Tarun Bharat

सदाशिवगड किल्ल्याला पर्यटनस्थळ बनविणार

कारवार-अंकोलाच्या आमदार रुपाली नाईक यांची माहिती : तीन कोटीचा निधी मंजूर

पी. के. चापगावकर / कारवार

येथून पाच-सहा किलोमीटर अंतरावरील सदाशिवगड येथील सदाशिवगड किल्ला परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकास घडवून आणण्यासाठी राज्य सरकारने तीन कोटीचा निधी मंजूर केल्याची माहिती कारवार अंकोलाच्या आमदार रुपाली नाईक यांनी दिली. किल्ल्याचा परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकास घडवून आणण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. यासंबंधी लोकप्रतिनिधीकडे यापूर्वी निवेदने सादर करण्यात आली होती. तथापि फलश्रृती मात्र शून्य. आता मात्र आमदार नाईक यांनी सदाशिवगड किल्ला परिसर सौंदर्यीकरणाच्या प्रकरणाचा पाठपुरावा करून तीन कोटी रुपये मंजूर करून घेण्यात  यश मिळविल्याने स्थानिकांतून आणि इतिहासप्रेमींतून समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच किल्ल्यावर वेगवेगळी कामे हाती घेण्यासाठी सरकारने दीड कोटी रुपये उपलब्ध करून दिल्याने ऐतिहासिक आणि रमणीय पार्श्वभूमी असलेल्या सदाशिवगडच्या किल्ल्याच्या सौंदर्यात येत्या काळात अधिकच भर पडणार आहे.

काळी नदी आणि अरबी समुद्राच्याजवळ असलेला हा किल्ला काळाच्या ओघात आणि विकासाच्या नावाखाली आपले वैभव गमावून बसला आहे हे खरे असले तरी किल्ला आपले ऐतिहासिक अस्तित्व टिकवून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला भेट देऊन किल्ल्यावरील दुर्गादेवीचे दर्शन घेतले होते. असा स्पष्ट उल्लेख इतिहासात आढळतो. हा किल्ला शिवाजी महाराजांच्या आगमनापूर्वीच सोंद येथील राजाने बांधला होता. तरीसुद्धा महाराजांनी या किल्ल्याला दोनवेळा भेट दिल्याने स्थानिक जनतेकडून शिवाजी महाराजांचा किल्ला म्हणूनच तो ओळखला जातो.

किल्ला नेमका आहे कुठे

येथून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील काळी नदी आणि अरबी समुद्राच्या संगमाजवळ एका टेकडीवर किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी श्री दुर्गादेवीचे पुरातन मंदिर आहे. मंदिरापासून हाकेच्या अंतरावर शा शमशुद्दीन दर्गा आहे. दुर्गादेवी मंदिरासमोर इतिहासाची साक्ष देणाऱया तोफा जतन करून ठेवल्या आहेत. 35 ते 40 वर्षांपूर्वी काळी पुलाला जोड रस्ता तयार करण्यासाठी किल्ल्याचे दोन तुकडे करण्यात आले. आता पुन्हा काळीनदीवर आणखी एक पूल बांधून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले.

रमणीय परिसर लाभलेला किल्ला

किल्ल्याचा परिसर एवढा रमणीय आहे की, किल्ल्यावरून पश्चिमेला नजर टाकली की, निळाभोर अरबी समुद्र पहायला मिळतो, समुद्रातील बेटे आणि सूर्यास्ताचे दृश्य केवळ अवर्णनीय. किल्ल्यावरून पश्चिमेलाच सुरुंच्या झाडात लपलेले देवबाग रिसॉर्ट आणि काळीनदी व अरबी समुद्राच्या अफलातून संगम पहायला मिळतो. किल्ल्यावरून दक्षिणेला काळीनदीवरील ते दोन पूल आणि नारळांच्या झाडामध्ये विसावलेले कारवार शहर पहायला मिळते. किल्ल्यावरून पूर्वेला अरबी समुद्राच्या बाहूत विसावण्यासाठी धावत येणारी काळी नदी लक्ष वेधून घेते. सकाळच्या प्रहरी सह्याद्रीच्या रांगांच्या आडून डोकावणारा सूर्य पहायला मिळतो. किल्ल्यावरून दक्षिणेला अगदी दूरपर्यंत दिसणारे गोव्याचे सौंदर्य मनाला भुरळ पाडल्याशिवाय राहत नाही. किल्ल्याची एवढी श्रीमंती असूनही किल्ल्याचा परिसर विकासापासून वंचित होता. तथापि आता मात्र हा किल्ला नवीन स्वरुप प्राप्त करून पर्यटकांना आपल्याकडे खेचून आणणार याबद्दल वाद
नाही.

किल्ल्याच्या माध्यमातून राष्ट्रपेम जागृत करणार

आमदार नाईक यांनी कन्नड आणि संस्कृती खात्याच्या अधिकाऱयांसह किल्ला परिसराची पाहणी केली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, सदाशिवगड किल्ल्याचा विकास घडवून आणण्याचा विचार आपल्या डोक्यात अनेक वर्षांपासून घोळत होता. आता ती वेळ जुळून आली आहे. किल्ला परिसराचा योग्य त्या रितीने विकास घडवून आणल्यानंतर किल्ला केवळ पर्यटन स्थळ म्हणून नावारुपाला येणार नाही तर किल्ल्याच्या माध्यमातून राष्ट्रपेम जागृतीला हातभार लागणार आहे.  यावेळी सुनील ऐगळे, एम. पी. राणे आदी उपस्थित होते.

Related Stories

बेळगाव-दिल्ली विमानफेरीला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद

Amit Kulkarni

रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Sandeep Gawade

शासकीय इस्पितळातील कर्मचाऱयांचा मोर्चा

Amit Kulkarni

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कृषी पुरस्काराने गौरव

Amit Kulkarni

एक्स्ट्रीम स्पोर्ट्स, विश्रुत स्ट्रायकर्स यांची विजयी सलामी

Amit Kulkarni

वीरभद्रनगरातील पावसाच्या पाण्याची समस्या सोडवा

Amit Kulkarni