बेळगाव : श्री सरस्वती को-ऑप. क्रेडिट सोसायटीची 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड-19 नियमावलीनुसार सरस्वती सभागृहात नुकतीच खेळीमेळीत साधेपणाने पार पडली. संस्थेचे अध्यक्ष दिवंगत प्रमोद बा. हेगडे व इतर दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रमोद हेगडे यांचे जवळचे सहकारी व मित्र उपाध्यक्ष सुधाकर शानभाग यांनी आपला जवळचा मित्र गमावल्याचे दुःख व्यक्त करून वार्षिक कार्याचा आढावा घेतला. उपाध्यक्षीय भाषण संचालक सुरेंद्र पाटणेकर यांनी वाचून दाखविले. वार्षिक अहवाल, अंदाजपत्रक, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक मुख्य कार्यवाहक अनंत शानभाग यांनी सभेसमोर मांडले. त्यास सभेने एकमताने मंजुरी दिली. संस्थेला 36.44 लाख रुपये नफा झाला असून सभासदांना 20 टक्के लाभांश जाहीर केला. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना अनंत शानभाग व संचालक श्रीधर सराफ यांनी समर्पक उत्तरे दिली. संस्थेचे सभासद प्रदीप परब यांनी कै. हेगडे यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले व संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीत त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे आवर्जून सांगितले. संस्थेच्या कार्याबद्दल पूर्ण समाधानी असून सध्याचे संचालक मंडळ संस्थेचे कार्य व्यवस्थितरित्या चालवित असल्याचे मनोगत व्यक्त केले. दिवंगत प्रमोद हेगडे यांचे सुपुत्र व सभासद प्रदोष हेगडे यांनी संस्थेच्या संचालक मंडळावर पूर्ण विश्वास असून कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. रौप्यमहोत्सवी वर्ष मोठय़ा प्रमाणात साजरे करायचे व सभासदांना 25 टक्के लाभांश देण्याचे उद्दिष्ट हेगडे यांचे होते, असे संचालक प्रकाश गोखले यांनी सांगितले. कोरोना महामारीमुळे कार्यक्रम साधेपणाने करावा लागला. पुढीलवर्षी 25 टक्के लाभांश देण्याचा प्रयत्न आम्ही करू, असे सांगून त्यांनी सर्व सभासदांचे, कर्मचारीवर्ग, बँकर्स तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहकार्य केलेल्यांचे आभार मानले. सूत्रसंचालन संचालक संध्या शानभाग यांनी केले.


previous post