Tarun Bharat

समाज दिग्दर्शिका!

सामाजिक वास्तवापासून दूर पळत चटपटीत विषयांवरील चित्रपटांची रेलचेल असणाऱया गर्दीत दिग्दर्शिका सुमित्रा भावे हे नाव न बसणारे. आपल्या चित्रपटांद्वारे समाजाला दिशादिग्दर्शन करणाऱया आणि तसे केल्याचा कोणताही अभिनिवेश न बाळगता त्याच संगतीतील नव्या नव्या विषयाच्या मागे धावणाऱया अवघ्या 78 वर्षांच्या तरुण आणि विचारी दिग्दर्शिकेला मराठी चित्रपटसृष्टीने गमावले आहे. खरेतर त्यांचे जाणे ही वैश्विक पातळीवरील चित्रपटांची हानी आहे. ‘पाणी’ या विषयावरील त्यांच्या लघुपटाला पाकिस्तानात वारंवार दाखवले जाऊन तिथल्या महिलांना गावचा पाणी प्रश्न सोडवण्याची प्रेरणा मिळाली हे यश राष्ट्रीय पुरस्कारापेक्षाही मोठे! टाटा समाज विज्ञान संस्थेच्या ग्रामविकास विषयातील पदविकेनंतर कर्वे समाजसेवा विद्यापीठात दहा वर्षे शिकविणाऱया किंवा शासन पुरस्कृत समाज विकास प्रकल्पांमध्ये कार्यरत असणाऱया एखाद्या व्यक्तीला चित्रपट क्षेत्राने खुणावणे हेच मोठे आश्चर्य. पण सुमित्रा भावे यांनी समाज विज्ञानाला चित्रपटकलेची जोड देऊन गहन विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याची कला अशी काही प्रदर्शित केली की त्याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही कौतुक होत राहिले. 1984 पासून तीन तपे सुमित्रा भावे नावाची एक सौम्य लाट मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कायम होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ‘श्वास’नंतर मराठी चित्रपटांमध्ये अर्थगर्भ चित्रपटांची एक नवीन लाट निर्माण झाली असे मानले जाते. मात्र सुमित्रा भावे आयुष्यभर असे वेगळय़ा धाटणीचे कलात्मक आणि वास्तवदर्शी चित्रपट देत राहिल्या. त्यांच्या चित्रपटात ग्रामीण दर्शन घडते तसेच आधुनिक शहरी प्रश्नांचे दर्शन आणि त्याच्या उत्तराचा ठाव घेता घेता आपल्या मूळ संस्कृतीपर्यंत आणि मानवतेच्या विचारापर्यंत त्या पोहोचतात. माणसाला माणसाने समजून घेणे, सांभाळून घेणे त्याचा प्रतिपाळ करणे आणि पर्यावरणाशी त्याचे जीवन सुसंगत बनवणे किती गरजेचे बनले आहे हे पटवण्याचे काम त्यांचे चित्रपट कुठेही माहितीपट न बनता करतात. सुनील सुकथनकर आणि सुमित्रा भावे या जोडीने अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले. 1984 साली परिस्थितीशी झगडा करत झोपडपट्टीतील जगण्याचे चित्रण करणारा ‘बाई’ हा लघुपट निर्माण करून त्यांनी स्त्रियांना गटागटाने दाखवून त्यावर चर्चा घडवून आणली. राष्ट्रीय पुरस्कार मिळवून त्यांची कारकीर्द सुरू झाली. चित्रपट निर्माण करायचा आणि विविध गटांमध्ये दाखवून त्यावर चर्चा घडवायची हा त्यांचा उपक्रम अगदी अलीकडच्या ‘वेलकमरी पाणी, मुक्ती, चाकोरी, लहा, थ्री फेसेस ऑफ टुमारो असे लघुपट, 1995 साली समाज चक्रात अडकलेल्या दोन बहिणींची कथा ‘दोघी’पासून त्यांनी पूर्ण लांबीचा चित्रपट निर्माण केला. एड्स ग्रस्तांवरील  ‘जिंदगी जिंदाबाद’ पासून दहावी फ, वास्तुपुरुष, देवराई, बाधा, नितळ, एक कप च्या, घो मला असला हवा, संहिता, कासव, अस्तु असे एकाहून एक दर्जेदार चित्रपट दिले. यातील देवराई, कासव आणि अस्तु हे तीन चित्रपट म्हणजे मन आणि भवताल यांचा विचार मांडणारी चित्रत्रयी म्हणावी अशी कलाकृती! देवराई चित्रपटात