Tarun Bharat

संसर्ग साखळी कशी तुटणार ?

मागच्या वर्षाप्रमाणे कडक लॉकडाऊन राज्य सरकार आणि सामान्य नागरिक दोघांनाही व्यावहारिकदृष्टय़ा परवडणारे नाही. कडक निर्बंध आणि लॉक डाऊनच्या सीमारेषेवर मात्र संसर्ग साखळी कशी तुटणार हा प्रश्न अनुत्तरित राहतो.

टाळेबंदीची वर्षपूर्ती कडक निर्बंधांचे नियम, दुसऱया लाटेत कोरोनाचा चढता आलेख, लसीकरणातील अडथळे यातील कोणतेही मुद्दे सध्या त्रास दायक ठरत नसतील. मात्र दर पंधरा दिवसांनी येणारे प्रत्येक धर्मियांचे सण उत्सव सांभाळताना संसर्ग साखळी कशी तुटणार याचेच खरे आव्हान सध्या उभे ठाकले आहे. मुंबईसह ठाणे मंडळातील दररोज 12 हजाराच्या संख्येत वाढती आकडेवारी तर त्या पाठोपाठ पुणे मंडळातील 9 हजाराच्या संख्येतील रुग्णवाढ, नागपूर मंडळात येणाऱया निव्वळ पाच भागातील 5 हजाराची रुग्ण संख्या पाहून हा संसर्ग कसा रोखला जाणार याची चिंता वाढत आहे. राज्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी कधी होणार असा प्रश्न सरकारलाच नव्हे तर सर्वसामान्यांनाही सतावत आहे. कोरोना माघारी फिरला असे वाटत असतातानाच नव्या वर्षापासून कोरोनाने दुसऱया लाटेचा प्रभाव दाखविण्यास सुरुवात केली. तरी बरे या लाटेच्या वेळी आपल्या हातात मास्क, सॅनिटायझर यासोबत प्रभावी अशी कोरोना प्रतिबंधात्मक लसदेखील आहे. तरीही सरकारसह नागरिकही हवालदिल दिसून येत आहेत. दिवाळीनंतर कमी होणारी रुग्ण संख्या कोरोना गेला असल्याचा समज सर्वानीच करून घेतला आणि आपण पुन्हा सामाजिक सोहळ्यातून, प्रवासातून पुन्हा एकदा बेकायदेशीररित्या एकत्र येऊ लागलो. तसे पाहिल्यास सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय तज्ञांनी वर्षभरापूर्वीच दुसरी लाट पहिल्या लाटेहून भयंकर असेल असा इशारा दिला होता. मागच्या वेळी लक्षणांसह कोरोना रुग्णाला ओळखणे सहज होत होते. मात्र जानेवारी महिन्यापासून वाढत्या रुग्णसंख्येतील 70 टक्के रुग्ण लक्षणरहित असल्याचे डॉक्टर सांगत आहेत. लक्षणेच नसल्याने तो रुग्णही बेलाशक सर्वांमध्ये मिसळत राहणार. या मिसळण्यातून तो आणखी काही जणांना कोरोना संसर्ग देऊन जात आहे. रुग्ण लक्षणरहित असणे हेच दुसऱया लाटेतील मोठे आव्हान आहे. मार्च मध्यंतराच्या 8 दिवसाच्या राज्यातील कोरोना आकडेवारीवर लक्ष दिल्यास चक्कर येणारी वाढ आढळून आली. गेल्या 8 दिवसात राज्यात तब्बल 2,64,728 इतकी रुग्णवाढ झाल्याचे समोर आले. तर एकटय़ा मुंबईतील गेल्या आठवडय़ातील एकूण रुग्ण संख्या 39,796 एवढी आहे. रुग्ण वाढीला अटकाव करण्यासाठी जरी लसीकरणाचा वेग वाढवला असले तरीही हा प्रयत्न थिटा पडत आहे. देशात महाराष्ट्र तर महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे पिंपरी चिंचवडसारखी घनदाट वस्तीची शहरे दुसऱया लाटेचे प्रमुख बळी ठरत आहेत. शहरांमध्ये कोरोना रुग्ण मोठय़ा संख्येत आढळून येत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन करावे की निर्बंध कडक करावेत या द्विधेत निर्णय हेलकावे खात आहे. तसे पाहिल्यास यापुढे राज्य सरकार आणि सामान्य नागरिक दोघांनाही मागच्या वर्षाप्रमाणे लॉक डाऊन करणें व्यावहारिक दृष्टय़ा परवडणारे नाही. आधीच राज्याची आर्थिक स्थिती खालावली असताना अधिक खालावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या सीमारेषेवर मात्र संसर्ग साखळी कशी तुटणार हा प्रश्न कायम आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परवा बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोरोनाचे रुग्ण वाढत असतील तर काही शहरांमध्ये लॉकडाऊन करावा लागणार असा सूर होता. मात्र होळीच्या पार्श्वभूमीवर ते कडक निर्बंधांवर निभावले. तर लॉकडाऊन अव्यवहार्य वाटत असल्यास कोरोनासंबंधीच्या नियमांचे पालन सर्वाना करावे लागणार आहे. त्यातूनच होलिका दहनाच्या सार्वजनिक उत्सवावर गदा आली. म्हणून मुंबईत सायंकाळी 7.30च्या आत कार्यक्रम आटोपण्यास सांगण्यात आले. याचे स्वरूपही अगदी मर्यादित ठेवण्यात आले होते. तरीही सोमवारी नागरिकांनी बेजबाबदारपणे धुळवड साजरी केली असल्याचे दृश्य शहरातील बहुतांश भागात होते. पोलिसांपासून लपून छपून धुळवड साजरी केली जात होती. या धुळवाडीत कोरोना निर्बंध सर्रास तोडण्यात आले. सोमवारच्या धुळवडीत गेल्या वर्षीचा लॉकडाऊन विसरला होता. त्यामुळे एप्रिल महिन्यात सरकार पुन्हा एकदा कठोर निर्णय घेईल अशी चिन्हे दिसून येत आहेत.सुरुवातीला कोरोनाबाबत भीतीदायक अशी वातावरण निर्मिती झाली होती. मात्र लगेचच कोरोना मृत्यू दर कमी असल्याचेही सांगण्यात येत होते. याचा लोकांवर विरुद्ध परिणाम झाला. यातून काही अंशी लोक बेफिकीर झाले. मात्र याचा फटका मधुमेही आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनाही या बेफिकीरीचा फटका पडला.

