रहिवाशांना करावा लागतोय अनेक समस्यांचा सामना : झाडाझुडुपांमुळे नाल्यात कचरा साचून सांडपाणी अडण्याचा प्रकार


प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील नाले कचऱयामुळे तुडूंब भरल्याने सांडपाण्याचा निचरा होणे मुश्कील बनले आहे. आझमनगर व सदाशिवनगर परिसरातील सांडपाणी वाहणारा नाला झाडेझुडूपे आणि कचऱयाच्या विळख्यात सापडला आहे. परिणामी बॉक्साईट रोडशेजारी सांडपाणी साचून परिसरातील रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
शहर आणि उपनगरांतील नाल्यांची स्वच्छता करण्याचे काम महापालिकेच्यावतीने दरवषी राबविण्यात येते. पण त्यामध्ये सातत्य नसल्याने अनेक ठिकाणांचे नाले कचरा आणि झाडाझुडूपांच्या विळख्यात अडकले आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणारे नाले कायमच अस्वच्छ असतात. वारंवार तक्रार केल्यानंतर स्वच्छतेचे काम करण्यात येते. मात्र, उपनगरी भागातील नाला स्वच्छतेकडे महापालिकेच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सदाशिवनगर परिसरातून
बॉक्साईट रोडमार्गे जाणाऱया नाल्याची दुरवस्था झाली आहे. या नाल्याचे बांधकाम करण्यात आले नसल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. अशातच झाडाझुडुपांमुळे कचरा साचून सांडपाणी अडण्याचा प्रकार घडत आहे.
बॉक्साईट रोड परिसरात मराठा मंडळ डेंटल कॉलेजसमोरील खुल्या जागेत नाल्याची व्याप्ती वाढली आहे. संपूर्ण परिसरात झाडाझुडुपांमुळे सांडपाणी साचून राहत आहे. परिणामी येथील रहिवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. विशेषतः प्रदूषणामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. डासांचा उपद्रव वाढल्याने विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. परिसरातील नाल्याची स्वच्छता करण्याची मागणी महापालिकेकडे नेहमी करण्यात येते. पण याची दखल घेण्यात येत नाही.
पावसाळय़ात नाल्यामधून सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने जवळ असलेल्या घरांमध्ये व खुल्या जागेमध्ये पाणी शिरत आहे. बॉक्साईट रोडवर घालण्यात आलेल्या पाईप कचऱयाने भरल्या आहेत. पाईपच्या तोंडावर प्लास्टिक बाटल्या, पिशव्या अशा विविध प्रकारचा कचरा अडकून राहिल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे परिसरात सांडपाणी थांबून आहे. सदाशिवनगर, हनुमाननगर आणि आझमनगर परिसरातील सांडपाणी नाल्याद्वारे वाहते. त्यामुळे नाल्यामध्ये नेहमी पाणी असते. या परिसरातील नाल्याची पाहणी करून आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.