Tarun Bharat

संकट आणि सूचना

कोविड-19’ (कोरोना विषाणू) या अनपेक्षित संकटाने भारतासह जगावर घाला घातला आहे, ही बाब आता सर्वपरिचित झाली आहे. या विषाणूवर अद्याप औषध अगर लस सापडलेली नाही. आपण सारे सध्या या विषाणूरूपी शत्रूशी निःशस्त्र युद्ध करीत आहोत. अशा स्थितीत आरोग्यविषयक नियम आणि सरकारचे आदेश काटेकोरपणे पाळणे, आणि सर्व उपलब्ध सामग्रीचा योग्य आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने उपयोग करून स्वतःला या विषाणूच्या जाळय़ात सापडण्यापासून वाचविणे, हा एकमेक मार्ग आपल्यासमोर उपलब्ध आहे. अशा अभूतपूर्व प्रसंगात देशाचे सरकार व त्याचा नेता तसेच राज्यांची सरकारे आणि त्यांचे नेते यांना बहुविध आव्हानांचा स्वीकार करावा लागतो. एकीकडे रोगाचा प्रसार रोखणे, त्याचवेळी अर्थव्यवस्थेला कमीत कमी हानी होईल या दृष्टीने उपाययोजना करणे, जनतेचा धीर आणि आत्मविश्वास वाढता ठेवणे, देशाच्या हानीतच आनंद मानणाऱया तबलीगी विकृत मनोवृत्तीच्या समाजकंटकांचा बंदोबस्त करणे, कारस्थाने हाणून पाडणे, रुग्णांवर उपचार करणाऱयांना संरक्षण देणे, पोलीस आणि अंतर्गत सुरक्षा संस्थांचे नीतीधैर्य टिकवून धरणे, देशाच्या सीमेबाहेरील शत्रूंना या स्थितीचा गैरफायदा मिळू नये यासाठी सजग राहणे ही आणि अशा प्रकारची अनेक आव्हाने अंगावर घ्यावी लागतात. यापैकी अनेक आव्हाने ही परस्परविरोधी असल्याने ती एकाचवेळी स्वीकारण्यासाठी कठोर आणि कणखर उपाययोजना कराव्या लागतात. ही तारेवरची कसरत असते. त्यातच आणखी एक वरकरणी साळसूद भासणारे पण वरील आव्हानांपेक्षाही जटिल आव्हान चहूबाजूंनी मुक्त हस्ते उधळल्या जाणाऱया सूचनांचे असते. कोणत्याही विषयाचे स्वतःला संपूर्ण ज्ञान आहे, अशा भ्रमात वावरणारी अनेक तथाकथित विद्वान मंडळी अशा राष्ट्रीय संकटाच्या प्रसंगी स्वतःचे (बहुधा नसलेले) ज्ञान केवळ शाब्दिकदृष्टय़ा सिद्ध करून प्रसिद्धी मिळविण्यासाठी आसुसलेली असतात. आपल्या देशात लोकशाही असल्याने विचार स्वातंत्र्य तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची रेलचेल आहे. सध्या कोरोनाच्या संदर्भात कोणीही उठावे, कोणतेतरी वृत्तपत्र अथवा वृत्तवाहिनी पकडावी आणि त्यांच्या माध्यमातून सरकारने काय करावे, काय करू नये, सरकारचे कोठे चुकते आहे, सरकारने काय करायला हवे होते, उपाय योजना कितीही वेळेवर केली असली तरी, ती करायला कसा उशीर झाला, अमूक एका नेत्याला कसे कशातलेच काही समजत नाही, इत्यादी मुद्दय़ांवर उपदेशामृताचा रतीब घालावा, अशी स्थिती आहे. प्रत्यक्ष कोरोनालाही एकवेळ आवर घालता येईल, पण या सूचना साथीला रोखता येणे महाकठीण आहे. बरे, या सूचना खरोखरच तज्ञ असणाऱया व्यक्तींकडून येत असतील तर त्यामुळे लोकांच्या आणि प्रशासनाच्या ज्ञानात भर पडून परिस्थिती हाताळण्यास त्यांचा उपयोग होऊ शकतो. पण आपण केवळ एका विशिष्ट ‘स्थानी’ आहोत, विशिष्ट पक्षाचे नेते आहोत आणि विचारवंत आहोत, म्हणून आपल्याला सर्व काही ज्ञात आहे, अशा थाटात जेव्हा या सूचना केल्या जातात तेव्हा त्या एकतर हास्यास्पद ठरतात, किंवा त्यामुळे समाजामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होऊन लोकांची अवस्था द्विधा होते. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘लॉकडाऊन’ केवळ उपयोगाचे नाही. तर जास्तीत जास्त चाचण्या केल्या पाहिजेत, अशी सूचना नुकतीच काँगेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. मोदी सरकारच्या उपाययोजनांसंबंधी आपले मतभेद आहेत पण सध्याची वेळ वादविवाद करण्याची नाही तर, सरकारबरोबर राहण्याची आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. ही पुस्ती निश्चितच अभिनंदनीय आणि प्रशंसेस पात्र आहे. कारण खरोखरच सध्याची वेळ ही राजकीय नफा तोटय़ाचा विचार न करता एक राष्ट्र म्हणून एकजुटीने उभे राहण्याची आहे. मात्र, त्यांनी जी मूळ सूचना केली आहे ती गोंधळात टाकणारी आहे. कारण आयसीएमआर ही जी संस्था केंद्र सरकारला कोरोनाच्या कामी सहाय्य देत आहे तसेच सल्लाही देत आहे त्या संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर यांनी लॉकडाऊन हाच सर्वोत्तम उपाय प्राप्त परिस्थितीत असल्याचा निर्वाळा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम 3 आठवडय़ांचा लॉकडाऊन घोषित केला. नंतर त्यात आणखी 19 दिवसांची वाढ केली. हे महत्त्वाचे निर्णय त्यांनी आयसीएमआर या संस्थेला तज्ञांच्या संस्थेला विश्वासात घेऊन आणि या संस्थेशी प्रदीर्घ विचारविमर्श करूनच घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. कोणत्याही संकटाचा सामना करताना तात्कालिक, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन अशा तीन प्रकारच्या योजना क्रियान्वित कराव्या लागतात, असे तज्ञ म्हणतात. प्राप्त परिस्थितीत लॉकडाऊन ही तात्कालिक पण अतिमहत्त्वाची व अनिवार्य उपाययोजना होती. ती केल्याशिवाय पुढे जाणे अशक्य होते. त्यामुळे ती करण्यात आली. ही योजना जनतेसाठी कष्टप्रद आणि त्रासाची असली तरी त्यावाचून गत्यंतर नव्हते, हे कोणालाही समजण्यासारखे आहे. चाचण्या करणे ही मध्यमकालीन उपाययोजना आहे. त्यासाठी उच्चतांत्रिक साधनसामग्री लागते. ती निर्माण करणे किंवा बाहेरून आणणे यासाठी काही काळ जातो. तोपर्यंत स्वस्थ बसल्यास रोगाचा फैलाव वाढण्याची शक्यता असते. अमेरिका, चीन, इटली, स्पेन, फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन या महासत्तांनी प्रारंभी चाचण्यांवरच भर दिला होता. पण परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर त्यांनाही लॉकडाऊनचा आधार घेणे भाग पडले. भारताने हा उपाय आधीच केल्याने आज निम्म्या देशात कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. मुंबई, दिल्ली, चेन्नई इत्यादी महानगरांमध्येच प्रामुख्याने या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसतो. तबलीग प्रकरण झाले नसते तर परिस्थिती सध्यापेक्षाही चांगली असती, असे आज सर्वांनीच मान्य केले आहे. म्हणजेच जो उपाय करायचा तोच भारताने आधी केल्याने आपण निदान काही प्रमाणात तरी सुस्थितीत आहोत. त्यामुळे देशातले मान्यताप्राप्त विषाणूतज्ञ डॉ. गंगाखेडकर म्हणतात तेच योग्य वाटते. म्हणून सरकारनेही अनाहूत सूचनाकारांपेक्षा तज्ञांच्या सल्ल्यानेच पुढची वाटचाल करावी. हेच देशासाठी योग्य राहणार आहे.

Related Stories

‘टोल’ धाड संपणार का?

Patil_p

सुखदुःखे सहन करणे हेच सिद्धाचे मुख्य लक्षण आहे

Patil_p

‘कोरोना’विरोधी लढाईतील ‘प्रंटलायनर्स’

Patil_p

शेतकरी स्वातंत्र्य आणि महाराष्ट्र!

tarunbharat

रामाचे गान आणि गाण्यातला राम

Omkar B

साखरेच्या जिल्हय़ातील ऊसही डोंगा अन् रसही डोंगा!

Patil_p