स्किझोप्रेनिया झालेला शेष मैत्रिणीपासून तोडला गेल्याने आणि देवराई धोक्मयात आल्याने झगडा करतो. त्याची मनःस्थिती आणि त्याचवेळी स्किझोप्रेनिया या अपरिचित आजाराचा, त्याची लक्षणे, निदान पद्धती, पुनर्वसनासाठी काम करणारी माणसे आणि संस्था या सर्वांची माहिती बेमालूमपणे चित्रपटाच्या कथेचा भाग म्हणून समजत जाते. चित्रपटातील अतुल कुलकर्णी, तुषार दळवी, सोनाली कुलकर्णी आणि व्यवसायाने मनोविकार तज्ञ असणारे डॉ. मोहन आगाशे यांच्या अभिनयामुळे हा चित्रपट प्रबोधनपट होत नाही. अशा व्यक्तींना कसे हाताळले पाहिजे, ग्रामीण आणि एकत्रित कुटुंब पद्धतीत अशी मुले कशी हाताळली जायची हा विषयही प्रेक्षकापर्यंत पोहोचतो. असाच स्मृतीभ्रंश या मानसिक रोगाची ओळख करून देणारा चित्रपट अस्तू! संस्कृत पंडित चक्रपाणी शास्त्री (मोहन आगाशे) यांना स्मृतीभ्रंश होतो आणि शहरात आलेला हत्ती पाहून ते आपले अस्तित्व विसरून त्याच्या मागोमाग फिरत राहतात. शेवटी नदीकाठी माहुताच्या कुटुंबासमवेत ते मुक्काम करतात. माहुताची पत्नी चेन्नम्मा (अमृता सुभाष) या वृद्धाला मुलाप्रमाणे सांभाळते आणि त्यांच्यात माय लेकीचे एक नाते निर्माण होते. वृद्ध बुद्धिमंताच्या आयुष्यावरील या चित्रपटाप्रमाणेच ‘कासव’ हा प्रेमभंगामुळे निराश झालेल्या, आत्महत्येच्या प्रयत्नातही असफल झालेल्या युवकाला पुन्हा उभे करण्यासाठी धडपडणाऱया मातेची कथा सांगतो. प्रदीर्घकाळ जगणारे कासव संकटाच्या काळात स्वतःला आक्रसून घेते आणि स्वतःलाच इतका पुरेसा वेळ देते की स्थिती बदलताच त्याचे जीवनचक्र पूर्वीप्रमाणेच गती घेते. या वास्तवाला आजच्या निराश पिढीशी जोडून घेत त्यांना वेळ दिला पाहिजे आणि संकटातून तरून जाण्यासाठी प्रसंगी आक्रसूनही राहिले पाहिजे हे सांगणारा हा आगळावेगळा चित्रपट. सुमित्रा भावे यांच्या लेखणीतून असे एकाहून एक सरस विषय साकारले गेले आणि त्याला त्यांनी कॅमेऱयाच्या चौकटीतही अत्यंत यशस्वीरीत्या बसवून दाखवले. जगभर त्याचे कौतुक झाले मात्र चित्रपट वितरकांना समाजाची खरी गरज असणारे हे चित्रपट मात्र लोकांपर्यंत न्यावेसे वाटले नाहीत हे भावेंचे नव्हे तर मराठी प्रेक्षक आणि त्यांना भरकटवणाऱया दिग्दर्शक, निर्माते आणि वितरकांचे दुर्दैव म्हणायचे! ओटीटीसारखे व्यापक क्षेत्र गतवषी टाळेबंदीपासून भारतात अधिक विस्तारले. मात्र दुर्दैवाने सुमित्रा भावे या काळात कॅन्सरशी झुंज देत होत्या. त्यांच्यासारख्या दिग्दर्शकाला हे माध्यम वरदान ठरले असते. मात्र त्यापूर्वीच त्या निघून गेल्या. केवळ मराठीच नव्हे तर जगातल्या प्रेक्षकांची गरज असणारे आणि समाजाला दिशादर्शन करणारे त्यांचे कालजयी चित्रपट सुमित्राजींच्या निधनानंतर तरी जगभरातील सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत आणि त्यांचा वसा चालवणारे नवनवे दिग्दर्शक असे आगळे वेगळे विषय घेऊन यावेत. समाजमान्यही व्हावेत हीच जगण्याला सदैव सुहास्य वदनाने सामोरे जाणाऱया सुमित्राजींना श्रद्धांजली!

Related Stories

इम्यॅन्युअल मॅक्रॉन यांचा निवडणूक विजय

Patil_p

अक्षरांचे ते घेता वाण; बहु कठीण परिणामी

Patil_p

खेळ मांडियेला वाळवंटी घाई ।

Patil_p

सगळा मायेचा पसारा

Amit Kulkarni

वाघांचे मृत्यू चिंताजनक

Patil_p

मन उलगडताना…

Patil_p