सध्या राज्यात शेकडोच्या संख्येत मृत्यू होत असतानाही सोमवारी मुंबईत लपून छपून रंग खेळला जात होता. हे दृश्य कोरोना जोरावर असताना घडत आहे. सण उत्सवादरम्यान कोरोना जागरूकता निर्माण होण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, बचत गट, उत्सव मंडळ  यांच्यात बैठक घेऊन यावर जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱया लाटेत नुकसान अधिक आहे. पहिल्या लाटेत भीतीतून सतर्कता निर्माण झाली होती. त्या तुलनेत सध्या 25 टक्केही सतर्कता नसल्याचे दिसून येत आहे. याच दरम्यान सरकारी यंत्रणेतही शिथिलता आली असल्यास ती झटकावी लागणार आहे. यात महत्त्वाचे म्हणजे संसर्ग तोडण्यासाठी सध्या लॉकडाऊनवर बोलले जाते आहे. मात्र कडक लॉकडाऊन ही आरोग्य यंत्रणा नीट करण्यास केली जाऊ शकते. मात्र लॉकडाऊनमुळे संसर्ग थांबण्याची शक्यता फारच कमी असल्याचे डॉक्टरच मत मांडत आहेत. अशा वाढत्या कोरोना प्रकरणावर नियंत्रण आणण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर ट्रेसिंग आणि होम आयसोलेशन करणे गरजेचे आहे. यात मास्क आणि सोशल डिस्टंसिंग महत्त्वाचे आहे. सध्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग प्रभावीपणे केले जात नसल्याचे आरोप करण्यात येत आहेत. कोरोनाबाबत जागरूकता आणि गंभीरपणा नसल्यास संसर्ग साखळी तुटणे नक्की आव्हानात्मक असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

 सध्या स्वतःचे आरोग्य आणि कुटुंब महत्त्वाचे असून त्याची काळजी घेण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. सर्वच पातळ्यांवर महापालिका किंवा राज्य सरकार मदतीला येऊ शकत नाही. सरकार कडून करण्यात आलेल्या आवाहनाला साथ दिल्यास नक्कीच कोरोना संसर्ग साखळी तुटण्यास मदत होईल एवढे मात्र खरे… !

                            -राम खांदारे

Related Stories

विरुद्धाचरण कन्याधामीं

Omkar B

ब्रह्म हे एकटेएकच असून ते अनेक स्वरूपांनी भासते

Patil_p

निर्लेपाचे ..अलिप्तपण

Patil_p

व्यावसायिक व्यासपीठाची भांडवलशाहीः अर्थव्यवस्थेचा अलीकडचा चेहरा

Patil_p

ग्रहण रहस्य

Amit Kulkarni

कोयना प्रकल्पाचे सुरक्षा ऑडीट आवश्यक!

Patil_p