुकानदारांनी अर्धे शटर उघडून व्यवसाय सुरुच ठेवल्याचे दिसले.
भारत बंद आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी शेतकरी कायद्याला विरोध करणारे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पहावयास मिळले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना महाविकास आघाडी, मिरज शहर सुधार समिती, भीम आर्मीसह काही मुस्लिम बहुजन संघटनांचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. महाराणा प्रताप चौकात ठिय्या मारून केंद्र सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. रॅली काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.