Tarun Bharat

शेवटच्या सामन्यात लंकन महिला विजयी

Advertisements

वृत्तसंस्था/ डंबुला

कर्णधार चमारी अटापटूने नोंदवलेल्या आक्रमक नाबाद अर्धशतकाच्या बळावर लंकेने महिलांच्या शेवटच्या टी-20 सामन्यात भारतीय महिलांचा 7 गडय़ांनी पराभव करून व्हाईटवॉश टाळला. मात्र भारताने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. अटापटूला सामन्यातील सर्वोत्तम तर भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान मिळाला.

32 वर्षीय चमारी अटापटूने 48 चेंडूंच्या खेळीत 14 चौकार व एक षटकार मारला. या खेळीत तिने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 2000 धावांचा टप्पा गाठला. हा पराक्रम करणारी ती लंकेची एकमेव क्रिकेटपटू बनली आहे. तिलकरत्ने दिलशानने (1889) पुरुष विभागात सर्वाधिक धावा जमविल्या होत्या.

139 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लंकन महिलांनी प्रथमच या सामन्यात फलंदाजीत चांगले प्रदर्शन करीत तीन षटके बाकी ठेवून विजयाचे उद्दिष्ट गाठले. भारताने प्रथम फलंदाजी निवडल्यानंतर शफाली वर्मा पहिल्याच षटकात बाद झाली. कर्णधार हरमनप्रीत (33 चेंडूत नाबाद 39), जेमिमा रॉड्रिग्ज (30 चेंडूत 33), स्मृती मानधना व एस. मेघना (प्रत्येकी 22) यांच्या योगदानामुळे भारताला 20 षटकांत 5 बाद 138 धावांची मजल मारता आली. स्मृती व मेघना यांनी दुसऱया गडय़ासाठी 51 धावांची भर घातली तर हरमनप्रीतने जेमिमासमवेत 64 व पूजा वस्त्रकारसमवेत 49 धावांची भागीदारी केली. पूजा शेवटच्या चेंडूवर धावचीत झाली. तिने 6 चेंडूत 13 धावा फटकावल्या.

 आव्हानाचा पाठलाग करताना लंकेनेही पहिल्या षटकात बळी गमविला. पण चमारी अटापटूने प्रथम हर्षिता समरविक्रमासमवेत (13) थोडाफार डाव सावरला. पाचव्या षटकात हर्षिता बाद झाल्यानंतर निलाक्षी डिसिल्वाकडून (28 चेंडूत 30) चमारीला चांगली साथ मिळाली. चमारीने 29 चेंडूत अर्धशतक नोंदवत लंकेतर्फे या प्रकारात सर्वात वेगवान अर्धशतक नोंदवणारी महिला होण्याचा मान मिळविला. 42 धावांवर असताना तिला जेमिमाकडून जीवदानही लाभले. टी-20 मधील तिचे हे पाचवे अर्धशतक आहे. शेवटच्या पाच षटकांत त्यांना विजयासाठी 18 धावांची गरज असताना चमारीने कविशा दिलहारीच्या साथीने विजयाचे सोपस्कार 17 षटकात पूर्ण केले. या सामन्यात भारताचे गचाळ क्षेत्ररक्षण झाले. त्यांनी अनेक धावचीतच्या संधी गमविल्या.

संक्षिप्त धावफलक ः भारतीय महिला 20 षटकांत 5 बाद 138 ः स्मृती मानधना 21 चेंडूत 22, शफाली 5, एस.मेघना 26 चेंडूत 22, हरमनप्रीत 33 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारासह नाबाद 39, जेमिमा रॉड्रिग्ज 30 चेंडूत 3 चौकारांसह 33, पूजा वस्त्रकार 6 चेंडूत 2 चौकारांसह 13, अवांतर 4. सुगंधिका कुमारी 1-28, अमा कांचना 1-22, ओशादी रणसिंघे 1-13, इनोका रणवीरा 1-31. लंकन महिला 17 षटकांत 3 बाद 141 ः गुणरत्ने 5, चमारी अटापटू 48 चेंडूत 14 चौकार, 1 षटकारासह नाबाद 80, हर्षिता 13, निलाक्षी डिसिल्वा 28 चेंडूत 4 चौकारांसह 30, कविशा नाबाद 7, अवांतर 6. रेणुका सिंग 1-27, राधा यादव 1-41.

Related Stories

हैदराबाद एफसीशी क्हिक्टर करारबद्ध

Patil_p

एफआयएच पुरस्कारांसाठी हरमनप्रीत, गुरजित, श्रीजेश यांना नामांकन

Patil_p

पाकचा क्रिकेटपटू खुशदील शहा जखमी

Patil_p

मुंबईतील तिन्ही मैदाने रेड झोनमध्ये : सराव ठप्पच

Patil_p

टी-20 मानांकनात केएल राहुल पाचव्या स्थानी

Patil_p

ऑस्ट्रेलियाचा सॉफ्टबॉल संघ सर्वप्रथम जपानमध्ये दाखल

Amit Kulkarni
error: Content is protected !!