Tarun Bharat

श्री समादेवीच्या वार्षिक जन्मोत्सवाला प्रारंभ

प्रतिनिधी/ बेळगाव

श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी युवा संघटना, वैश्यवाणी समाज व वैश्यवाणी महिला मंडळाच्यावतीने आयोजित श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सवाला बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून लेखिका मेधा मराठे व पोलीस उपायुक्त सीमा लाटकर, समादेवी संस्थानचे अध्यक्ष दत्ता कणबर्गी, उद्योजिका विद्या मुरकुंबी, युवा संघटना अध्यक्ष रोहन जुवळी, सचिव अमित कुडूतुरकर, युवा सचिव रवी कलघटगी, संस्थानचे विश्वस्त मोहन नाकाडी, मोतीचंद दोरकाडी, वैश्यवाणी महिला मंडळाच्या अध्यक्षा शीला बिडीकर, सचिव वर्षा सटवाणी आदी मान्यवर उपस्थित होत्या.

प्रारंभी प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या मेधा मराठे व सीमा लाटकर यांच्या हस्ते श्री समादेवीची आरती करण्यात आली. यानंतर संस्थानचे अध्यक्ष दत्ता कणबर्गी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्री समादेवीच्या मूर्तीचे व श्री समादेवी दरबाराचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यानंतर दीपप्रज्वलन करून पाहुण्यांकडून महिलांनी उभारलेल्या विविध स्टॉल्सची पाहणी करण्यात आली.

यावेळी मेधा मराठे यांनी, संक्रमण काळामध्ये नेहमीच स्त्रीशक्तीचा वाटा महत्त्वाचा आहे. असे सांगत स्त्रीशक्तीबाबत जागरुकता निर्माण करून दैवी शक्ती असलेल्या माता काली, माता दुर्गा, माता अंबाबाई व माता श्री समादेवीच्या शक्तीचे वर्णन करून त्यांनी केलेल्या शत्रूविनाशाचे महत्त्व सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी संस्कृतीबाबतही आपले विचार मांडले असून महिलांचे कलाविष्कार व महिलांच्या कार्याला उजाळा दिला. स्त्रिया जर एकत्रीत आल्या तर त्या कोणत्याही समस्यांचे निवारण करण्याबरोबरच ऐच्छिक यश संपादन करू शकतात, असे विचार त्यांनी यावेळी मांडले.

अध्यक्षीय भाषणात रोहन जुवळी यांनी देखील स्त्रीशक्तीचा सदैव सन्मान केला पाहिजे असे सांगितले. यावेळी मंडळाच्या सदस्यांच्या हस्ते उपस्थित पाहुण्यांना शाल, श्रीफळ व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत शुभांगी देवलापूरकर व मंडळाच्या अध्यक्षा शीला बिडीकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय अक्षता कलघटगी यांनी केला. सूत्रसंचालन मनीषा हणमशेट व सुनिता हणमशेट यांनी केले. वर्षा सटवाणी यांनी आभार मानले. 

कार्यक्रमाला मंडळाच्या उपाध्यक्षा शितल कुडूतुरकर व उज्ज्वला बैलूर, उप सचिव मंजुषा देवलापूरकर, खजिनदार निर्मला कणबर्गी, उपखजिनदार आश्विनी कलघटगी, सुमती कुदळे, अंजली किनारी, रजनी मुरकुंबी, रजनी केसरकर भारती केसरकर, वंदना मालशेट, राधिका कलघटगी, कांचन हणमशेट, कमल बापशेट, संगीता मदली, प्रणाली कपिलेश्वरी, स्मिता नाकाडी, जयश्री हणमशेट, संस्थानचे उपाध्यक्ष राकेश कलघटगी, उपसचिव राहुल गावडे, खजिनदार परेश नार्वेकर, वैश्यवाणी युवा संघटनेचे उपाध्यक्ष प्रवीण पिळणकर, उपसचिव प्रसाद निखार्गे, खजिनदार रुपेश बापशेट यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

Related Stories

खणगाव येथे प्रचंड वाहतुक कोंडी

Tousif Mujawar

सरकारी नियमावलीनुसार गणेशोत्सव साजरा करणार

Tousif Mujawar

कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा रास्तारोको

Amit Kulkarni

मच्छे-पिरनवाडी ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा मिळणार

Patil_p

वडगाव-येळ्ळूर रस्त्याचे कामे अर्धवट

Amit Kulkarni

कर्तव्य सोशल ग्रुपतर्फे दिव्यांगांना सायकल वाटप

Patil_p