Tarun Bharat

संघर्षमय वर्षपूर्ती

गूढ राजकीय हालचाली आणि काही रहस्ये काळाच्या पोटात ठेवत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी मागील वर्षी सत्तेत आली. या निमित्ताने राज्याच्या सत्तापरिवर्तनाच्या राजकीय इतिहासाला व देशाच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे परस्परविरोधी विचारधारांचे तीन पक्ष एकत्र येऊन बनलेल्या सरकारला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. आंतरबाहय़ अनेक पातळय़ांवर या सरकारला संघर्ष करावा लागला. पण सर्वांना ते पुरून उरले. घटक पक्षातील कुरबुरी आणि विविध मुद्यांवरुन नाराजी, धोरणात्मक निर्णयांबाबत राज्यपालांशी वारंवार उडणारे खटके, सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा सीबीआय तपास, जीएसटी, अर्णव गोस्वामी अटक यासारख्या विविध प्रकरणांबाबत केंद्राशी झालेला झगडा, कोरोना व लॉकडाऊनच्या काळात मंदिरे उघडण्यावरून भाजपशी झालेला वाद या सर्वांचा विचार करता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारचे पहिले वर्ष हे अतिशय संघर्षमय राहिले याची नोंद घ्यावी लागेल. वास्तविक भाजप-सेना युतीच्या सत्तासंघर्षाची परिणती म्हणून महाविकास आघाडीचा जन्म झाला. कोणत्याही निवडणुकीनंतर होणाऱया सत्तासंपादनाच्या हेव्यादाव्याच्या राजकारणात सत्तेचे योग्य आणि समाधानकारक वाटप हाच कळीचा मुद्दा असतो. याच मुद्यावरुन सेना-भाजपमधील तीन दशकांची युती जशी तुटली तशी सत्तेच्या वाटपाबाबत मतैक्य झाल्यामुळेच काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांची आघाडी बनली हे वास्तव आहे. केवळ सत्तासंपादन हेच एकमेव सूत्र यामागे असते. भाजप-सेना यांची तीन दशकांपूर्वी युती झाली. राजकारणात सर्व खेळ आणि डावपेच हे सत्तेसाठीच होत असतात. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. परिणामी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी जुळवून घेत महाविकास आघाडी सरकारचा जन्म झाला. यामध्ये शरद पवार ‘गेमचेंजर’ ठरले. तथापि, या तीन चाकी सरकारची गाडी थोडय़ा प्रवासानंतर त्यांच्यातील अंतर्गत धसमुसळेपणामुळे आपोआप पलटी होईल, अशी अटकळ बांधली जात होती. पण राज्यातील खराब रस्त्यांना जणू तीन चाकीची सवय झाल्याप्रमाणे या सरकारने एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला. ज्येष्ठ नेते पवारांची राजकीय परिपक्वता आणि जाणतेपण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवलेले राजकीय शहाणपण आणि नेणतेपण तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीचा मुरब्बीपणा यामुळेच महाविकास आघाडी सरकार टिकून आहे, असे म्हणावे लागेल. वर्षभराच्या कारकिर्दीत ताणतणावाचे अनेक प्रसंग जरूर आले. लॉकडाऊन काळातील वीजबिल सवलत, विकास निधीबाबत काँग्रेसची नाराजी तसेच महाजॉब्ज पोर्टलच्या जाहिरातीमध्ये फक्त काँग्रेस नेत्यांनाच डावलल्याची भावना अशा घटनांचा उल्लेख करावा लागेल. कोरोना संघर्षाच्या काळात अत्यंत धैर्याने व संयमाने सरकारने परिस्थिती हाताळली. त्याबद्दल सरकारचे अभिनंदन करायला हवे. नियमितपणे कर्ज फेडणाऱया शेतकऱयांना दोन लाखापर्यंतची कर्जमाफी, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱयांना केलेली आर्थिक मदत, जिरायत-बागायत जमिनीसाठी दिलेले पॅकेज व रोजगार निर्मितीसाठी देश-विदेशातील कंपन्यांशी केलेले 35 हजार कोटींचे गुंतवणुकीचे सामजंस्य करार या सरकारच्या जमेच्या बाजू आहेत. महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात येण्यापूर्वी 2-4 दिवस अगोदर भाजप आणि राष्ट्रवादीतील अजित पवारांच्या नेतृत्वाखालील फुटीर गटाचे औटघटकेचे सरकार स्थापन झाले होते. यालाही एक वर्ष पूर्ण होत आहे. हे औचित्य साधत पहाटेच्या शपथविधीचा रहस्यभेद करण्याच्या उद्देशाने लेखिका प्रियम गांधी यांचे ‘ट्रेंडिग पॉवर’ हे पुस्तक बाजारात आले आणि एकच खळबळ उडाली. विधानसभा निवडणुकीनंतर व शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेण्याअगोदर शरद पवार भाजपला पाठिंबा देणार होते, हे राजकीय गुपित या पुस्तकात उघड केले आहे. राजकारण हे कधीच सरळमार्गी नसते. त्यातल्या त्यात सत्तेच्या राजकारणाचे रंग अधिकच गडद. पडद्याआडून राजकीय मंडळी सत्तेच्या सारीपाटावरील चाली कशा खेळत असतात, हे मांडण्याचा या पुस्तकात प्रयत्न केला आहे. शरद पवार, अमित शहा, अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यात गतवर्षी 4 नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत सत्तावाटपाचे सूत्र ठरले होते. एकमेकांच्या विरोधात लढल्यानंतर लोकांसमोर कसे जायचे याचाही प्लॅन ठरला होता. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत राष्ट्रवादी मदत करेल, पवारांच्या महाराष्ट्र दौऱयानंतर स्थिर सरकारच्या जनतेच्या आकांक्षा लक्षात घेऊन भाजपला पाठिंबा जाहीर करेल असा घटनाक्रम निश्चित झाला होता. पण दरम्यानच्या काळात सत्तावाटपाच्या चर्चेत सेनेने पवारांशी जास्तीत जास्त तडजोडी केल्या. पवारांना हे सोयीचे वाटले व त्यांचे मतपरिवर्तन झाले. त्यानंतर नाराज अजित पवारांनी आपला वेगळा गट भाजपसोबत नेला. पहाटेचा शपथविधी पार पाडला पण त्यांचे बंड फसले. राजकारण कसे सरळमार्गी नसते असे दाखवणाऱया ‘सिंहासन’सारख्या चित्रपटाला शोभेल असे हे कथानक वाटते. वरकरणी पुस्तकाच्या लेखिका वेगळय़ा असल्यातरी खऱया स्क्रीप्ट रायटरचे नाव गुलदस्त्यात आहे. बऱयाचवेळा राजकीय मसलती, गुपिते आणि रहस्ये काळाच्या पोटात तशाच दडून राहतात. त्यामुळे खरेखोटे ठरवणे अवघड असते. या पुस्तकातील उल्लेखावरून दावे-प्रतिदावे होऊ लागले आहेत. तथापि पवारांनी एक वर्षापूर्वी राज्यातील एक अवघड व न फुटणारी सत्तेची कोंडी फोडली, हे मात्र निश्चित. आपल्या राजकीय डावपेचांचा थांगपत्ता विरोधकांना लागू न देण्याचे कसब राजकारण्यांकडे असावे लागते. त्यामुळे आपण चार पावले पुढे जातो असे पवारांनी आपल्या आत्मचरित्रात मान्य केले आहे. कोरोनाच्या आक्रमणामुळे गेले 8-9 महिने सत्तास्थापनेच्या रहस्यमय हालचालींच्या चर्चेला ब्रेक लागला होता. त्या दबल्या होत्या. वर्षपूर्तीच्या व पुस्तकाच्या निमित्ताने त्या चर्चा पुन्हा उफाळून आल्या इतकेच.

Related Stories

समर्थ नेतृत्व

Patil_p

ऑनलाईन शिक्षणाची साहित्यिक चर्चा

Patil_p

शिक्षणाचे ‘मीडियम’

Patil_p

राष्ट्रमंच : पवारांचा पॉवर गेम!

Amit Kulkarni

वेळेचे नियोजन महत्त्वाचे…

Patil_p

वन महोत्सवाला देऊ नवी दिशा

Patil_p