प्रतिनिधी /पणजी
चिंबल येथील स्वातंत्र्यसेनानी पद्मश्री मोहन रानडे सभागृहात समाजोन्नती संघटनेतर्फे संत रोहिदास यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर गोवा जिल्हा पंचायत सदस्य गिरीश उस्कैकर, प्रमुख वक्ते म्हणून केंद्रीय पत्र सूचना कार्यालयाचे माजी संचालक गुरुनाथ पै, खास निमंत्रित म्हणून प्रसिद्ध भजनी कलाकार पुंडलिक मास्तर कळंगूटकर आणि अध्यक्षस्थानी शंभू भाऊ बांदेकर यांची उपस्थिती होती.
चौदाव्या शतकातील संत शिरोमणी रोहिदास यांचे समतेचे कार्य आज चिरंजीवी ठरले आहे. त्यांच्या महान विचारांचे डोहे आज गुरुद्वारामध्ये नित्य नियमाच्या भजनात गातात. संत रोहिदास यांनी प्रत्यक्ष भगवंतांच्या कृपेने आपल्या लीला दाखवून समतेचा मंत्र जगाला पटवून दिला, असे गुरुनाथ पै म्हणाले.
संत रोहिदासांचे जगभर बावीस धाम आहेत, या वरून त्यांची महती जगाला पाटली आहे. यंदा त्यांच्या वाराणसी येथे मुळगावी त्यांच्या जयंती निमित्त आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. हा दुग्धशर्करा योग होता, असे गिरीश उस्कैकर यांनी सांगितले.
यावेळी पुंडलिक मास्तर कळंगूटकर यांनी संत रोहिदास यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. शंभू भाऊ बांदेकर यांनी गुणवत्ता विद्यार्थ्यांना शिक्षणाची अनेक चांगली उदाहरणे देऊन संत रोहिदास यांच्या कार्याची महती पटवून दिली.
प्रारंभी गिरीश उस्कैकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करण्यात आले. प्रसंगी त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी शब्द शारदेचे संपादक कमलाकर हुम्रसकर, नाटय़लेखक दामोदर केरकर, समाजसेवक दामोदर आसोलकर यांना उस्कैकर यांच्या हस्ते सस्मानित करण्यात आले. पुडलिक कळंगूटकर यांच्या हस्ते गिरीश उस्कैकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विलास सिंगणापूरकर, दामोदर कुडाळकर, तुळशीदास कोरगावकर, विराज बांदेकर, दीप्ती कुडाळकर यांची उपस्थिती होती. स्वागत सुनील मोचेमाडकर यांनी केले तर सूत्रसंचालन धृव कुडाळकर यांनी तर आभार महेश चव्हाण यांनी मानले.
संघटनेची नूतन कार्यकारिणीची निवड


गोव्यातील समाजोन्नती संघटनेच्या मध्यवर्ती समितीची बैठक चिंबल येथील स्वातंत्र्यसेनानी पद्मश्री मोहन रानडे सभागृहात नुकतीच पार पडली. यावेळी 2022-24 साठी कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. अध्यक्षपदी शंभू भाऊ बांदेकर, वरिष्ठ उपाध्यक्ष विराज मनोहर बांदेकर, उपाध्यक्ष दामोदर विष्णू कुडाळकर, आणि महेश चव्हाण, सरचिटणीस-धृव कुडाळकर, चिटणीस-राजेश चव्हाण, संयुक्त चिटणीस-उदय (महादेव) मळगावकर, खजिनदार-सुनील शांताराम मोचेमाडकर, सदस्य-महेश वसंत मोचेमाडकर, तुळशीदास परशुराम कोरगावकर, चंद्रकांत अर्जुन हळर्णकर, विलास सिंगणापूरकर यांची निवड करण्यात आली. बैठकीस मास्तर पुंडलिक कळंगूटकर यांचे मार्गदर्शन लाभले.