Tarun Bharat

सनरायजर्स हैदराबाद, पंजाब लढत आज

आयपीएल : दोन्ही संघांना उर्वरित चार सामने जिंकण्याची गरज

वृत्तसंस्था/ दुबई

सलग तीन सामने जिंकून विजयाची गाडी रूळावर आणणाऱया किंग्स इलेव्हन पंजाबची आयपीएलमधील पुढील लढत संजीवनी मिळालेला आणखी एक संघ सनरायजर्स हैदराबादविरुद्ध शनिवारी होणार आहे. सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.

पंजाब व हैदराबाद दोन्ही संघ समान स्थितीत असून दोघांनीही 10 सामन्यांतून 8 गुण मिळविले आहेत. पण सरस धावगतीच्या आधारे हैदराबाद संघ पंजाबपेक्षा पुढे म्हणजे पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे प्लेऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी दोन्ही संघांना उर्वरित चार सामने जिंकणे आवश्यक आहे. पंजाबने या स्पर्धेची संथ सुरुवात केली. पण आता तो पूर्णपणे बदलला असून त्यांनी सलग तीन विजय मिळवित आव्हान जिवंत ठेवले आहे. सध्या दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर हे आयपीएलमधील तीन बलाढय़ संघ आहेत. पण या तिन्ही संघांना सलग सामन्यात हरविण्याचा पराक्रम राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाबने केला आहे. हाच विजयी जोम कायम ठेवण्याचा त्यांचा शनिवारी प्रयत्न असेल. त्यांची फलंदाजी कर्णधार राहुल, मयांक अगरवाल, गेल, निकोलस पूरन यांच्याहाती सुरक्षित असून मॅक्सवेलचा फॉर्म एवढीच चिंता त्यांना लागली आहे.

राहुल (540 धावा), अगरवाल (398) हे या स्पर्धेत सर्वाधिक धावा जमविणारे दोन फलंदाज पंजाब संघातच आहेत. तरीही या संघाकडून अपेक्षित कामगिरी होऊ शकलेली नाही. गेलच्या यशस्वी पुनरागमनानंतर मात्र त्यांना बळकटी आली असून सलामीवीरांच्या खांद्यावरील ओझेच गेलमुळे कमी झाले आहे, विशेषतः राहुल आता जास्त मोकळेपणाने खेळू लागला आहे. अष्टपैलू जिमी नीशमच्या समावेशामुळे या संघाच्या फलंदाजीबरोबरच गोलंदाजीची खोलीही वाढली आहे. शमी हा त्यांचा प्रमुख गोलंदाज आहे. पंजाबप्रमाणे हैदराबादलाही उर्वरित चार सामने जिंकण्याची गरज आहे. सलग तीन पराभव स्वीकारल्यानंतर गुरुवारी हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर 8 गडय़ांनी आत्मविश्वास दुणावणारा विजय मिळवित प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. त्यामुळे वॉर्नरच्या नेतृत्वाखालील हा संघ आगेकूच करण्यासाठी कोणतीही कसर ठेवणार नाही.

हैदराबादसाठी हुरुप देणारी बाब म्हणजे फॉर्ममध्ये असलेले वॉर्नर व बेअरस्टो लवकर बाद झाल्यानंतरही राजस्थानविरुद्ध 155 धावांचा पाठलाग यशस्वी करून दाखविला तो युवा खेळाडू मनीष पांडे (83) व विजय शंकर (52) यांच्या शानदार खेळीमुळे. दोघांनी 140 धावांची अभेद्य भागीदारी करून विजय साकार केला. जेसन होल्डरच्या समावेशाने हैदराबादच्या गोलंदाजीलाही बळकटपणा आला आहे. होल्डरने राजस्थानविरुद्ध 33 धावांत 3 बळी मिळविले. मात्र या संघातील प्रियम गर्ग, अब्दुल समद, टी. नटराजन या युवा खेळाडूंनी आपापली क्षमता दाखवून देण्याची वेळ आली आहे.

संघ : किंग्स इलेव्हन पंजाब : केएल राहुल (कर्णधार), अगरवाल, कॉट्रेल, गेल, मॅक्सवेल, शमी, मुजीब उर रहमान, करुण नायर, नीशम, पूरन, पोरेल, अर्शदीप सिंग, एम. अश्विन, के.गौतम, हरप्रीत ब्रार, दीपक हुडा, जॉर्डन, सर्फराज खान, मनदीप सिंग, दर्शन नलकंडे, रवि बिश्नोई, सिमरन सिंग, जगदीश सुचित, तजिंदर सिंग, हार्डस व्हिलोएन.

सनरायजर्स हैदराबाद : वॉर्नर (कर्णधार), बेअरस्टो, विल्यम्सन, पांडे, गोस्वामी, विराट सिंग, प्रियम गर्ग, साहा, अब्दुल समद, विजय शंकर, नबी, रशिद खान, होल्डर, अभिषेक शर्मा, बी.संदीप, संजय यादव, फॅबियन ऍलेन, भुवनेश्वर, खलील अहमद, संदीप शर्मा, नदीम, कौल, स्टॅन्लेक, टी. नटराजन, थम्पी.

सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 पासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.

Related Stories

इंग्लंड संघात नवोदित रेहान अहमदचा समावेश

Patil_p

न्यूझीलंडकडून बांगलादेशचा ‘व्हाईटवॉश’

Amit Kulkarni

जोकोविच, अल्कारेझ उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

अय्यरचे नाबाद अर्धशतक, पुजाराचे शतक हुकले

Patil_p

भारताच्या शॉटगन प्रशिक्षकांना कोरोनाची लागण

Patil_p

शस्त्रक्रियेनंतर केर्न्सला पक्षघाताचा झटका

Patil_p