Tarun Bharat

संघहितासाठी खेळा…

दक्षिण अफ्रिकेत कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर भारताने वेस्ट इंडिजला घरच्या मैदानावर चारीमुंडय़ा चीत केले असले, तरी याचे ‘श्रेय’ नेमके कोणाला द्यावे, असा प्रश्न कुणालाही पडावा. तीन सामन्यांच्या या मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आपण निर्भेळ यश मिळवले, हे खरेच. किंबहुना, यामध्ये भारतीय संघाच्या काही उणिवाही प्रकर्षाने पुढे आल्याचे दिसतात. भारतीय संघात रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव यांच्यासारखे आक्रमक फलंदाज असूनही एकाही सामन्यात आपल्याला तीनशेच्यावर धावसंख्या नेता आली नाही. दुसरीकडे जसप्रीत बुमराह, महंमद शमी, भुवनेश्वरकुमार यांच्या अनुपस्थितीत महंमद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, दीपक चहर, शार्दुल ठाकुर यांनी उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना पेश करत विंडिजला धक्के दिले. हे पाहता फलंदाजांपेक्षा गोलंदाज सरस ठरले, हे निःसंशय. तरीदेखील तुलनेत दुबळय़ा व कमकुवत वेस्टइंडिजविरूद्ध आपण जिंकलो, हे विसरून चालणार नाही. विंडिजकडे या मालिकेत गेल, हेटमायरसारखे स्फोटक फलंदाज नव्हते. त्यामुळे त्यांच्या फलंदाजीची मदार मुख्यत्वे होप, पूरन अशा काही मोजक्या खेळाडूंच्या शिरावर होती. नियमित कर्णधार कॅरन पोलार्डही शेवटच्या दोन सामन्यांमधे खेळू शकला नाही. स्वाभाविकच मालिका जिंकली असली, तरी अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित आहेत. दुसऱया सामन्यात पंतला ओपनिंगला पाठवायचा प्रयोगही अयशस्वी ठरला. प्रयोग हवेत. परंतु, ते करताना उपलब्ध पर्यायांचाही विचार व्हायला हवा. इशान किशन, के. एल. राहुल, ऋतुराज गायकवाड अशी सलामीवीरांची फळी असतानाही पंतला ओपनिंगला पाठविण्यामागचे कारण काय, हे अनाकलनीयच. पहिला सामना सोडला, तर उर्वरित दोन्ही सामन्यांमध्ये चांगली ओपनिंग मिळाली नाही. त्यामुळे मधल्या फळीवर दबाव निर्माण झाला. भारताच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकून राहता आले नाही. दुसऱया सामन्यात सूर्यकुमार यादव, तिसऱया सामन्यात अय्यर आणि पंतच्या जोरावर भारताने दोनशे साठच्या वर कशीबशी मजल मारली. मात्र, रोहित, विराटचे अपयश ठळकपणे उठून दिसले. बॅडपॅचमधून विराटला लवकर बाहेर पडावे लागेल. तर रोहितनेही कर्णधारपदाचे ओझे न बाळगता मुक्तपणे खेळणे अपेक्षित आहे. आगामी काळात टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषक होत असून, या काळात समतोल संघ तयार करणे, हे आव्हानात्मक आहे. रवी शास्त्री व विराट कोहली पायउतार झाल्यानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षक व कर्णधारपदाची धुरा अनुक्रमे राहुल द्रविड व रोहित शर्मा यांच्याकडे आली आहे. या जोडगोळीला विश्वचषकाच्या दृष्टीने नव्याने संघबांधणी करावी लागेल. विंडिजवरील विजयाने हुरळून न जाता हे मिशन त्यांना तडीस न्यावे लागणार आहे. विराट व रोहितमधील दरी मिटविणे व संघात एकजीनसीपणा निर्माण करणे, हाही त्यातील महत्त्वाचा भाग. दुसऱया बाजूला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत मिळालेल्या यशावरूनही ‘श्रेयवाद’ सुरू झाला आहे. विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारताने ऑस्टेलियाला कसोटी मालिकेत अस्मान दाखवले होते. माझ्या निर्णयामुळे विजय झाला, मात्र श्रेय दुसऱयाने घेतले, असे विधान करून रहाणेने तत्कालीन प्रशिक्षक रवी शास्त्राr यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. या टीकेत तथ्य असेलही. त्याच्या खेळीने आपण भरारी घेतली, ही वस्तुस्थितीच होय. मात्र, रहाणेच्या बॅटमधून निघणारा धावांचा ओघ आता लक्षणीय आटला आहे, हेही मान्य करायला हवे. रहाणेला अनेकदा संधी मिळूनही त्याचे सोने करण्यात तो अपयशी ठरतो आहे. पूर्वपुण्याईवर संघातील स्थान किती दिवस अबाधित राहणार, याचा विचार त्यानेही करावा. त्याचबरोबर श्रेय, अपश्रेयाच्या मुद्दय़ाकडे लक्ष देण्यापेक्षा कामगिरी सुधारण्याकडे त्याच्यासारख्या खेळाडूने अधिक लक्ष दिल्यास ते योग्य होईल. बोलंदाजीतून काही साध्य होणार नाही. हे त्याने ध्यानात घेतले पाहिजे. क्रिकेटपटू आणि क्रिकेटरसिकांचा फेव्हरिट इव्हेंट असलेल्या आयपीएलचा लिलावही चर्चेचा विषय न ठरला, तर नवल. यात इशांत किशन, श्रेयस अय्यर यांच्यासारख्या खेळाडूंना विक्रमी भाव मिळाल्याचे पहायला मिळते. आयपीएलमुळे अनेक खेळाडूंना व्यासपीठ मिळाले. संधी मिळाली, हे नाकारता येणार नाही. परंतु, या बाजारात आपला क्लास हरविणार नाही ना, याचे भान खेळाडूंनीही ठेवले पाहिजे. अलीकडे बहुतांश खेळाडूंचा प्राधान्यक्रम हा आयपीएल हाच असतो. झटपट पैसा, प्रसिद्धी यामुळे आयपीएलमध्ये ते अधिक रमतात. परंतु, आयपीएल अंगवळणी पडल्याने क्रिकेटपटूंमधील मूळ क्रिकेट बिघडते आहे. स्वाभाविकच एकदिवसीय, कसोटी क्रिकेटमध्ये ही मंडळी उघडी पडतात. वास्तविक, कसोटी क्रिकेट हे मूळ क्रिकेट आहे. तेथे खऱया अर्थाने खेळाडूंचा कस लागतो. हे पाहता आयपीएलच्या नादी लागून आपली तंत्रशुद्धता हरविली जाऊ नये, याची काळजी संबंधितांनी घेतली पाहिजे. त्याचबरोबर आपली गुणवत्ता खऱया अर्थाने सिद्ध करायची असेल, तर रणजी सामने खेळायला हवेत. निवड समितीनेही केवळ आयपीएल आधारित कामगिरी ध्यानात घेऊन खेळाडूंची निवड करू नये. तर रणजी तसेच अन्य देशांतर्गत स्पर्धांमधील त्याची कामगिरी कशी आहे, याचा आढावा घ्यावा. म्हणजे या स्पर्धांमधून हार्दिक पंडय़ासारखे खेळाडू माघार घेणार नाहीत. यश आणि अपयश हा कोणत्याही खेळाचा अविभाज्य भाग असतो. ते मनावर घेण्याचे कारण नाही. तथापि, 100 टक्के योगदान देण्याचा प्रत्येक खेळाडूचा प्रयत्न असायला हवा. कोणताही संघ असो, कर्णधार असो वा खेळाडू. वैयक्तिकऐवजी संघहितासाठी ते खेळत राहिले, तर त्याचे श्रेय त्याला आज ना द्या मिळणारच. त्यामुळे खेळाडूंनी फिटनेस सांभाळत खेळत रहावे.

Related Stories

ज्याचा अवगुण झडेना !तो पाषाणाहून उणा !!

Patil_p

कोरोना लक्षणरहितांचेच विलक्षण आव्हान

Patil_p

खंडित निर्णय

Amit Kulkarni

युद्धाच्या उंबरठय़ावर

Patil_p

दीक्षा, ध्यान आणि गायत्रीमंत्र सत्वशुद्धी साधून देतात

Patil_p

चित्रलेखेचा द्वारकेत प्रवेश

Patil_p