Tarun Bharat

श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाडला संधी शक्य

विंडीजविरुद्ध तिसरी व शेवटची औपचारिक टी-20 लढत आज

कोलकाता / वृत्तसंस्था

विंडीजविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका यापूर्वीच 2-0 फरकाने जिंकली असल्याने भारतीय संघ आज (रविवार दि. 20) होणाऱया तिसऱया व शेवटच्या लढतीत अन्य खेळाडूंना आजमावून पाहणार, हे निश्चित आहे. विराट कोहली व रिषभ पंत यांना बायो-बबल सोडून घरी परतण्याची परवानगी देण्यात आली असून त्यांच्या जागी श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड यांना अंतिम एकादशमध्ये समाविष्ट केले जाईल, असे संकेत आहेत. सायंकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

ऑस्ट्रेलियातील आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धा अवघ्या 8 महिन्यांच्या अंतरावर असून त्या पार्श्वभूमीवर कर्णधार रोहित शर्मा विशेषतः राखीव सलामीवीर सुसज्ज ठेवण्याच्या दिशेने काही पर्याय आजमावण्यावर भर देऊ शकतो. केएल राहुलच्या गैरहजेरीत इशान किशन आघाडीवर पूर्ण निष्प्रभ ठरत आला असून त्याची जागा ऋतुराज गायकवाडला दिली जाईल, असा अंदाज आहे. ऋतुराजला या मालिकेत अद्याप संधी मिळालेली नाही.

आयपीएल 2022 मेगा ऑक्शनमधील सर्वाधिक महागडा खेळाडू ठरलेल्या इशान किशनला मुंबई इंडियन्सने 15.25 कोटी रुपयांना करारबद्ध केले. पण, झारखंडच्या या डावखुऱया फलंदाजाला विंडीजविरुद्ध अपयशाचा सामना करावा लागला. पहिल्या सामन्यात 42 चेंडूत 35 धावा जमवल्यानंतर दुसऱया लढतीत तो 10 चेंडूत केवळ 2 धावांवर बाद झाला. मुंबई इंडियन्समधील या संघसहकाऱयाला रोहित आणखी एक संधी देणार की ऋतुराजला संघात परत आणणार, हे आज नाणेफेकीवेळी स्पष्ट होईल.

पंत-कोहलीशिवाय मध्यफळी

भारतीय संघ यानंतर लंकेविरुद्ध टी-20 मालिकेत खेळणार असून इशानला आणखी संधी देणे महत्त्वाचे ठरु शकते. मध्यफळीत श्रेयस अय्यर हा विराट कोहलीची जागा घेईल, असा अंदाज आहे. मेगा ऑक्शनमध्ये तिसरा महागडा खेळाडू ठरलेल्या श्रेयसला विंडीजविरुद्ध पहिल्या दोन टी-20 लढतीत संघात जागा मिळू शकली नव्हती. भारतीय संघाने त्यावेळी अष्टपैलू खेळाडूंवर अधिक भर दिला होता.

हुडा, अवेश, सिराजबाबत उत्सुकता

दीपक हुडाने वनडे क्रिकेटमध्ये उत्तम पदार्पण केले. आता या अष्टपैलू खेळाडूला टी-20 क्रिकेटमध्ये आजमावले जाणार का, हे आज स्पष्ट होईल. जसप्रित बुमराह व शमीच्या गैरहजेरीत भारताने आतापर्यंत भुवनेश्वर कुमार व हर्षल पटेल यांना मैदानात उतरवले असून या उभयतांची कामगिरी लक्षवेधी ठरली. विशेषतः दुसऱया लढतीतील त्यांची स्लॉग ओव्हर्समधील काटेकोर गोलंदाजी निर्णायक ठरली होती. सिराज व अवेश खान यांचे पर्यायही यावेळी रोहितकडे उपलब्ध असणार आहेत. अवेशला अलीकडेच लखनौ सुपरजायंट्स संघाने 10 कोटी रुपयांना करारबद्ध केले. या युवा गोलंदाजाने मागील 12 महिन्यात खेळलेल्या 16 सामन्यात 14 बळी घेतले आहेत.

संभाव्य संघ

भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकुर, रवि बिश्नोई, यजुवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा, कुलदीप यादव, हरप्रीत ब्रार.

वेस्ट इंडीज ः केरॉन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), फॅबियन ऍलन, डॅरेन ब्रेव्हो, रोस्टन चेस, शेल्डॉन कॉट्रेल, डॉमिनिक ड्रेक्स, जेसॉन होल्डर, शाय होप, अकिल होसेन, ब्रेन्डॉन किंग, रोव्हमन पॉवेल, रोमारिओ शेफर्ड, ओडियन स्मिथ, काईल मेयर्स, हेडन वॉल्श ज्युनियर.

