मुंबई / ऑनलाईन टीम
ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांनी अभिनयाच्या जीवावर मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचे आज दुपारी 12.30 च्या सुमारास ठाणे येथे कोरोनाने निधन झाले.
ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांनी आत्तापर्यंत सुमारे 40 नाटके तर पंचवीसहून अधिक मराठी आणि हिंदी सिनेमात व वीसहून अधिक मालिकांमधून काम केले. ‘नाना करते प्यार’, ‘सारे सज्जन’, ‘शेजारी शेजारी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’ अशा अनेक सिनेमातील त्यांच्या भूमिका गाजल्या. ‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘वन रूम किचन’ आदी नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं.
किशोर नांदलस्कर यांनी ‘वास्तव’ या हिंदी सिनेमातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. ‘तेरा मेरा साथ है’, ‘खाकी’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’, प्राण जाए पर शान न जाए या हिंदी सिनेमातील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. मात्र आजही त्यांचे नाव निघताच त्यांची ‘जिस देश में गंगा रहता है’ या हिंदी सिनेमातील ‘सन्नाटा’ ची भूमिका डोळ्यासमोर उभी राहते. या सिनेमात त्यांच्यासबोत गोविंदा मुख्य भूमिकेत होता. या सिनेमातील त्यांची ‘सन्नाटा’ ची भूमिका विशेष गाजली.