Tarun Bharat

शेतकरी, लघुउद्योजकांना आणखी दिलासा

Advertisements

किमान आधार मूल्यात वाढ, 50 हजार कोटींची भांडवल गुंतवणूक

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

काही दिवसांपूर्वी 20 लाख कोटी रूपयांचे पॅकेज घोषित केल्यानंतर आता केंद्र सरकारने शेतकरी आणि लघु तसेच मध्यम उद्योगांसाठी आणखी साहाय्याची घोषणा केली आहे. सोमवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संबंधीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 14 खरीप पिकांच्या किमान आधार मूल्यांमध्ये 50 ते 80 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये 50 हजार कोटी रूपयांच्या भांडवल गुंतवणुकीची योजना आहे. या उद्योगांची व्याख्याही आता बदलण्यात आली आहे.

या निर्णयामुळे कृषी आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रांना मोठाच दिलासा मिळणार असून या दोन्ही क्षेत्रांमध्ये व्यापक सुधारणा होतील. या निर्णयांचा लाभ देशातील 55 कोटी लोकांना होईल, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची प्रतिक्रिया देताना एका निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.

मागण्यांची पूर्तता

लघु आणि मध्यम तसेच गृहोद्योगांना आणखी पॅकेज द्यावे, अशी मागणी या क्षेत्रांकडून करण्यात येत होती. तिचा सहानुभूतीपूर्वक विचार करून हे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकऱयांनाही कोरोना परिस्थितीचा फटका बसला आहे. तो लक्षात घेऊन येणाऱया खरीप हंगामातील अनेक पिकांसाठीं किमान मूल्याधारात वाढ करण्यात आली, असे निर्णयांची माहिती देताना सांगण्यात आले.

उद्योगांमध्ये भांडवल गुंतवणूक

अतिलघु, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये त्यांच्या मागणीनुसार 20 हजार कोटी रूपयांची अतिरिक्त भांडवल गुंतवणूक करण्यात येणार आहे. याचा किमान 2 लाख अडचणग्रस्त उद्योगांना होणार आहे. या उद्योगांचे कर्ज-भांडवल गुणोत्तर व्यवस्थापित करण्यासाठी सरकार एक समितीही स्थापन करणार आहे.

व्याख्येत परिवर्तन

अतिलघु उत्पादन उद्योग आणि सेवा उद्योगांची व्याख्या बदलण्यात आली आहे. त्यानुसार आता 1 कोटी रूपयांपर्यंतची गुंतवणूक आणि 5 कोटी रूपयांपर्यंतची उलाढाल असणारे उद्योग अतिलघु मानण्यात येणार आहेत  त्यामुळे करांमध्ये सवलत मिळू शकणाऱया उद्योगांच्या संख्येत वाढ होणार असून अधिक जणांना लाभ होणार आहे. तसेच 10 कोटी रूपयांपर्यंतची गुंतवणूक आणि 50 कोटी रूपयांपर्यंतची उलाढाल असणाऱया उद्योगांना लघु मानण्यात येईल. तर 50 कोटी रूपयांपर्यंतची गुंतवणूक आणि 250 कोटी रूपयांपर्यंतची उलाढाल असणाऱया उद्योगांना आता मध्यम मानण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

निर्यात उद्योगांना अधिक सवलत

जे अतिलघु, लघु आणि मध्यम उद्योग निर्यात करतात त्यांनी निर्यातीची उलाढाल कितीही केली, तरी ती वरील व्याख्येत समाविष्ट केली जाणार नाही. याचाच अर्थ असा की या श्रेणीतील उद्योगांना आता कितीही निर्यात करण्याची मुभा दिली जाणार आहे. त्यांची निर्यात मर्यादेपेक्षा जास्त झाली तरी त्यांची श्रेणी बदलण्यात येणार नाही. निर्यावाढीला प्रोत्साहन देण्यासाठी हे महत्वाचे आहे.

आधार किमतीत वाढ

येत्या खरीप हंगामातील 14 पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली आहे. भारताच्या दरात प्रतिक्विंटल 53 रूपयांची वाढ करण्यात आली आहे. तेलबिया आणि डाळींच्या आधारभूत किमतीतही मोठी वाढ झाली आहे. कापसाच्या किमतीत प्रतिक्विंटल 260 रूपये तर चांगल्या दर्जाच्या कापसाच्या दरात प्रति क्विंटल 275 रूपये वाढ होत आहे. 3 लाख रूपयांपर्यंतच्या लघु कालावधीच्या पीक कर्जाच्या परतफेडीच्या कालावधीत 31 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे.

