Tarun Bharat

श्रमदानातून शिक्षकांनी बुजविले खड्डे

शिक्षकदिनाचे औचित्य साधून उपक्रम -प्रशासनाला आता तरी जाग येणार का?

प्रतिनिधी/ बेळगाव

उद्यमबाग येथील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही त्यांच्याकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने अखेर शिक्षकांनीच पुढाकार घेत माती व खडीने खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला. शिक्षकदिनाचे औचित्य साधून ज्ञान प्रबोधन मंदिरच्या शिक्षक व व्यवस्थापनाने 700 ते 800 मीटर अंतरावरील खड्डे बुजविले आहेत. नाकर्त्या प्रशासनाविरोधात शिक्षकांनी अनोख्या पद्धतीने राबविलेल्या उपक्रमामुळे आता तरी झोपलेल्या प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बेम्को कॉर्नरपासून ज्ञान प्रबोधन मंदिर शाळेपर्यंतचा रस्ता खड्डेमय बनला आहे. मध्यंतरी माती टाकल्याने पावसाळय़ात हा रस्ता चिखलमय झाला होता. आता या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे आसपासच्या नागरिकांना येण्याजाण्यास कठीण होत आहे. या चिखलातून वाट काढत विद्यार्थी शाळेपर्यंत पोहोचत आहेत. अनेक विद्यार्थी सायकल, दुचाकी, बसने शाळेपर्यंत येतात. त्यामुळे कोणताही अपघात झाल्यास त्याला प्रशासनच जबाबदार असणार आहे.

रविवार दि. 5 सप्टेंबर रोजी देशभर शिक्षकदिन साजरा होतो. परंतु या पार्श्वभूमीवर ज्ञान प्रबोधन मंदिर शाळेच्या शिक्षकांनी खड्डे बुजविण्याचा उपक्रम हाती घेतला. खडी व लालमाती टाकून 100 हून अधिक खड्डे बुजविण्यात आले. यामध्ये शाळेचे शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेत्तर कर्मचारी व व्यवस्थापन मंडळ अशा 80 हून अधिकांनी सहभाग घेत श्रमदानातून खड्डे बुजविले.

औद्योगिक कर्मचारीदेखील काढताहेत खड्डय़ांतून वाट

शाळेच्या परिसरातच अनेक मोठे औद्योगिक कारखाने आहेत. त्यामुळे दररोज शेकडो कामगारांची या रस्त्यावरून ये-जा असते. रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांमधूनच या कामगारांना ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे या परिसरातील उद्योजक व कामगारांनाही या रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा रस्ता करण्याची मागणी करण्यात येत आहे.

उद्यमबाग येथील रस्ते दुर्गम भागातील रस्त्यांपेक्षाही खराब

-जगदीश कुंटे

शहराची औद्योगिक वसाहत असणाऱया उद्यमबाग येथील रस्ते दुर्गम भागातील रस्त्यांपेक्षाही खराब झाले आहेत. याबाबत प्रशासनाला वेळोवेळी ही बाब लक्षात आणून देऊनही त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शाळेत येणाऱया विद्यार्थी व त्यांच्या पालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता प्रशासनाने लवकरात लवकर करावा.

उद्यमबाग परिसरात प्रशासनाचे दुर्लक्ष का?

-प्रा. अनिल चौधरी

ज्ञान प्रबोधन शाळा सुरू होऊन 15 हून अधिक वर्षे झाली. परंतु सध्या येथील रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. बेळगाव शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत रस्ते चकाचक केले जात असताना शहराला लागूनच असणाऱया उद्यमबाग परिसरात प्रशासनाचे दुर्लक्ष का होत आहे?

Related Stories

बेळगाव जिल्हा स्केटिंगपटूंची निवड

Amit Kulkarni

हलगा-मच्छे बायपासप्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तोंडघशी

Amit Kulkarni

मातृभाषेतील शिक्षणामुळे उच्चपदावर भरारी!

Amit Kulkarni

उत्पादनांना बाजारपेठ मिळणे आवश्यक

Amit Kulkarni

छत्रपती संभाजीराजेंचे धर्मकार्य अतुलनीय

Patil_p

दुपारी 2 पर्यंतच बँका सुरू

Amit Kulkarni