Tarun Bharat

संक्रमणाच्या दुसऱया लाटेने फ्रान्स-ब्रिटन त्रस्त

सलग दुसऱया दिवशी 13 हजारहून अधिक नवीन रुग्णांची नोंद ; मृत्युमुखींच्या संख्येतही वाढ : जगात 3.09 कोटी रुग्ण

कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढू लागल्याने फ्रान्समध्ये पुन्हा भीतीदायक वातावरण पसरले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे फ्रान्स सरकार त्रस्त झाले असून सुधारित उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले जात आहेत. देशाच्या बऱयाच भागात संक्रमणावर मात केल्यानंतर ऑगस्ट अखेरपासून फ्रान्सची दुसरी लाट उसळली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार देशात एका दिवसात 13 हजार ते 15 हजार नवे रुग्ण सापडत आहेत. यापेक्षाही चिंताजनक बाब म्हणजे मृतांची संख्याही वाढून 154 झाली. प्रथमच तीन महिन्यांनंतर एका दिवसात कोरोनामुळे इतके लोक मृत झाले आहेत.

इमॅन्युएल मॅक्रॉन सरकारसमोर नवीन डोकेदुखी उद्भवली आहे. एकीकडे रुग्ण वाढत आहेत आणि दुसरीकडे सरकारच्या संभाव्य लॉकडाऊन मंजुरीला विरोध आहे. शनिवारी 13 हजार 498 नवीन प्रकरणे नोंद झाल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱयाने सांगितले. लॉकडाऊन किंवा असे कोणतेही निर्बंध लादले जाणार नाहीत. परंतु, परिस्थिती पाहता आम्हाला निर्बंधांचा विचार करावा लागेल. कारण, सध्या दुसरा कोणताही पर्याय नाही. लसीची प्रतीक्षा दीर्घ असू शकते. जरी लस आली तरी त्या सर्वांना ताबडतोब लागू करता येत नाही, असे वक्तव्य राष्ट्रपतींनी गेल्या आठवडय़ातच केले होते.

ब्रिटनमध्येही निर्बंध शक्य

फ्रान्सप्रमाणेच ब्रिटनमध्येही संसर्गाची दुसरी लाट समोर आली आहे. मार्च किंवा एप्रिलसारखी परिस्थिती येऊ देऊ नये अशी आता आपल्यावर वेळ आली आहे, असे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्पष्ट केले आहे. काही प्रकरणांमध्ये सरकार कठोर पावले उचलू शकते. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मास्क घालणे अनिवार्य केले जाऊ शकते. या व्यतिरिक्त सार्वजनिक कार्यक्रम, सभा-बैठकांवर बंदी घातली जाऊ शकते. शनिवारी देशात 4 हजार 332 नवीन रुग्णांची नोंद झाली. तथापि, या कालावधीत किती लोक मरण पावले याची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.

अमेरिकेतही कहर

अमेरिकेत 24 तासात 2 लाखांहून अधिक रुग्ण नोंदवले गेले आहेत. येथे आतापर्यंत सर्वाधिक 70 लाख संक्रमित रुग्ण सापडले असून जगभरातील रुग्णसंख्या 3 कोटी 10 लाखांपर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर आहे. अमेरिकेत संसर्ग झालेल्यांची संख्या 69 लाख 55 हजार 92 वर पोहोचली आहे. आतापर्यंत येथे 2 लाखांहून अधिक लोकांचे प्राण गमावले आहेत.

इस्त्राईलमध्ये  लॉकडाऊनला विरोध

इस्त्राईलमध्ये नेतान्याहू सरकारसाठी समस्या निर्माण झाली आहे. संसर्ग दूर करण्यासाठी सरकारने देशातील काही भागात लॉकडाऊन लादले आहे, परंतु लोक त्याचे पालन करण्यास तयार नाहीत. अल् जझीराच्या वृत्तानुसार, इस्त्राईलमधील अनेक शहरांमधील लोकांनी लॉकडाऊनविरोधात निदर्शने केली. मार्चपासून आमच्या जीवनावर वाईट परिणाम झाला आहे, असा निषेधकर्त्या लोकांचा आरोप आहे. तर काही सामाजिक संघटनांनी सरकारला आपल्या अपयशाचे दोष देशातील लोकांवर द्यायचे आहे, असा हल्लाबोल केला. सरकारने तीन आठवडय़ांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. दरम्यान, यहुदी लोकांचे नवीन वर्ष साजरे केले जात आहे. यामुळे लोक अधिक संतापले आहेत.

