तिर्थकुंडे कुस्ती मैदान : संगमेशची अवघ्या सातव्या मिनिटाला बाजी, नागराज बस्सीडोनिचा प्रेक्षणीय विजय


क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
रामलिंग देवस्थान कमिटी तिर्थकुंडे आयोजित महाशिवरात्रीनिमित्त भव्य निकाली जंगी कुस्ती मैदानात कर्नाटक केसरी मठपती आखाडय़ाचा मल्ल संगमेश बिराजदार याने प्रदीप ठाकुर मध्यप्रदेश याला अवघ्या सातव्या मिनिटाला उलटी पुट्टी मारून आस्मान दाखवित तर दुसऱया कुस्तीत कर्नाटक केसरी नागराज बस्सीडोनीने सांगलीच्या शरद पवारचा एकेरी हाताचा कस चढवून घिस्सावर चीत करून उपस्थित 15 हजारहून अधिक कुस्ती शौकीनांच्या डोळय़ांचे पारणे फेडले.
तिर्थकुंडी कुस्ती मैदानात प्रमुख कुस्ती रात्री 8.45 वा. कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार व मध्यप्रदेशचा विष्णू सावर्डेकर यांचा पट्टा प्रदीप ठाकूर ही कुस्ती देवस्थान कमिटीचे चेअरमन किशोर देशपांडे, कुस्तीचे आश्रयदाते सतिश पाटील, लक्ष्मण झाजरे, सत्यप्पा मुत्यनट्टी, पुंडलिक नाकाडी, कृष्णकांत बिरजे, दामोदार नाकाडी, सुरेश भवण्णावर आदी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली.


दुसऱया मिनिटाला संगमेश बिराजदारने दुहेरी पट काढून प्रदीप ठाकुरला खाली घेत घीस्सावर परतविण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून प्रदीपने सुटका करून घेतली. तिसऱया मिनिटाला एकेरी पट काढून संगमेशने प्रदीपला खाली घेऊन एकलांगी भरण्याचा प्रयत्न केला. चौथ्या मिनिटाला पुन्हा संगमेशने चाट मारून दुहेरी पट काढीत प्रदीपला खाली घेतले, त्यानंतर त्यातून प्रदीप सुटका करण्याचा प्रयत्न करीत असताना संगमेशने प्रदीपला हवेत उचलून उलटी पुट्टी मारून त्याला आस्मान दाखविले.
दुसऱया क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी नागराज बस्सीडोनी व भोसले व्यायामशाळा सांगलीचा शरद पवार ही कुस्ती सतीश पाटील, मारूती पाटील, पिराजी मुचंडीकर, सदानंद पाटील, लक्ष्मण झांजरे, भरमा गुरव, पवन गायकवाड व एमएलआयआरसीचे कुस्ती प्रशिक्षक कृष्णा पाटील यांच्या हस्ते लावण्यात आले. या कुस्तीत दुसऱया मिनिटाला नागराज बस्सीडोनिने शरद पवारला दुहेरी पट काढुन खाली घेत मानेवरचा कस काढून घुटना डावावर फिरविण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून शरदने सुटका करून घेतली. पाचव्या मिनिटाला नागराजने शरदला एकेरी पट काढीत खाली घेऊन एकेरी हाताचा कस चढवून घिस्सा डावावर चित करून उपस्थित कुस्ती शौकीनांची मने जिंकली.
तिसऱया क्रमांकाची किरण अष्टगी व किरण जाधव कोल्हापूर ही कुस्ती अब्बासखान, अर्जुन जांबोटी यांच्या हस्ते लावण्यात आली. अवघ्या दोन मिनिटात किरण जाधव कोल्हापूर याने किरण अष्टगीचा एकचाक डावावर विजय मिळविला. चौथ्या कुस्तीत सुशांतने घुटना डावावर सचिनला फिरविताना पायाला गंभीर दुखापत झाल्याने सुशांत कंग्राळीला विजयी घोषित करण्यात आले. पाचव्या कुस्तीत रोहित पाटील कंग्राळी याने सचिन माने कोल्हापूर याच्यावर बाहेरील टांगेवर विजय मिळविला. सहाव्या कुस्तीत प्रेम जाधव कंग्राळीने श्रीकांत हल्याळचा निकाली डावावर पराभव केला. सातव्या कुस्तीत कोल्हापुरच्या सोहेल शेखने महादेव दऱयाण्णवर ईटगी याचा एकचाक डावावर विजय मिळविला. आठव्या क्रमांकाची रूपेश करले व राजवर्धन राशिवडे ही कुस्ती वेळेअभावी बरोबरीत सोडविण्यात आली. नवव्या कुस्तीत कोल्हापूरच्या भय्या पवारने पंकज पाटील चापगांववर निकाली डावावर विजय मिळविला.
दहाव्या क्रमांकाच्या मेंढय़ाच्या कुस्ती महेश तिर्थकुंडे मठपती आखाडा याने संभाजी धुंदर राशिवडे याचा बाहेरील टांगेवरती चित करून मेढय़ाचे बक्षिस पटकाविले. दुसऱया मेंढय़ाच्या कुस्तीत शंकर तिर्थकुंडेने मौलाना मजगाव याच्यावर नागपट्टी डावावर विजय मिळवून मेंढय़ाचे बक्षिस पटकाविले. त्याशिवाय पृथ्वीराज कंग्राळी, रोहित तिर्थकुंडे, पार्थ कंग्राळी, प्रज्वल मच्छे, हर्ष कंग्राळी, अमित तिर्थकुंडे, कृष्णा तिर्थकुंडे, सिद्धार्थ तिर्थकुंडे, प्रथमेश कंग्राळी, दर्शन किणये, संकेत कडोली, सुजल तिर्थकुंडे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून विजय मिळविले.
प्रारंभी आखाडय़ाचे पूजन किशोर देशपांडे व बाळू मुत्यानट्टी यांनी केले. रामलिंगेश्वर लिंग पुजन ग्रा. पं. सदस्य लक्ष्मण कोळेकर यांनी केले. सुरेश गवणावर यांनी केले. तर आखाडय़ाचे पूजन नामदेव पाटील व मारूती पाटील यांनी केले. तर आखाडय़ाचे पंच म्हणून कृष्णा पाटील, पिराजी मुचंडीकर, मालुपा येळ्ळूर, प्रशांत पाटील, जोतिबा खामकर, कृष्णा बिरजे, प्रकाश तिर्थकुंडे, बसवंत बन्नार, मारूती मजगावी, सत्याप्पा मुत्यांनट्टी, चंद्रकांत तुर्केवाडी, दुर्गाप्पा मजगावी, नवलू पाटील आदींन काम पाहिले. कुस्तीचे समालोचन प्रकाश मजगावी यांनी केले.