दूरच्या ठिकाणी दूधविक्री करण्यासाठी एका गो-पालकानं चक्क 30 कोटी रूपयांचं हेलिकॉप्टर विकत घेतल्याचं वृत्त अद्याप ताजं आहे. आता मध्यप्रदेशातील एका शेतकरी महिलेनं शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर हवं असं म्हणत सरकारकडे कर्जाची मागणी केली आहे. शिवाय हेलिकॉप्टर बाळगण्यासाठी अनुमतीपत्र द्या अशी मागणीही केली आहे. समाज माध्यमांवर सध्या या मागणीची चर्चा चांगलीच रंगली असून लोकांना या शेतकरी महिलेचं कौतुकही वाटत आहे.
या राज्यातील मंदसौर जिल्हय़ातील बसंतीबाई लोहार नावाची ही शेतकरी महिला आहे. तिनं आपल्या मागण्यांचं पत्र थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाच पाठवलं आहे. मात्र, हेलिकॉप्टर घेण्याचं तिचं कारण संपत्तीचं प्रदर्शन हे नाही. तर गावातील गुंड तिला जाता येता त्रास देतात. शेतात जाण्याच्या मार्गात अडथळे निर्माण करतात. तिचा शेताकडं जाण्याचा रस्ता त्यांनी बंद केला आहे. त्यामुळे आता वायुमार्गानं तरी शेताकडं जाता येतं का ते पहावं यासाठी तिनं ही शक्कल लढविली आहे. तिनं लिहिलेल्या पत्राचा उद्देश तिच्या अडचणी उच्चपदस्थांच्या कानावर घालणं हा प्रमुख्यानं आहे, असं तिचे नातेवाईक सांगतात. तिची शेती अवघी 1 एकर आहे. पण तोच तिचा जीवनाचा एकमेव आधार आहे. तेव्हा हेलिकॉप्टरची मागणी ही तिची चैन नसून तिची व्यथा आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. तिच्या या अनोख्या मागणीमुळं प्रशासनाचं तिच्या अडचणींकडं लक्ष वेधलं गेलं असून रस्ता मोकळा करण्यासाठी प्रशासन पावलं उचलत आहे.