Tarun Bharat

श्रीनिवास ठाणेदार अमेरिकन काँगेसची निवडणूक लढविण्याच्या तयारीत

मिशिगन / वृत्तसंस्था

मूळचे बेळगावातील शहापूर येथील रहिवासी आणि आता अमेरिकेत स्थायिक झालेले श्रीनिवास ठाणेदार हे अमेरिकेतील कनिष्ठ सभागृह काँगेसची निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ते सध्या मिशिगन या प्रांताच्या प्रतिनिधीगृहाचे सदस्य आहेत. त्यांनी गेल्या वर्षी डेट्रॉईटच्या तिसऱया जिल्हय़ातून या प्रांताच्या प्रतिनिधीगृहाची निवडणूक जिंकली होती.

आता ते या यशाचा पुढचा टप्पा गाठण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी मिशिगन प्रांताच्या 13 व्या जिल्हय़ातून अमेरिकन काँगेसची आगामी निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. याची पूर्वतयारी म्हणून त्यांनी ‘संशोधनात्मक समिती’ची (एक्प्लोरेटरी कमिटी) स्थापना केली आहे. ते डेमॉक्रेटिक पक्षाकडून या निवडणुकीत उतरण्यासाठी प्रयत्नशील असून आपल्याला संधी मिळेल असा विश्वास त्यांनी पत्रकारपरिषदेत व्यक्त केला.

मिशिगनच्या 13 व्या जिल्हाच्या मतदारसंघात त्यांच्या डेट्रॉईट आणि वेन सबर्बच्या काही भागांचा समावेश होतो. यात हायलँड पार्क, इंकस्टर, रिव्हर रो, एकोर्स आणि वेस्टलँड हे भागही येतात, अशी माहिती त्यांनी दिली. अमेरिकन काँगेससाठी त्यांची लढत या मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या प्रतिनिधी रशीदा लाईब यांच्याशी होण्याची शक्यता आहे.

‘तरुण भारत’शी विशेष जवळीक

श्रीनिवास ठाणेदार यांची ‘तरुण भारत’शी विशेष जवळीक आहे. तरुण भारतचे कार्यकारी संचालक (एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर) प्रसाद ठाकुर यांच्याशी त्यांच्याशी त्यांचा गाढा परिचय आहे. ठाणेदार हे मिशिगन प्रांत प्रतिनिधीगृहाचे सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर तरुण भारतने त्यांची विशेष मुलाखत प्रसिद्ध केली होती.

ठाणेदार यांचा अल्पपरिचय

ठाणेदार यांचे बालपण बेळगावातच व्यतीत झाले असून त्यांनी पदवीपर्यंतचे महाविद्यालीन शिक्षण बेळगावातच घेतले आहे. 1979 मध्ये ते अमेरिकेला गेले. तेथे त्यांनी पुढचे शिक्षण घेतानाच एका शिक्षकाचे साहाय्यक म्हणून नोकरीही केली. त्यावेळी त्यांची कमाई महिन्याला 300 डॉलर्स इतकी होती आणि त्यातील 75 डॉलर्स ते आपल्या बेळगावातील कुटुंबासाठी पाठवत असत. अशा आव्हानात्मक स्थितीत त्यांनी पीएच. डी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले तसेच नंतर फाँटबोन महाविद्यालयातून एमबीए केले. पीएच. डी. झाल्यानंतर त्यांनी काही काळ पोस्ट डॉक्टोरल रीसर्च स्कॉलर म्हणून मिशिगन विद्यापीठात काम केले. त्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरु केला. त्यांनी अनेक छोटे-मोठे उद्योग सुरु करुन उच्च वेतनाचे हजारो रोजगार निर्माण केले आहेत. आता तेथे त्यांनी यशस्वी उद्योगपती म्हणून नाव कमावले आहे. त्यांची गणना अमेरिकेतील कोटय़ाधीशांमध्ये केली जाते. त्यांना त्यांच्या औद्योगिक क्षेत्रातील कार्यासाठी तीनवेळा ‘अर्न्स्ट अँड यंग’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. ते अमेरिकेतील राजकारणातही सक्रीय असून मिशिगन प्रांताच्या प्रतिनिधीगृहाचे सदस्य आहेत. अशा प्रकारे अमेरिकेच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांमध्येही त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Stories

चीनचा गुप्तचर प्रमुख फरार, जिनपिंग धास्तावले

Patil_p

अमेरिकेच्या राजवटीतील‘कमला’ अध्याय

Patil_p

पहिल्यांदाच रशिया विरोधात मतदान

Amit Kulkarni

फ्रान्सचा मालीमध्ये एअर स्ट्राईक; 50 दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav

4 महिन्यांपासून झाडावर वास्तव्य

Patil_p

10 कोटी रंगांना ओळखू शकणारी कॉन्सेटा

Patil_p