सेलिब्रिटी कलाकारांच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमीच आवडत असते. कधी कधी तर कलाकारच असे म्हणतात की आमच्या खासगी आयुष्यात पडू नका. पण जेव्हा एखादा कलाकारच अत्यंत खासगी प्रश्न चाहत्यांना विचारून त्यांच्या मताने निर्णय घेण्याचे ठरवतो तेव्हा ते चाहते किती खुश होत असतील ना? अभिनेता संतोष जुवेकरने नुकताच हा आनंद त्याच्या चाहत्यांना दिलाय. संतोषने त्याचा एक अत्यंत खासगी प्रश्न चाहत्यांना विचारला आणि तोही हजारो फॉलोअर्स असलेल्या भर इन्स्टापेजवरून. त्याच्या चाहत्यांनीही त्याला पडलेला टू बी कि नॉट टू बी हा प्रश्न सोडवायला चांगलीच मदत केली. असा कोणता पर्सनल प्रश्न संतोषने चाहत्यांना विचारला माहित आहे का ? संतोषने मिशीतला फोटो पोस्ट करून मिशी काढू की ठेवू यावर चाहत्यांचे मत विचारले. वाढलेल्या मिशीला संतोषने ओठावर सुरवंट उगवला आहे असं म्हणत हा फोटो शेअर केला आहे. अर्थातच या मिशी लूकमध्ये तू खूप छान दिसतोस असा सल्ला देत चाहत्यांनीही मूछे हो तो संतोष जैसी असा टॅग जोडला आहे.
संतोष जुवेकर हा सोशलमीडियावर नेहमीच चर्चेत असतो. वेगवेगळय़ा लूकमधले फोटो आणि त्याला हटके व मजेशीर कॅप्शनमुळे संतोषच्या इन्स्टापेजवर कमेंटचा पाऊस सुरू असतो. लॉकडाउनकाळातही संतोषने फनी व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून घरात बसलेल्या चाहत्यांना खूप हसवलं होते. शूटिंगसाठी लंडनला गेला असता लॉकडाउनमुळे तिथे अडकल्यानंतर मित्राच्या घरातील किस्से सांगूनही संतोषने केले. त्याने मिशीवरून केलेला सवालजवाबही चांगलाच व्हायरल झाला आहे.
मी मकरंद राजाध्यक्ष या नाटकापासून संतोषने त्याच्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली. या गोजिरवाण्या घरात या मालिकेतून तो घराघरापर्यंत पोहोचला. पिकनिक, ब्लाइंड गेम, आनंदाचे झाड, मोरया, झेंडा, मुंबई मेरी जान हे त्याचे सिनेमे गाजले आहेत. लवकरच त्याचा पावनखिंड हा बहुचर्चित सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यातील माझा राजा या गाण्यावर त्याने अप्रतिम डान्स केला आहे.