Tarun Bharat

संदेश झिंगन, सुरेश यांना एआयएफएफ पुरस्कार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताच्या वरिष्ठ फुटबॉल संघातील डिफेंडर संदेश झिंगनची एआयएफएफने वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटू पुरस्कारासाठी निवड केली तर सुरेश सिंग वांगजमला 2020-21 या मोसमातील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू पुरस्कारासाठी निवडण्यात आले.

संदेश झिंगनला वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा बहुमान पहिल्यांदाच मिळाला असून 2014 मध्ये त्याने सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार मिळविला होता. आयएसएल व आय लीग क्लब्सच्या प्रशिक्षकांनी दिलेल्या मतांच्या आधारे या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. संदेशने 2015 मध्ये गुवाहाटीतील सामन्यात राष्ट्रीय संघात पदार्पण केले असून आतापर्यंत त्याने 40 सामन्यात देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने आतापर्यंत चार गोल नोंदवले आहेत. 2018 मध्ये भारताने इंटरकॉन्टिनेन्टल चषक पटकावला होता, त्या संघाचा तो सदस्य होता. याशिवाय 2019 मध्ये आशियाई चॅम्पियन्स कतारला मायदेशात झालेल्या सामन्यात भारताने बरोबरीत रोखले होते, त्या संघातही संदेशचा समावेश होता. पाच सामन्यात त्याने राष्ट्रीय संघाचे नेतृत्व केले आहे. गेल्या वर्षी त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

20 वर्षीय सुरेशने यावर्षीच ओमानविरुद्ध झालेल्या सामन्यात राष्ट्रीय संघात पदार्पण केले. 2017 मध्ये झालेल्या फिफा यू-17 विश्वचषक स्पर्धेत तो भारतीय संघाचा सदस्य होता. आय लीगमध्ये तो एआयएफएफ अकादमीच्या इंडियन ऍरोज संघातून खेळला आहे. मिडफिल्डमध्ये खेळणाऱया सुरेशने आतापर्यंत पाच सामन्यात देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. जूनमध्ये दोहा येथे झालेल्या विश्वचषक पात्रता स्पर्धेतील तीनही सामन्यात तो सहभागी झाला होता. एआयएफएफ अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी दोन्ही खेळाडूंचे निवडीनंतर अभिनंदन केले आहे.

Related Stories

लिपझिगचा हॉफेनहेमवर एकतर्फी विजय

Patil_p

टी-20 मालिकाविजयासाठी विराटसेना सज्ज

Patil_p

भारतीय युवा संघ विक्रमी पाचव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन्स!

Patil_p

वेल्सचा तुर्कीवर एकतर्फी विजय

Amit Kulkarni

मनिका बात्रा पहिल्याच फेरीत पराभूत

Patil_p

सात्विक-चिराग उपांत्य फेरीत दाखल

Patil_p