तुळजापूर / प्रतिनिधी
श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट भक्तासाठी व परिसरातील सर्व जनता रुग्णांसाठी सुसज्ज असे मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल काढणेबाबत मंदिर संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्त यांना अॅड. शिरीष कुलकर्णी यांच्या वतीने नोटीस देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान कडे मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलसाठी वारंवार भेटून निवेदन देऊन मागणी केली होती. तसेच या संदर्भात दिनांक 27 ऑगस्ट 2019 बैठक घेऊन 11 कोटी रुपये खर्चून श्री तुळजाभवानी देवीची मूर्ती उभारण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यास विरोध करून पैसा जनकल्याणासाठी परिक्षेत्रातील जनतेसाठी वापरून तुळजापूर येथे मोठे सुसज्ज असे रुग्णालय मंदिर संस्थानाने उभे करावे असे दिनांक 31 ऑगस्ट 2019 रोजी निवेदनाद्वारे मागणी केली होती. covid-19 या साथीचा रोग येण्याअगोदर सात महिने हॉस्पिटलची मागणी केली होती. त्यानंतर ही सन 2020 मध्ये नोटीस दाराने निवेदन देऊन ट्रस्टच्या पैशाने तुळजापूर येथील सर्व जनतेसाठी व देवी भाविकांसाठी सर्व सोयीने उपयुक्त असे रुग्णालय काढावे व अल्पदरात सर्वांना उपचार करावा असे निवेदन दिले होते.
निवासी उपजिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उस्मानाबाद यांनी तहसीलदार व्यवस्थापक श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांना पत्रवजा आदेश देऊनही कारवाई करण्याचे सूचित केले व पुन्हा विश्वस्तांच्या सभेमध्ये विषय घेतला असे सांगितले. परंतु त्यावर योग्य ती कारवाई झालेली नाही असे दिसून येते. सद्यस्थितीत तुळजाभवानी ट्रस्टकडे 150 कोटी रुपये डिपॉझिट आहेत सोने-चांदी इतर मौल्यवान वस्तू त्या वेगळ्याच आहेत. हॉस्पिटल साठी जागेची उपलब्धता आहे अनेक दिवसापासून मोठमोठे भक्तनिवास बांधून धूळखात ठेवले आहेत. या इमारती सुद्धा हॉस्पिटल साठी उपयोगी ठरू शकतात.
यासाठी राज्य शासन देखील शेगावच्या धर्तीवर आर्थिक मदत करण्यास तयार होऊ शकते. तसेच एखादी दुर्घटना घडल्यास किंवा एखाद्या व्यक्तीस भाविकास हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला उपचारासाठी 50 किलोमीटर अंतरावर सोलापूर येथे घेऊन जावे लागते. यासाठी वेळ व पैसा जातो तरीदेखील वाचू शकतो. या सर्वाचा विचार करून मंदिर संस्थांनी पंधरा दिवसाच्या आत सर्व नागरिकांसाठी भक्तांसाठी अद्यावत सुसज्ज रुग्णालय काढण्यासाठी तत्पर पावले उचलावीत व केलेल्या कारवाईची माहिती नोटीसदारास द्यावी. अन्यथा उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे सदरील प्रकरण दाखल करण्यात येईल व माननीय मुख्यमंत्री यांना या नोटीस द्वारे कारवाईची माहिती दिली जाईल असे यात नमूद करण्यात आले आहे. या नोटीसवर अॅड. शिरीष कुलकर्णी व पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांच्या स्वाक्षर्या आहेत.

