मुंबई / ऑनलाईन टीम
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी एनआयएच्या कोठडीत असलेल्या सचिन वाझेचे सहकारी एपीआय रियाज काझी यांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी रियाझ काझी यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी करण्यात आली होती. पुरावे नष्ट केल्याचा आरोप रियाझ काझींवर ठेवण्यात आला आहे.
सचिन वाझेला रियाज काझी यांनी मदत केल्याचा आरोप एनआयएचा आहे. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके आढळल्यानंतर मनसुख हिरेना यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. याप्रकरणी यापूर्वी सचिन वाझेला अटक करण्यात आली आहे.
रियाज काझी कोण आहेत ?
रियाज काझी हे २०१० च्या पीएसआय बॅचमधील पोलीस अधिकारी आहेत. काझी २०१० सालच्या १०२ व्या बॅचमधील अधिकारी आहेत. पोलीस दलातील काझी यांची सगळ्यात पहिली पोस्टिंग वर्सोवा पोलीस स्टेशन करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची दुसरी पोस्टिंग अँटी चेन स्नॅचिंग विभागात करण्यात आली. पीएसआयवरून एपीआय पदावर प्रमोशन झाल्यानंतर रियाज काझी यांची तिसरी पोस्टिंग मुंबई पोलिसांच्या सीआययु पथकात करण्यात आली. ९ जूनला सचिन वाझेंनी सीआययु पथकाचे इंचार्ज म्हणून पदभार स्वीकारला. तेव्हापासून रियाज काझी हे सचिन वाझे यांच्यासोबत काम करत होते. वाझे यांच्याशी चांगले संबंध असणारा अधिकारी म्हणून रियाज काझी यांची ओळख आहे.

