फिरकीचा जादूगर शेन वॉर्न काळाच्या पडद्याआड
@ मेलबर्न / वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील सर्वात महान फिरकीपटू शेन वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आणि अवघ्या क्रीडा विश्वावर शुक्रवारी अक्षरशः शोककळा पसरली. आपल्या जादूमय फिरकी गोलंदाजीच्या बळावर भल्याभल्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचणे भाग पाडणाऱया या महान फिरकीपटूची ही ‘शॉकिंग एक्झिट’ चाहत्यांना धक्का देणारी ठरली. निधनसमयी शेन वॉर्न 52 वर्षांचा होता.
शेन वॉर्नच्या मॅनेजमेंट कंपनीने ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांना त्याच्या निधनाचे वृत्त दिले आणि अवघ्या क्रीडा जगतासाठी हा मोठा धक्का होता. शेन वॉर्न थायलंडमधील कोह समूई येथे होता आणि हृदयविकाराचा धक्का हे त्याच्या निधनामागील कारण असू शकते, असे त्याच्या मॅनेजमेंट कंपनीने म्हटले.
‘शेन वॉर्न त्याच्या व्हिलामध्ये होता. अचानक तो खाली कोसळला आणि मेडिकल स्टाफच्या अथक प्रयत्नानंतरही त्याचे प्राण वाचवता आले नाहीत’, असे त्याच्या मॅनेजमेंट कंपनीने नमूद केले. शेन वॉर्नच्या कुटुंबियांनी आपल्या प्रायव्हसीचा आदर ठेवावा, असे भावूक आवाहन केले. आणखी माहितीसाठी संपर्क करु नये, सर्व तपशील नंतर जाहीर केले जातील, असे त्यांनी नमूद केले.
1992 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱया शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियातर्फे 145 कसोटी सामने खेळत आपल्या भेदक लेगस्पिनच्या बळावर 708 फलंदाज गारद केले. याशिवाय, 194 वनडे सामन्यात त्याने 293 बळीही घेतले.
कसोटी इतिहासात सर्वाधिक बळी घेणाऱया गोलंदाजांच्या यादीत शेन वॉर्न दुसऱया स्थानी राहिला. लंकेचा ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरनलाच त्याच्यापेक्षा अधिक बळी मिळवता आले. 2007 मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलिया व श्रीलंका क्रिकेटने वॉर्न व मुरलीधरन यांच्या सन्मानार्थ कसोटी मालिकेला वॉर्न-मुरलीधरन चषक असे नाव दिले होते.
आयकॉनिक सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केलेल्या शेन वॉर्नचा विस्डेनने शतकातील 5 सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये समावेश केला. 1992 ते 2007 या 15 वर्षांच्या कालावधीतील कामगिरीच्या आधारे विस्डेनने त्याचा हा सन्मान केला. 2013 मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्याच वर्षी वॉर्नचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला गेला होता.
निवृत्त झाल्यानंतर त्याने आयपीएल प्रँचायझी राजस्थान रॉयल्ससाठी कर्णधार व प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. मैदानावर व मैदानाबाहेर प्रभावी, लक्षवेधी व्यक्तिमत्त्व ठरत आलेला शेन वॉर्न अनेकदा वादंगाच्या भोवऱयातही सापडत राहिला. 1998 मध्ये त्याने मार्क वॉसह बुकीकडून लाच घेतल्याची जाहीर कबुली दिल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. दक्षिण आफ्रिकेतील 2003 विश्वचषकापूर्वी तो बंदी असलेल्या उत्तेजकाचे सेवन केल्याप्रकरणी दोषी आढळून आला होता.
ओल्ड टॅफोर्डवर 24 वर्षांचा वॉर्न, समोर माईक गॅटिंग आणि बॉल ऑफ द सेंच्युरी!


1993 साली ओल्ड ट्रफोर्ड कसोटीत 24 वर्षीय शेन वॉर्नने एका अफलातून चेंडूवर माईक गॅटिंगचा त्रिफळा उडवला आणि याला ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ अशी उपाधी मिळाली. शेन वॉर्नच्या कारकिर्दीतील तो सर्वोच्च क्षणही ठरला. लेगस्टम्पच्या रोखाने पडलेला चेंडू नंतर डोळय़ाचे पाते लवते न लवते, तोच केव्हा ऑफ स्टम्प उडवून गेला, हे गॅटिंगला कळाले देखील नव्हते. गॅटिंगचा बचावात्मक फटका खेळण्याचा तो प्रयत्न त्यावेळी सपशेल फसला होता.
जेव्हा वॉर्न म्हणाला होता, मला स्वप्नातही षटकार खेचणारा सचिन दिसतो!


भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर व शेन वॉर्न यांच्यात अनेकदा जुगलबंदी रंगली आणि त्यात मुख्यत्वेकरुन सचिनने बऱयाचदा बाजी मारली. शारजाहमध्ये वादळी वारे घोंघावून गेल्यानंतर सचिनचे वॉर्नवर घोंघावलेले वादळ आणि त्यानंतर भारतीय भूमीत सचिनने वॉर्नच्या गोलंदाजीची जी लक्तरे काढली, त्याला कोणतीच तोड नव्हती. सचिनच्या या रुद्र फलंदाजीला बळी पडल्यानंतर शेन वॉर्न सहजपणे बोलून गेला होता, मला स्वप्नातही पुढे सरसावून षटकार खेचणारा सचिनच दिसतो!
ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून दिला आणि ऍशेसमध्ये सर्वाधिक बळीही घेतले!
शेन वॉर्नने 1999 साली ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला आणि ऍशेस क्रिकेटमध्ये अन्य कोणत्याही गोलंदाजापेक्षा सर्वाधिक 195 बळी घेतले.
अन् वॉर्न होता म्हणूनच राजस्थान रॉयल्सने पहिलेवहिले आयपीएल जिंकले!
2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या टी-20 क्रिकेटमधील सर्वात मोठय़ा लीगची सुरुवात झाली आणि शेन वॉर्नने आपला सर्व अनुभव पणास लावत राजस्थान रॉयल्स प्रँचायझीला पहिलेवहिले जेतेपद संपादन करुन दिले. आश्चर्य म्हणजे राजस्थान रॉयल्सचे आयपीएल इतिहासातील हे आजवरचे एकमेव जेतेपद आहे!
रॉड मार्शना श्रद्धांजली वाहिली आणि काहीच तासात स्वतःही एक्झिट घेतली!
ऑस्ट्रेलियाचे महान यष्टीरक्षक-फलंदाज रॉड मार्श यांचे निधन झाल्यानंतर शेन वॉर्नने शुक्रवारी दुपारी ट्वीट करत मार्शना श्रद्धांजली वाहिली. पण, हेच त्याचे शेवटचे ट्वीट ठरेल, याची कोणाला अगदी पुसटशीही कल्पना नव्हती. नंतर काहीच तासात शेन वॉर्न कालवश झाल्याचे वृत्त आले आणि अवघ्या क्रीडा जगतासाठी हा मोठा धक्का ठरला.