Tarun Bharat

समर्थांचा महंत-व्यवस्थापनातील उत्तम नेतृत्व

Advertisements

आपल्या मराठी भाषेत ‘नाण्याला दोन बाजू असतात’ असे आपण म्हणतो. त्यावेळी नाणे एकच असते. नाण्याच्या दोन बाजू लक्षात घेत असताना आपण नाण्याच्या वजनाचा, रंगाचा किंवा ते नाणे कोणत्या धातूपासून बनवले गेले आहे हे लक्षात घेत नाही. नाण्याच्या दोन बाजू म्हणजेच नाण्याचे गुण आणि अवगुण. नाणे हे
प्रतिकात्मक आहे. हा नियम मुळात मनुष्य स्वभावाविषयी लावण्यात आला आहे. प्रत्येक मनुष्य हा गुणावगुणांचा पुतळा असतो. त्याच्यातील गुण आणि अवगुण यांचा वापर कशाप्रकारे केला जातो यावरच त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व विकसित होत असते. व्यवस्थापन शास्त्रात जे कार्यरत आहेत त्यांना त्यांच्या सहकाऱयांचे गुण आणि अवगुण यांची नीट पारख असणे आवश्यक आहे. ज्यांना व्यवस्थापन क्षेत्रात उत्तम नेतृत्व साधायचे आहे त्यांनी सहकाऱयांचे गुण आणि अवगुण योग्य रीतीने वापरून संस्थेच्या भरभराटीसाठी प्रयास केले पाहिजेत.

जेव्हापासून औद्योगिक क्षेत्राची सुरुवात झाली आहे तेव्हापासून अनेक पाश्चात्य व्यवस्थापनशास्त्रज्ञांनी व्यवस्थापकीय नेतृत्व या संकल्पनेचा सखोल अभ्यास आणि चिंतन केले आहे. परंतु, त्यापूर्वीही श्रीसमर्थांनी स्वतःच्या कृतीतून, आचरणातून आणि श्रीमद दासबोध ग्रंथातून नेतृत्वाची वैशिष्टय़े आणि आणि त्याचे महत्त्व मानव समाजास पटवून दिले आहे. श्रीसमर्थ म्हणतात की,

नेमस्त नेटके पुसावें ।

विशद करून सांगावें ।प्रत्ययेंविण बोलावें ।

तेंची पाप ।।सावधानता असावी ।नितीमार्यादा राखावी ।जनास माने ऐसी करावी ।क्रियासिद्धि ।।

आलियाचे समाधान ।हरिकथा निरुपण ।

सर्वदा प्रसंग पाहोन ।वर्तत जावे ।।

15-16-17/09/12

याचा अर्थ असा आहे की, कोणाला काहीही विचारायचे असल्यास नीट आणि नेमके विचारावे. कोणाला काही सांगायचे असल्यास नीट आणि स्पष्ट सांगावे. स्वतःला प्रचिती असल्याशिवाय इतरांना काहीही सांगू नये. सावध रहावे. नीती मर्यादांचे पालन करावे. लोकांना आवडेल असेच काम करावे. जो कोणी आपल्याकडे येईल त्याचे समाधान करावे. सदैव प्रसंग पाहून
वागावे.

व्यवस्थापकीयदृष्टय़ा या ओवींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण पुढाकार घेण्याची प्रेरणा ही जर नेतृत्वात असेल तर औद्योगिक संस्थेच्या हिताकरिता राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात उपयोगी ठरू शकते. उत्तम नेतृत्व हे त्यांच्या सहकाऱयांच्या सहाय्याने उद्दिष्ट साध्य करण्याची योजना निश्चित करत असते. सहकाऱयांची वैयक्तिक आणि अंतिम उद्दिष्टांची सांगड घालण्याची वृत्ती ही नेतृत्वात असायला हवी. ज्याला/जिला व्यवस्थापन क्षेत्रात उत्तम नेतृत्व करायचे आहे त्याने/तिने त्यांच्या हाताखाली काम करणाऱया वेगवेगळय़ा पातळीवरील कर्मचाऱयांची गुणवत्ता, कौशल्ये, अनुभव आणि अडचणी लक्षात घेऊन त्यांच्या योग्यतेचा संस्थेच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेकरिता उपयोग करावा. उत्तम नेतृत्वात धोरण ठरवण्याची आणि राबवण्याची क्षमता असते. उत्तम नेतृत्वास औद्योगिक संस्थेबाहेर असणारे आणि सामाजिक घटक, स्पर्धक, शासकीय नियम, ग्राहकांचा दृष्टिकोण याबाबत अचूक सांगड घालणे आवश्यक आहे.

