ऑनलाईन टीम / सितापुर :
उत्तर प्रदेशातील रामपूरचे खासदार आणि समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांची प्रकृती रविवारी रात्री उशिराने बिघडल्याने त्यांना सीतापूर तुरुंगातून त्यांना लखनऊ मधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


तुरुंगात असलेल्या आझम खान यांना 1 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. आझम खान यांच्या सह त्यांचा मुलगा अब्दुल्लाह याला देखील कोरोनाचा संसर्ग झाला असून त्याच्यावर देखील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, सद्य स्थितीत आझम खान यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.
मेदांता रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितनुसार, आझम खान यांच्यावर क्रिटिकल केअर टीम लक्ष ठेवून आहे. गेल्या आठवड्यात त्यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर सुरुवातीला त्यांच्यामध्ये कोरोनाचे मॉडरेट इंन्फेक्शन पाहायला मिळाले. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिक बिघडली आहे. त्यांना 4 लिटर ऑक्सिजन वर ठेवण्यात आले आहे. सद्य स्थितीत त्यांची ऑक्सिजन लेव्हल 90 च्या आसपास असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, आझम खान यांच्यासह तुरुंगात कैद असणाऱ्या आणखी 13 कैद्यांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे.