Tarun Bharat

सत्ता मिळाल्यास स्वस्त दरात पेट्रोल

अरविंद केजरीवाल यांची घोषणा l ’13 सूत्री गोवा मॉडेल’चे केले अनावरण

प्रतिनिधी /पणजी

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा वारसा पुढे नेण्याचे यापूर्वीच आश्वासन दिलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात ’आप’ चे सरकार आल्यास गोमंतकीयांना स्वस्त दरात पेट्रोल उपलब्ध करून देण्याची घोषणा केली व पर्रीकरांचा वारसा खऱया अर्थाने पुढे नेण्यास आपण कटीबद्ध असल्याचे स्पष्ट केले.

गोवा भेटीवर आलेले आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक केजरीवाल यांनी काल रविवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. पत्रकार परिषदेस व्यासपीठावर दिल्लीच्या आमदार आतिशी, स्थानिक नेते राहूल म्हांबरे, वाल्मिकी नाईक, सिसिल रॉड्रिग्स, प्रा. रामराव वाघ, ऍड. अमित पालेकर, आदींची उपस्थिती होती. या पत्रकार परिषदेदरम्यान केजरीवाल यांनी ’आप’च्या ’13 सूत्री गोवा मॉडेल’चे अनावरण केले. त्यात प्रामुख्याने रोजगार, खाणकाम, जमीन हक्क, शिक्षण, आरोग्य यांसह गरजवंतांना विविध प्रकारे आर्थिक आधार योजनांचा समावेश आहे. ’आप’चे सरकार आल्यास राज्यातील प्रत्येक कुटुंबाला पाच वर्षांत 10 लाखांचा लाभ मिळेल, अशी हमी दिली.

राज्यात बेरोजगारी हा प्रमुख मुद्दा असून पक्षाने निवडणूक जिंकल्यास सहा महिन्यांच्या आत राज्यातील खाणी सुरू करून खाण अवलंबितांचे सर्व प्रश्न सोडविण्यात येतील. पूर्णतः गुणवत्तेच्या आधारावर सरकारी नोकऱया देण्यात येतील. त्यामुळे कोणत्याही मंत्री, आमदाराचा वशिला किंवा नोकरीसाठी लाखो रुपये लाच द्यावी लागणार नाही असे सांगून बेरोजगाराला काम मिळेपर्यंत प्रत्येकी 3000 रुपये भत्ता देईल, असे आश्वासन केजरीवाल यांनी दिले. राज्यातील 18 वर्षांवरील महिलांना दरमहा रु. 1000 देणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

जमिनीच्या हक्कांचे प्रश्न सोडविणे, सरकारी शाळांची स्थिती सुधारणे, प्रत्येकाला मोफत शिक्षण, व्यापार आणि उद्योग भरभराटीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे, यांचाही 13 सूत्री मॉडेलमध्ये समावेश आहे.

आज गोव्यात गोमेकॉ हे एकच सरकारी रुग्णालय आहे. येथे व्यवहारिकदृष्टय़ा प्राथमिक आरोग्य केंद्रे अस्तित्वात नाहीत. त्यामुळे त्यांना उर्जीतावस्था देण्यासाठी प्रत्येक प्रभागात दवाखाने सुरू करण्यात येणार असून सर्वांना मोफत वैद्यकीय सेवा देण्याची योजना आहे, असे केजरीवाल पुढे म्हणाले.

प्रत्येक कुटुंबाला पाच वर्षांत 10 लाखांचा लाभ

राज्यात आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यास मोफत वीज, मोफत पाणी,  बेरोजगारी भत्ता, गृहआधार, मोफत आरोग्य सेवा, मोफत शिक्षण आदींच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला वार्षिक सरासरी 2 लाख रुपये म्हणजेच पाच वर्षांत रु. 10 लाख इतका फायदा होणार आहे, असे केजरीवाल यांनी सांगितले. त्यामुळे निवडणुकीपूर्वी एखादा उमेदवार किंवा पक्षाकडून लाच स्वरुपात मिळणाऱया 5 हजार रुपयांना बळी पडायचे की पाच वर्षांत होणारा 10 लाख रुपये फायदा मिळवायचा त्याचा विचार स्वतः मतदारांनी करावा व आम आदमी पक्षाला विजयी करावे, असे आवाहन केजरीवाल यांनी केले.

आप चे ’13-सूत्री गोवा मॉडेल’

 • 1) भ्रष्टाचारमुक्त सरकार
 • 2) 24 तास मोफत वीज
 • 3) 24 तास मोफत पाणीपुरवठा
 • 4) सर्वांसाठी रोजगार
 • 5) सहा महिन्यांत खाणी सुरू
 • 6) सहा महिन्यांत जमिनीच्या हक्कांचे प्रश्न सोडवणे
 • 7) सर्वोत्तम सुविधांसह मोफत शिक्षण
 • 8) प्रत्येक प्रभागात मोफत आरोग्य सेवा
 • 9) प्रत्येक महिलेस दरमहा 1000 रुपये भत्ता
 • 10) शेतकऱयांचे प्रश्न सोडवले जातील
 • 11) व्यापार-उद्योगांसाठी पोषक वातावरण
 • 12) पर्यटन विकासाची आंतरराष्ट्रीय मानके
 • 13) दर्जेदार रस्त्यांचे जाळे विणणे

वडिलांचा वारसा पुढे नेण्यासाठी उत्पलनी आपमध्ये यावे : केजरीवाल

आधुनिक गोव्याचे शिल्पकार असलेल्या पर्रीकर यांचा सध्या भाजपला पूर्णपणे विसर पडला असून त्यांचा पूत्र उत्पल पर्रीकर यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात येत आहे. हा प्रकार म्हणजे भाजपने पर्रीकर यांच्याशी केलेली प्रतारणाच आहे. अशावेळी आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेण्यासाठी उत्पल पर्रीकर यांनी आम्हाला साथ द्यावी, आम्ही त्यांचे पक्षात स्वागत करू, असे भावनिक आवाहन केजरीवाल यांनी केले. पर्रीकर यांचा आपण खूप आदर करतो. त्यांचा वारसा पुढे नेण्याची आमची इच्छा आहे. त्यामुळे उत्पल यांची आम आदमी पक्षात येण्याची इच्छा असल्यास पक्ष त्यांचे निश्चितच स्वागत करेल, असे केजरीवाल म्हणाले. दरम्यान, एका प्रश्नावर बोलताना केजरीवाल यांनी निवडणुकीपूर्वी अन्य कोणत्याही पक्षाशी युती करण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला.

Related Stories

कुंकळ्ळीतील मार्केट 11 पर्यंत बंद

Amit Kulkarni

एकही गाव पाण्यासाठी तळमळू नये यासाठी प्रयत्न

Amit Kulkarni

‘डेल्टा प्लस’ रोखण्यासाठी सीमेवर ‘स्क्रीनिंग’

Amit Kulkarni

गोव्यातील बहुतेक प्रकल्प 2022 पर्यंत पूर्ण

Amit Kulkarni

सांगे, केपेतील शेतकरी मोठय़ा प्रमाणात झेंडू लागवडीत

Amit Kulkarni

कर्नाटकचा ‘डीपीआर’ मिळूनही सरकार गप्प

Amit Kulkarni