Tarun Bharat

समुहसंसर्ग वाढतोय : सातारा जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक 2494 रुग्णवाढ

अचूक बातमी “तरुण भारत” ची, शुक्रवार, 30 एप्रिल, सकाळी 11.00

● परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता ● सातारा, फलटण, कराडात रूग्णांची परवड ● रूग्णवाढ अन् लसीकरणाच्या गर्दीचा ताण ● मृत्यूदर कमी करण्यातही अपयश ●सातारची रूग्णवाढ रोखायची कशी? ●प्रशासनाने समन्वयाने नियोजन करण्याची गरज

सातारा/ प्रतिनिधी :

जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची क्षमता, व्हेंटिलेटर बेडची संख्या,  ऑक्सीजन बेडची परवड, रूग्णालयांमधील सुविधांच्या अभाव पाहता जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. गेल्या 24 तासात रेकॉर्डब्रेक 2494 रूग्णवाढ झाली असून या रूग्णवाढीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यावर, शहरावर, गावावर कोरोनाचे गंभीर संकट उभे केले आहे. कोरोनाच्या नव्या हॉटस्पॉटमधे दररोज भर पडत असताना प्रशासनही ही परिस्थिती हाताळण्यात अपुरे पडत असल्याची भावना सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. गेल्या 13 महिन्यातील सर्वात मोठी 2256 रूग्णवाढ गुरूवारी 29 एप्रिल रोजी झाल्याची नोंद होत असतानाच शुक्रवारी 30 एप्रिल रोजी 2494 हा नवा धक्कादायक रूग्णवाढीचा आकडा समोर आला. 

वास्तव नाकारून चालणार नाही

एकूण रूग्णसंख्येच्या आकड्याने एक लाखांचा टप्पा पार केला असून सध्या एकूण रूग्णवाढ 1 लाख 3 हजार 282 वर पोहचली आहे. झपाट्याने वाढणारी रूग्णवाढ आणि अपुरी यंत्रणा यामुळे जिल्ह्यात रूग्णांची फरफट होऊ लागली आहे. सातारा, फलटण, कराडसह अनेक तालुक्यातील रूग्णांना बेड न मिळाल्याने त्यांची अवस्था अत्यंत चिंताजनक होत आहे. यावर प्रशासनासह जिल्ह्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी यांनी तालुकावार नियोजन करण्याची गरज असून केवळ कागदावर नियोजन न करता त्याची अमलबजावणी होते का? याकडे करडी नजर ठेवायला हवी. 

रूग्णांची धावपळ चार जिल्ह्यात

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना अनेक रूग्ण सध्या बेड, व्हेंटिलेटर बेड मिळवण्यासाठी जिल्ह्याबरोबरच पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात पळापळ करत आहेत. व्हेंटिलेटर आणि ऑक्सीजन बेडची कमतरता अनेकांचा जीव टांगणीला लावत आहे. शुक्रवारी 2494 रूग्णवाढीने या भितीदायक परिस्थितीत आणखी भर घातली आहे. सध्या जिल्ह्यात 21464 रूग्ण उपचार घेत आहेत. 

बाधितांची वाढ थांबवायची कशी?

जिल्ह्यात रूग्णवाढीचा कहर सुरू असताना ही वाढ थांबवायची कशी? हा एकच प्रश्न आजही चिंता वाढवणारा ठरतोय. सकाळी सात ते अकरापर्यंत रस्त्यावरची गर्दी पाहता रूग्णवाढ आटोक्यात ठेवण्याचे आव्हान आहे. जबाबदार नागरिक गर्दी करून बेजबाबदारीचे दर्शन घडवत असल्याने कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढण्यास मदतच होत आहे. अकरानंतर कडक निर्बंंध असतानाही कराड, सातारासह जिल्ह्याच्या ग्रामिण भागातील रस्त्यांवरील वर्दळ कायम आहे. ही वर्दळ सुद्धा कोरोनाच्या नव्या रेकॉर्डब्रेक आकड्यात भर घालत आहे. 

गुरूवारपर्यंंत जिल्ह्यात एकूण बाधित -103282,  घरी सोडण्यात आलेले -79080, मृत्यू -2422 उपचारार्थ रुग्ण-21464

Related Stories

साताऱ्याला आणखी एक दत्ता जाधव परवडणार नाही

datta jadhav

मैत्रिणीच्या घरी चोरी करणारी महिला अटकेत

datta jadhav

सर्वसमावेशक ग्रामपंचायत विकास आराखडे तयार करावे – विनय गौडा

Archana Banage

प्रांताधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी

datta jadhav

सातारा : पैशाच्या हव्यासापोटी चार खून, मृतदेह टाकले मार्ली घाटात

Archana Banage

सातारा : मरडवाक येथील त्या वस्तीवरील बेशिस्त वर्तनाची चौकशी करा : भास्करशेठ चव्हाण

Archana Banage