यात्रेला भाविकांची मोठी उपस्थिती : भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
वार्ताहर / सांबरा
श्रीक्षेत्र पंत बाळेकुंद्री येथे मंगळवार दि. 11 पासून सुरू असलेल्या श्रीपंत महाराजांच्या 117 व्या पुण्यतिथी उत्सवाला हजारो भाविकांनी हजेरी लावून श्रींचे दर्शन घेतले. गुरुवारी दुपारी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी परतीची पालखी गावातील पंतवाडय़ात पोहोचल्यानंतर उत्सवाची सांगता झाली.
मागील दोन वर्षे कोरोनामुळे यात्रा मोठय़ाने होऊ शकली नव्हती. त्यामुळे यंदा यात्रेला मोठय़ा प्रमाणावर भाविकांची उपस्थिती दिसून आली. गुरुवारी दुपारी बारा वाजता महाप्रसादाला प्रारंभ करण्यात आला. महाप्रसाद घेतल्यानंतर परगावचे भाविक परतीच्या प्रवासाला निघाले. जितके भाविक महाप्रसाद घेऊन बाहेर पडत होते, तितकेच भाविक पंत बाळेकुंद्रीत दाखल होत होते. त्यामुळे मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. रहदारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना बरेच परिश्रम घ्यावे लागले. दुपारी पावसाने हजेरी लावल्याने भाविकांची गैरसोय झाली. सायंकाळपर्यंत महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत होती. दुपारी तीन वाजता श्रीपंत महाराजांच्या श्रीदत्त प्रेमलहरी या भजन गाथेतील पदावर आधारित प्रेमानंद टिपरी कार्यक्रम पार पडला. रात्री आठ वाजता परतीच्या पालखी सोहळय़ाला प्रारंभ झाला. आमराईतील पूज्यस्थानावर जाऊन पालखी गावातील पंतवाडय़ावर पोहचली व त्यानंतर उत्सवाची सांगता झाली.
भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून यमुनाक्का मुक्त अन्नछत्रच्या माध्यमातून भाविकांसाठी 24 तास चहा, नाश्ता व जेवणाची मोफत सोय करण्यात आली होती. श्रीपंत बोधपीठातर्फे श्रीपंत वाङ्मयाच्या अभ्यासावर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रीदत्त प्रेमलहरी त्रैमासिक ऑक्टोबर 2022 व श्री पंतावधूत दिनदर्शिका 2023 चे यावेळी प्रकाशन करण्यात आले.
दरम्यान, तीन दिवस चाललेल्या यात्रेला कोल्हापूर, सांगली, मिरज, पुणे, मुंबई, रायगड, नाशिक, भुदरगड, गारगोटी, गडहिंग्लज, इचलकरंजी, बेळगाव, खानापूर आदी भागातील हजारो भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. भाविकांच्या सोयीसाठी परिवहन मंडळाने निरंतर बससेवा उपलब्ध करून दिली होती.