Tarun Bharat

सद्गुरु बाळूमामांचा भंडारा उत्सव साधेपणाने

कोरोना नियमावलीमुळे आदमापुरात शुकशुकाट : पुजारी, मोजक्याच ग्रामस्थांची उपस्थिती

प्रतिनिधी / सरवडे

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरु बाळूमामांचा भंडारा उत्सव पुजारी व मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साधेपणाने साजरा झाला. कोरोनामुळे सलग दुसऱया वर्षीही भंडारा उत्सव रद्द झाल्यामुळे मंदिर परिसरात शुकशुकाट पसरला होता. कोरोनामुळे यात्रा रद्द झाल्याने भाविकांनी उपस्थित राहू नये, असे आवाहन करण्यात आले होते. याला भाविकांनी प्रतिसाद दिल्याने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत भंडारा सोहळा पार पडला.

प्रतिवर्षी सद्गुरु बाळूमामांचा भंडारा उत्सव मोठय़ा उत्साहात व लाखो भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक वातावरणात होतो. पहाटे बाळूमामांच्या बकऱयांच्या सोळा कळपामधून दूध आणून अभिषेक घालण्यात येतो. या भंडारा उत्सवाला अनेक ठिकाणाहून भाविक चार दिवस अगोदरच मंदिर परिसरात येत असतात. त्याचबरोबर मंदिरामध्ये भाकणूकदेखील होते. बाळूमामांची पालखी मिरवणूक ढोल-कैचाळाच्या गगनभेदी आवाजात गावातील प्रमुख मार्गावरून काढली जाते.

मात्र, सलग दोन वर्षे कोरोनामुळे यात्रा रद्द झाल्याने भाविकांना भंडारा सोहळा पाहावयास मिळाला नाही. सद्गुरु बाळूमामांच्या नवरात्रोत्सवाच्या आठव्या माळेला देवस्थानचे पुजारी व मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत जागर झाला. यावेळी बाळूमामांची सालंकृत महापूजा बांधण्यात आली. बाळूमामांच्या गाभाऱयात जरबेरा फुलांची आकर्षक सजावट केली होती. मंदिरास कळे (ता. पन्हाळा) येथील दीपक बुरुड यांनी नेत्रदीपक विद्युत रोषणाईने मंदिराचा मंडप उजळून निघाला होता. तसेच आदमापूर येथील पूजा कांबळे व जयश्री पाटील यांनी बाळूमामा मंदिरासमोर विविध रंगात रांगोळी काढली होती. पहाटे पाच वाजता आरती होऊन भंडारा उत्सवाची सांगता झाली. यावेळी पोलीस व सुरक्षारक्षकांकाडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कोटय़वधीची उलाढाल ठप्प

आदमापूरच्या भंडारा यात्रेला विविध राज्यांतून लाखो भाविक उपस्थिती लावत असतात. सलग दोन वर्षे यात्रा रद्द झाल्याने कोटय़वधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. तर भाविकांना या यात्रेचा आनंद मिळाला नाही. गतवर्षी यात्रा रद्द झाल्याने यावर्षी तरी मोठी यात्रा भरण्याचे संकेत होते. परंतु कोरोनाचा फैलाव वाढू लागल्याने शासनाच्या आदेशानुसार गुढीपाडव्यापर्यंत सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. भाविक, ग्रामस्थ व मंदिर समितीच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल मंदिर समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम व सरपंच विजय गुरव यांनी आभार मानले आहे.

Related Stories

यंदा 10 हजार टन मत्स्य उत्पादनाचे उद्दिष्ट

Amit Kulkarni

जिल्हय़ात आणखी एका रूग्णाची भर

Tousif Mujawar

गोळीबाराच्या घटनेने बेळगावात खळबळ

Patil_p

अग्निपथच्या विरोधातील आंदोलन कर्त्यांची धरपकड

Tousif Mujawar

विविध जोडणी देण्यापूर्वीच रस्त्याचा विकास

Amit Kulkarni

क्रीडाभारती डायनॅमिक क्लबचे राज्य स्पर्धेत यश

Amit Kulkarni