Tarun Bharat

शेतकऱयांना नववर्ष भेट

Advertisements

6 कोटी ‘कृषी सन्मान’ लाभार्थींच्या खात्यावर 12 हजार कोटी रु. जमा : तिसऱया टप्प्यातील रक्कम जमा : तुमकूरमध्ये शेतकऱयांची जाहीर सभा

तुमकूर : येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी कृषी सन्मान योजनेची रक्कम ऑनलाईन पद्धतीने शेतकऱयांच्या खात्यात जमा केली.

प्रतिनिधी / बेंगळूर

सुगीच्या कामांमध्ये व्यग्र असलेल्या देशातील शेतकऱयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूषखबर दिली आहे. देशातील कृषी सन्मान योजनेतील 6 कोटी लाभार्थींच्या बँक खात्यावर 12 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. तुमकूरमध्ये गुरुवारी आयोजित शेतकऱयांच्या जाहीर सभेचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी शेतकऱयांच्या बँक खात्यावर थेट रक्कम जमा केली.

तुमकूर येथे कार्यक्रमात कळ दाबल्यानंतर एकाच वेळी देशातील 6 कोटी शेतकऱयांच्या बँक खात्यावर 12 हजार कोटी रुपये जमा झाले. देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱयांचे जीवन सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने कमाल 5 एकरपेक्षा कमी जमीन असणाऱया प्रत्येक शेतकऱयाच्या बँक खात्यावर तीन टप्प्यात एकूण 6 हजार रुपये जमा करण्याची किसान सन्मान योजना जारी केली होती. आता ही योजना सर्व शेतकऱयांना लागू करण्यात आली आहे. त्यानुसार गुरुवारी पंतप्रधानांनी प्रत्येक शेतकऱयाच्या नावे बँक खात्यावर किसान सन्मान योजनेच्या तिसऱया टप्प्यातील रक्कम जमा केली. यापूर्वी म्हणजेच 24 फेबुवारी 2019 रोजी उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे पहिल्या टप्प्यातील 2 हजार रु. 1 कोटी 10 लाख शेतकऱयांच्या खात्यावर जमा करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱया टप्प्यातील रक्कमही जमा करण्यात आली. गुरुवारी 6 कोटी शेतकऱयांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2 हजार रु. जमा करण्यात आले. त्यामुळे शेतकऱयांच्या खात्यावर यंदाच्या आर्थिक वर्षात 6 हजार रु. जमा झाले आहेत.

शेतकऱयांना उद्देशून बोलताना नरेंद्र मोदी यांनी, यापूर्वी शेतकऱयांना सरकारकडून देण्यात येणारी मदत पूर्ण प्रमाणात पोहोचत नव्हती. आता थेट शेतकऱयांच्या खात्यावर रक्कम जमा होत आहे. शेतकऱयांच्या समस्यांची केंद्र सरकारला जाणीव आहे. त्यामुळे या मुद्दय़ावरून आपण राजकारण करणार नाही. शेतकऱयांनी पिकविलेली पिके सुरक्षित ठेवण्यासाठी शितगृहे स्थापन करण्यासाठी ‘किसान भंडार’ योजना सुरू झाली आहे. शेतकऱयांना सौर वीज उत्पादन करण्यासाठीही प्रोत्साहन दिले जात आहे. देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्यासाठी शेतकऱयांचे योगदान आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

समुद्र किनारपट्टी लाभलेल्या दक्षिण भारताला उत्तम हवामानही साथ देत आहे. त्यामुळे समुद्री मार्गाने निर्यात करणे सुलभ आणि लाभदायक ठरत आहे. बागायत क्षेत्रातही कर्नाटकासह दक्षिणेतील राज्ये आघाडीवर आहेत, असे कौतुकाचे उद्गारही मोदींनी यावेळी काढले.

निर्यातीला प्रोत्साहन

फळे, भाज्या, काजू, खोबरे, मसाल्याच्या पदार्थांचे कर्नाटकात मोठय़ा प्रमाणात उत्पादन होत आहे. त्यांच्या निर्यातीसाठी भरपूर संधी आहे. शेतीमालाला चांगला दर मिळावा हा आपला हेतू आहे. युवा वर्ग रबर उत्पादनाकडे आकर्षित व्हावा यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. कॉफी उत्पादने साठविण्यासाठी देखील प्रोत्साहन देण्यात येत आहे, असे ते म्हणाले.

मच्छिमारांसाठी अनेक योजना

मच्छिमारांना किसान क्रेडीट कार्ड, बंदर आणि 7 हजार कोटी रु. विशेष निधी यासारख्या अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. खोल समुद्रात मासेमारी करणाऱया शेतकऱयांच्या बोटींना आधुनिक यंत्रणा बसविण्याची योजना आखण्यात आली आहे. इस्रोच्या साहाय्याने नॅव्हेगेशन तंत्रज्ञान जोडण्यात येत आहे, असेही मोदींनी सांगितले. कार्यक्रमप्रसंगी पंतप्रधानांनी तामिळनाडूतील निवडक मच्छिमारांना मत्स्यपालन साहित्योपकरणे सांकेतिकपणे वितरीत केली.

शेतकऱयांचा सत्कार

कृषी क्षेत्रात अलौकिक कामगिरी केलेल्या शेतकऱयांचा ‘कृषी कर्मण’ पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. देशभरातून या पुरस्कारासाठी निवड झालेल्या 32  शेतकऱयांना यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे हा पुरस्कार मिळणाऱयांमध्ये 16 महिला शेतकऱयांचाही समावेश आहे.

पूरग्रस्तांसाठी 50 हजार कोटींची मदत द्या

शेतकऱयांच्या जाहीर सभेत नरेंद्र मोदी यांनी भाषणा पूरग्रस्तांच्या मदतीसंदर्भात कोणताही उल्लेख केला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी अतिवृष्टी आणि पूराचा फटका बसलेल्या राज्यातील जनतेच्या मदतीसाठी 50 हजार कोटी रुपयांची मदत करावी, अशी विनंती केली. पूर आणि अतिवृष्टीमुळे राज्यातील 700 खेडय़ांमधील 3 लाख घरांची हानी झाली आहे. याबाबत पूर्वी देखील माहिती दिली तर दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे जनतेला मदत करण्यासाठी तातडीने अनुदान मंजूर करावे, अशी विनंती त्यांनी पंतप्रधानांकडे केली.

Related Stories

किसान, क्रिमिनिलनंतर कांवड

Patil_p

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांकडून जुन्या वाहनांसाठी धोरण जाहीर

Archana Banage

भारतीय लस दृष्टिपथात!

Patil_p

सुपरस्टार रजनीकांत यांनी घेतला ‘हा’ निर्णय

Tousif Mujawar

योगींविरोधात निवडणूक, अखिलेश विरोधात प्रचार

Patil_p

पंजाबमध्ये डेराप्रेमीची हत्या, गँगस्टरने स्वीकारली जबाबदारी

Amit Kulkarni
error: Content is protected !!