 उत्तम व्यवस्थापकीय नेतृत्व हे संस्थेला उपलब्ध असलेली संधी आणि आव्हाने याचे अचूक पूर्वानुमान करून योग्य अंमलबजावणीचे वेळापत्रक तयार करत असते. त्यानुसार औद्योगिक संस्थेचे नियोजन, संघटन, कर्मचाऱयांची नियुक्ती, समन्वय, कामकाजावरील नियंत्रण करणे शक्मय आहे. उत्तम नेतृत्वाचे यशापयश हे संस्थेच्या उद्दिष्टय़पूर्तीवर अवलंबून असते. श्रीसमर्थांनी याबाबत महंत लक्षणात असे म्हटले आहे की,

प्रपंची जाणे राजकारण ।परमार्थी साकल्यावीण ।सर्वांमध्ये उत्तम गुण ।त्याचा भोक्ता ।।

मागें येक पुढे येक ।ऐसा कदापि नाहीं दंडक ।

सर्वत्रांसी अलौकिक ।त्या पुरुषाची ।।

17-18/04/19

याचा अर्थ असा की, प्रपंच आणि राजकारण यांची उत्तम जाण महंताला असते. पारमार्थिक ग्रंथांचे त्याचे वाचन असते. चांगले गुण तो शिकतो. कोणाच्या तोंडावर एक आणि मागे एक असे तो बोलत नाही. तो दुतोंडी नसल्याने त्याच्या याच गुणांमुळे तो सगळीकडे अलौकिक ठरतो. श्रीसमर्थांनी सांगितलेला महंत म्हणजेच व्यवस्थापन क्षेत्रातील उत्तम नेतृत्व होय!

 महाभारतातील कौरव-पांडव युद्धातील घटोत्कच वधाचा प्रसंग सर्वांना माहिती आहे. घटोत्कच हा भीमसेन आणि हिडिंबा राक्षसणीचा पुत्र होता. तो त्याच्या पित्यासमान पराक्रमी असला तरीही त्याची वृत्ती मात्र राक्षसी होती. भगवान श्रीकृष्णांनी त्याच्यातील पराक्रम हा गुण आणि राक्षसी वृत्ती हा अवगुण लक्षात घेतला. जेव्हा प्रत्यक्ष युद्ध सुरू झाले तेव्हा कौरव सेनेचा पराभव होत होता.

 दुर्योधनाचे सेनापती पितामह भीष्म आणि गुरु द्रोणाचार्य यांच्या नंतर सेनापतीपद कर्णाकडे आले. कर्ण हा दुर्योधनाचा जिवलग मित्र होता. त्याने त्याच्याजवळील ब्रम्हास्त्र अर्जुनाचा पराभव करण्याकरिता राखून ठेवले होते. भगवान श्रीकृष्ण ही गोष्ट जाणून असल्याने त्यांनी कौरव सेनेचा नाश करण्याकरिता घटोत्कचाला आज्ञा दिली.

घटोत्कच पराक्रमी आणि राक्षसी वृत्तीचा असल्याने त्याने संपूर्ण कौरव सैन्यात हाहाकार उडवला. कौरवांना घटोत्कचाच्या आक्रमक वृत्तीमुळे चिंता वाटू लागली. काहीही केल्या घटोत्कचाचा सामना करण्यास कोणीही पुढे येईना. महापराक्रमी भीमसेन आणि पांडवसेना मात्र घटोत्कचाच्या पराक्रमाने संतुष्ट होती. शेवटी दुर्योधनाने कर्णाला घटोत्कचावर ब्रम्हास्त्र चालवण्याची आज्ञा दिली आणि कर्णाने घटोत्कचाचा वध केला. घटोत्कचाने मरत असतानासुद्धा स्वतःचे शरीर मोठे करून कौरव सैन्यावर पडला आणि अनेक कौरववीर त्यात मारले गेले.

 भगवान श्रीकृष्ण हे जाणून होते की घटोत्कच हा पराक्रमी असूनही राक्षसी वृत्तीचा असल्याने महाभारत युद्धानंतर तो सामान्य लोकांवर अत्याचार करू शकतो. त्याच्या या अवगुणामुळे अनेक निष्पाप लोकांचे जीव जाऊ शकतात म्हणून त्यांनी कर्णासमोर त्याला युद्ध करायला उभे केले. त्यामुळे कर्णाने राखून ठेवलेले ब्रम्हास्त्र कामी आले आणि प्रत्यक्ष कर्ण-अर्जुन युद्धाच्या वेळी अर्जुनाने कर्णाचा वध केला. भगवान श्रीकृष्णांचा हाच नेतृत्व गुण प्रत्येक व्यवस्थापकाने आत्मसात केल्यास तो/ती उत्तम नेतृत्व करू शकतील. स्वतःसहित समाजाचे, राष्ट्राचे आणि संपूर्ण विश्वाचे कल्याण करू शकेल.

माधव किल्लेदार

Related Stories

ठामपणा अंगीकारताना…

Patil_p

ये मन है – 2

Omkar B

वीज बिल सवलतीने वर्षपूर्ती व्हावी!

Patil_p

‘निसर्ग’ प्रकोपानंतर गरज दीर्घकालीन उपाययोजनांची !

Patil_p

संघर्षमय वर्षपूर्ती

Patil_p

राजकारण नको, पण…

Patil_p
error: Content is protected !!