फेरीवाल्यांसाठीही साहाय्य

फेरीवाल्यांसाठी आत्मनिर्भर निधी योजनेतून भांडवल उभारणीसाठी 10 हजार रूपयांपर्यंतचे अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. ही योजना आधी घोषित करण्यात आली आहे. याचा लाभ 50 लाखांहून अधिक लोकांना होण्याची शक्यता आहे. भाजीविक्रेते, फळवाले, पादत्राण विक्रेते, रस्त्यावरींल अन्नपदार्थ विक्रेते, केशकर्तनालये, चर्मकार दुकानदार इत्यादींना याचा लाभ होणार आहे.

‘चँपियन’ पोर्टलचा प्रारंभ

अतिलघु, लघु आणि मध्यम उद्योगांचा साहाय्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी ‘चँपियन’ नामक पोर्टलचा प्रारंभ केला आहे. या पोर्टलवर या उद्योजकांना त्यांच्या व्यवसायासाठी तसेच बाजारपेठ व गुंतवणुकीसाठी आवश्यक ती सर्व माहिती देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

नवे पॅकेज : कोणाला काय…

अतिलघु, लघु, मध्यम उद्योजक

व्यवसाय मर्यादा

अतिलघु : गुंतवणूक 1 कोटीपर्यंत, उलाढाल 5 कोटीपर्यंत

लघु : गुंतवणूक 10 कोटीपर्यंत, उलाढाल 50 कोटीपर्यंत

मध्यम : गुंतवणूक 50 कोटीपर्यंत, उलाढाल 250 कोटीपर्यंत

निर्यात मर्यादा : वरील सर्व उद्योगांना कितीही

भांडवल गुंतवणूक

अतिलघु, लघु, मध्यम : एकंदर 20 हजार कोटी रूपये

शेतकरी

किमान आधारभूत दरवाढ

भात : दरवाढ 53 रूपये प्रतिक्विंटल, नवा दर 1,868 रूपये

कापूस : दरवाढ 260 रूपये प्रतिक्विंटल्।  नवा दर 5,515 रूपये

दर्जेदार कापूस : दरवाढ 275 रूपये प्रतिक्विंटल, नवा दर 5,825 रूपये

बाजरी : दरवाढ 640 रूपये प्रतिक्विंटल, नवा दर 2,640 रूपये

नाचणी : दरवाढ 145 रूपये प्रतिक्विंटल, नवा दर 1,850 रूपये

जोंधळा : दरवाढ 70 रूपये प्रतिक्विंटल, नवा दर 1,850 रूपये

मका :  दरवाढ 150 रूपये प्रतिक्विंटल, नवा दर 2,620 रूपये

मालदांडी मका : दरवाढ 150 रूपये प्रतिक्विंटल, नवा दर 2,640 रूपये

उडीद : दरवाढ 300 रूपये प्रतिक्विंटल, नवा दर 6,000 रूपये

तूर : दरवाढ 200 रूपये प्रतिक्विंटल, नवा दर 6,000 रूपये

मूग : दरवाढ 146 रूपये प्रतिक्विंटल, नवा दर 7,196 रूपये

सोयाबिन : दरवाढ 170 रूपये प्रतिक्विंटल, नवा दर 3,880 रूपये

सूर्यफूल : दरवाढ 325 रूपये प्रतिक्विंटल, नवा दर 5,885 रूपये

भुईमूग : दरवाढ 185 रूपये प्रतिक्विटंल, नवा दर 5,275 रूपये

निगरसीड : दरवाढ 755 रूपये प्रतिक्विंटल, नवा दर 6,695 रूपये

सीसमसीड : दरवाढ 370 रूपये प्रतिक्विंटल, नवा दर 6,855 रूपये

पीक कर्जफेड

3 लाखापर्यंतच्या लघुकालावधी कर्जाफेडीला 31 ऑगस्टपर्यंत कालावधीवाढ  

Related Stories

नीट-पीजी परीक्षा चार महिने लांबणीवर

Patil_p

अमेरिकेत भारतीय महिलांचे मोठे यश

Patil_p

गाझियाबाद प्रकरणी ट्विटरने अंग झटकले

Patil_p

सोनोवाल, मुरुगन शपथबद्ध

Patil_p

झारखंडमधील 3 आमदारांवर काँग्रेसची कारवाई

Patil_p

पंतप्रधान मोदी आज देशाला संबोधित करणार

Patil_p
error: Content is protected !!