कोरोना रोखण्यासाठी प्राचीन औषधांचा विचार

जगात थैमान घालणाऱया कोरोनाला हद्दपार करण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीचे संशोधन सुरू आहे. मात्र, लसीचा प्रभाव आणि सुरक्षिततेबाबत साशंकता असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) कोरोना रोखण्यासाठी प्राचीन औषधांचा पर्याय शोधण्याचा निर्णय घेतला आहे. डब्लूएचओने शनिवारी आफ्रिकेतील हर्बल औषधांच्या चाचणीच्या प्रोटोकॉलचे समर्थन केले आहे.

कोरोना रोखण्यासाठी विविध पर्यायांचा विचार जगभरातून होत आहे. या जागतिक संकटावर मात करण्यासाठी प्राचीन औषधांचा पर्याय शोधण्याचा डब्लूएचओचा विचार आहे. आफ्रिकेतील मदागास्करचे राष्ट्रपती अँड्री राजोएलिना यांनी मलेरियाच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱया औषधी वनस्पती आर्टमिसीया पेयाचा प्रसार केल्यानंतर डब्लूएचओकडून याबाबतचा विचार करण्यात येत आहे. या आर्टमिसीया पेयाला कोविड ऑर्गेनिक्स ड्रिंक असेही म्हणण्यात येत आहे. हे पेय कोरोना रोखण्यासाठी उपयोगी असल्याचे राजोएलिना यांनी सांगितले आहे. त्यामुळे आफ्रिकेसह इतर देशांमध्येही या पेयाची मागणी वाढली आहे. डब्लूएचओतील तज्ञ आणि इतर आरोग्य संस्थेतील तज्ञांनी आफ्रिकेतील या हर्बल औषधीच्या वैद्यकीय चाचणीच्या प्रोटोकॉलचे समर्थन केले आहे. या टप्प्यातील चाचणी या हर्बल औषधाचा परिणाम, प्रभाव, सुरक्षितता आणि दुष्परिणाम या बाबींसाठी निर्णायक ठरणार आहे.

हे प्राचीन हर्बल औषध सुरक्षित असून प्रभावी असल्याचे चाचणीतून निष्पन्न झाल्यास या औषधीच्या वेगवान निर्मितासाठी डब्लूएचओ पुढाकार घेईल, असे संघटनेचे प्रादेशिक संचालक प्रॉस्पर टुमुसीम यांनी सांगितले.

फिलिपाईन्स : वर्षभर आणीबाणी

फिलिपाईन्सचे अध्यक्ष रोड्रिगो दुर्ते यांनी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर देशातील राष्ट्रीय आपत्कालीन काळाची मुदत वाढविली आहे. ती यावषी 13 सप्टेंबरपासून सुरू होऊन पुढील वषी 12 सप्टेंबरपर्यंत सुरू राहील. मात्र कोरोना साथीच्या परिस्थितीत सुधारणा झाल्यास त्याचा कालावधी कमी केला जाऊ शकतो, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली आहे.

45 लाखांवर रुग्ण

अमेरिका आणि भारतानंतर सर्वात जास्त संक्रमित ब्राझीलमध्ये सापडले असून तेथे 45 लाखांपेक्षा अधिक रुग्ण आहेत. तथापि, त्यापैकी 37 लाख 89 हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. त्याचबरोबर येथे 1 लाख 36 हजार 35 लोक मरण पावले आहेत.

इराण : 24 हजार मृत्यू

इराणमधील मृतांचा आकडा 24 हजारांच्या वर पोहोचला आहे. शनिवारी येथे 166 लोकांचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्याचबरोबर आतापर्यंत इराणमध्ये 4 लाख 22 हजाराहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. देशात 1 कोटी लोकसंख्येमध्ये जवळपास 4,975 लोक संक्रमित आहेत.

ऑस्ट्रेलिया: प्रवास सवलतीचा विचार

ऑस्ट्रेलियाने प्रवासावरील बंदीवर लवकरच सवलत देण्याचा विचार चालवला आहे. यासंबंधी त्यांनी राज्य सरकारांशी चर्चा केली आहे. न्यू साउथ वेल्स, क्वीन्सलँड आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलियामध्ये येत्या काही दिवसांत निर्बंध कमी करण्यात येतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, अन्य देशांमधून आलेल्या लोकांचे हॉटेलमध्ये अलगीकरण केले जाणार आहे. येथे आठवडय़ाला सुमारे 4 ते 6 हजार लोक विदेशातून दाखल होत आहेत.

Related Stories

पाकिस्तानात लसीकरणासाठी हाहाकार

Patil_p

काबूलमधील ड्रोन हल्ला ही भयंकर चूक

Patil_p

आकडा 3 कोटीच्या पार

Patil_p

महिलांना अधिकार मिळवून देणाऱया लुजैनला कारावास

Patil_p

पोर्टलँड हिंसेवरून अमेरिकेत राजकीय वाप्युद्ध

Patil_p

निदर्शकांना देशाबाहेर काढणार कुवैत

Patil_p