Tarun Bharat

शोध सावलीचा

असं म्हटलं जातं की, जेव्हा मानवाने ह्या भूतलावर पहिलं पाऊल ठेवलं, तेव्हापासूनच निवाऱयाकरिता मानवाने वृक्षतोडीस सुरुवात केली.विविध कारणांसाठी केली जाणारी ही भरमसाठ वृक्षतोड आता इतकी वाढली आहे की यामुळे जंगलेच नष्ट होतात कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ह्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळू लागला आहे. वातावरणाच्या तापमानात वाढ झाल्याने त्याचा विपरीत परिणाम मानवी आरोग्यावरही व्हायला लागला आहे.

गेल्या काही वर्षात वृक्षतोड मोठय़ा प्रमाणात झाल्याने त्याचा विपरीत परिणाम जनसामान्यांवर, येथील वातावरणावर झालेला दिसून येत आहे. वृक्षतोड होतानाच वृक्षलागवड करून त्याची जोपासना केली जात नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. वृक्षतोडीमुळे जल, स्थल आणि वायूप्रदूषणही वाढले आहे. मानवाने जंगलांवर कब्जा केल्याने वन्य प्राण्यांचे अस्तित्व धोक्मयात आले आहेच, मात्र पावसाचे प्रमाणही कमी झाले आहे. मानवाला पिण्यायोग्य पाण्याचा मुख्य स्रोत ‘पाऊस’ असल्याने दुष्काळाची समस्या जाणवू लागली आहे. प्रदूषणामुळे बहिरेपणा, डोळय़ांचे विकार, श्वसनाचे आजार, हृदयविकार अशा आजारांत वाढ झाल्याचे चित्र बघायला मिळते.

औद्योगीकीकरण व प्रदुषणामुळे आज मानवी समाजापुढे अनेक समस्या उभ्या राहू लागल्या आहेत. वृक्षतोडीमुळे तापमानात वाढ होते आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढत आहे परंतु पर्जन्यवृष्टी मात्र त्या प्रमाणात होत नाही म्हणून जमिनीवर पाण्याचे साठे आणि भूगर्भातील पाणी पातळी वाढत नाही, ही समस्या आहे.

आपण अन्नाशिवाय एखादा दिवस, पाण्यावाचून एखादा तास जिवंत राहू शकतो. मात्र हवेतील ऑक्सिजनशिवाय क्षणभरसुद्धा जिवंत राहू शकत नाही आणि ऑक्सिजन निर्मितीचे सर्वात मोठे कार्य पर्यावरणातील वृक्ष करत असतात. वनस्पती स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात आणि हवेतील कार्बन डायऑक्साइड म्हणजे खराब हवा-वायू शोषून मानवास उपयुक्त असे ऑक्सिजन म्हणजे शुद्ध वायू हवेत सोडतात. त्यामुळे वनस्पती व वृक्षांची लागवड व संवर्धन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. जंगलतोड फार मोठय़ा प्रमाणावर होताना जंगल वाचवण्यासाठी व लोकांमध्ये वृक्षाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको आंदोलन चालवले आणि त्यात यशस्वीसुद्धा झाले. वृक्षांचे महत्त्व अपरंपार आहे, हे आपले पूर्वजसुद्धा जाणून होते. संत तुकाराम महाराज याविषयी म्हणतात की, ‘वृक्षवल्ली, आम्हां सोयरे, वनचरे। पक्षी ही सुस्वरे आळविती।।’ खरंच वृक्ष हे आपले सगे सोयरे, नातलग, मित्र परिवारातीलच नव्हे का? वृक्षांच्या महत्त्वाविषयी आपले पूर्वज संत, महात्मे आणि समाजसुधारकांनी ज्या बाबी सांगितल्या आहेत, ते सामान्यातल्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

जंगलतोड वाढत चालल्यामुळे दिवसेंदिवस वनाचे क्षेत्र कमी कमी होत आहे. त्यामुळे जंगलात वास्तव्य करून राहणारे पशुपक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. काही वर्षांनी केवळ झू पार्कमध्येच एखादा प्राणी-पक्षी बघायला मिळेल की काय, अशी शंका मनात येते. पूर्वी सकाळी पक्ष्यांच्या चिवचिव-किलबिल आवाजाने जाग यायची. आजही त्याच आवाजाने जाग येते. मात्र, आजचा आवाज नैसर्गिक नसून ती मोबाइलची रिंगटोन असते. मोबाइलमुळे खूप दूरवरचे मित्र, कुटुंबातील सदस्य, नातलग आणि पाहुणे हे सर्व आपल्याजवळ असल्यासारखा भास होत आहे आणि आपल्या सहवासात असलेला निसर्ग मात्र दूर गेलेला आहे. त्यास्तव निदान वनाचे संरक्षण करण्यात आपण यशस्वी झालो तर पशुपक्ष्यांचे आपोआप संरक्षण होईल. आपल्या जीवनाप्रमाणे पशुपक्ष्यांचे जीवनसुद्धा महत्त्वाचे आहे हे विसरून चालणार नाही.

प्रत्येकाने जाणीवपूर्वक एक जरी झाड लावले तर आपले शहर सुंदर होईलच पण पर्यावरणाची झीजही काही अंशी भरुन निघेल. पर्यावरणाने जे आपल्याला दिले आहे त्यापेक्षा भरभरुन आपण पुढच्या पिढीला दिले पाहिजे. घराघराभोवती, रस्त्याच्या कडेला, नद्यांच्या काठी, टेकडीवर सुंदर झाडे तसेच फुले असलेले चित्र प्रत्येकाच्या मनातून कृतीत उतरावे. निसर्गाकडून भरभरुन घेताना त्याला थोडे परत दिल्याचे समाधान आपल्याला मिळेल.

Related Stories

संकटमोचन रामभक्त हनुमान

Omkar B

थंड पाण्याने आंघोळ करण्याचे काय आहेत फायदे;चला जाणून घेऊया…

Rahul Gadkar

एक झुंज वाऱयाशी

Patil_p

स्पर्धा परीक्षेची तयारी

Patil_p

सरकारी शाळा क्र. 45 नार्वेकर गल्ली

Patil_p

वन्यजीव सुरक्षा दिवस

tarunbharat