सामन्याची वेळ ः सायंकाळी 7 वा.

विराट कोहली, रिषभ पंतला 4 टी-20 लढतीतून ब्रेक

नवी दिल्ली ः भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विराट कोहली व रिषभ पंत यांना बायो-बबलमधून 10 दिवसांचा ब्रेक दिला असून या कालावधीत ते 4 टी-20 सामन्यात सहभागी होणार नाहीत. या 4 सामन्यात आज विंडीजविरुद्ध होणारी तिसरी टी-20 व लंकेविरुद्ध 3 टी-20 सामन्यांचा समावेश आहे. यापूर्वी, शुक्रवारी भारताने दुसरी टी-20 लढत एकतर्फी फरकाने जिंकली, त्यावेळी त्यात कोहली व पंत यांनी शानदार अर्धशतके झळकावली होती.

‘वर्कलोड मॅनेजमेंट, मानसिक स्वास्थ नजरेसमोर ठेवत सर्व क्रिकेट प्रकारातील नियमित खेळाडूंना ठरावीक अंतराने ब्रेक देण्याचा निर्णय बीसीसीआयने यापूर्वी घेतला. त्यानुसार, दोन्ही खेळाडूंना बायो-बबलमधून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली’, असे बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱयाने गोपनियतेच्या अटीवर सांगितले.

विराट कोहली व रिषभ पंत यांचा कसोटी क्रिकेटला नेहमी प्रथम पसंतीक्रम राहिला असून लंकेविरुद्ध मोहाली (4 ते 8 मार्च) व बेंगळूर (12 ते 16 मार्च) येथील 2 कसोटी सामन्यासाठी ते संघात परततील, असे संकेत आहेत. मयांक अगरवाल, आर. अश्विन, हनुमा विहारी या कसोटी स्पेशालिस्टसह कोहली, पंत या महिनाअखेरीस चंदिगढमध्ये बायो-बबलमध्ये प्रवेश करतील. कोहली व पंत यांनी दक्षिण आफ्रिका दौऱयापासून जवळपास सर्व सामने खेळले आहेत.

कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱयापासून 2 कसोटी, 6 वनडे व 2 टी-20 सामने खेळले. एका कसोटी सामन्यात तो पाठदुखीमुळे सहभागी होऊ शकला नव्हता. रिषभ पंतने 3 कसोटी, 6 वनडे व 2 टी-20 सामने खेळले असून त्यालाही विश्रांतीची आवश्यकता होती. पंत व कोहलीच्या गैरहजेरीत श्रेयस अय्यर, दीपक हुडा व ऋतुराज गायकवाड यांना संधी असणार आहे. लंकेविरुद्ध मालिकेतील शेवटची लढत आणि आयपीएल स्पर्धेच्या कालावधीत 11 दिवसांचे अंतर असून या कालावधीत खेळाडूंना किमान 6 दिवसांची विश्रांती मिळणे अपेक्षित आहे.

विंडीज अद्याप दौऱयातील पहिल्या विजयाच्या शोधात

मायदेशात इंग्लंडचा 3-2 असा धुव्वा उडवणाऱया विंडीज संघाला यंदाच्या भारतीय दौऱयात मात्र अद्याप विजयाची चव चाखता आलेली नाही. त्यांना वनडे मालिकेत 0-3 असा नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला आणि आता टी-20 मालिकेत देखील ते 0-2 अशा एकतर्फी फरकाने पिछाडीवर आहेत. निकोलस पूरन, रोव्हमन पॉवेल यांनी दुसऱया टी-20 लढतीत उत्तम फटकेबाजी केली असली व फिरकी अष्टपैलू रोस्टन चेसने प्रभावी मारा केला असला तरी विंडीजचा संघ विजयापासून दूरच राहिला. आता ती कसर भरुन काढण्याची संधी विंडीजला साधता येणार का, हे आजच्या लढतीत स्पष्ट होईल.

Related Stories

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी : भारत-पाक आज आमनेसामने

Amit Kulkarni

न्यूझीलंडविरुद्ध मालिकाविजयासाठी भारत सज्ज

Amit Kulkarni

हरियाणा स्टीलर्सची बंगाल वॉरियर्सवर मात

Patil_p

मिल्खा सिंग यांची प्रकृती खालावली

Patil_p

सायना, श्रीकांतसमोर ऑलिम्पिक निश्चितीचे लक्ष्य

Patil_p

बिग बॅश लीगमधून डिव्हिलियर्सची माघार

Patil_p