Tarun Bharat

सरकारची कर्जमाफी म्हणजे गुलाल-खोबरेच

रघुनाथदादा पाटील  यांची टीका : शेतकरी संघटनेतर्फे निपाणीतून जनप्रबोधन यात्रेस प्रारंभ

प्रतिनिधी/ निपाणी

राज्यात अथवा केंदात आलेल्या आजवरच्या सरकारांनी शेतकऱयांसाठी विशेष असे काम केलेले नाही. उद्योगधार्जिणी ही सरकारे ठरली. शेतकऱयांना आधार देण्याच्या नावाखाली कर्जमाफी जाहीर करण्यात आली. मात्र याचा ठराविक शेतकऱयांनाच लाभ झाला. त्यामुळे सरकारची कर्जमाफी ही गुलाल-खोबरेच ठरले आहे, अशी टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली.

   शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकऱयांच्या आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी जनप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची सुरुवात शनिवारी निपाणीतील आंदोलन नगरातून करण्यात आली. यावेळी तंबाखू आंदोलनात हुतात्मा झालेल्या  शेतकऱयांना अभिवादन करण्यात आले. यावेळी रघुनाथदादांनी शेतकऱयांवर अन्याय करणाऱया सरकारची प्रवृत्ती घालविण्यासाठी बुलेटला बॅलेटने उत्तर देण्याची गरज असल्याचे सांगितले.

  माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी शरद जोशींचा संघर्षाचा वारसा रघुनाथदादा पाटील यांनी समर्थपणे चालविला असून शेतकऱयांच्या आंदोलनात तरुणांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. प्रा. डॉ. अच्युत माने यांनी हा देश शेतकऱयांचा असून शेतकऱयांना न्याय मिळत नाही ही दुर्दैवी गोष्ट आहे. अशा स्थितीत शेतकऱयांना न्याय देण्याच्या उद्देशाने जनप्रबोधन यात्रेला आंदोलन नगरातून क्रांतीकारी भूमीतून सुरुवात होत आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.

  सदर प्रबोधन यात्रा निपाणी, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, इस्लामपूर, पलूस, आटपाडी, सोलापूर, अहमदनगर, पुणे, सातारा, फलटण, कराड या मार्गावरुन जाणार असून सातारा येथे सांगता होणार आहे. शेतकऱयांना कर्ज व वीजबिलमुक्त करणे, त्यांच्याकडून वसूल केली जाणारा अप्रत्यक्ष कर कमी करणे, रंगराजन समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी कार्यक्रम आखणे, शेतकरी विरोधी कायदे रद्द करणे आदी विविध मागण्यांसाठी ही जनप्रबोधन यात्रा होणार आहे.

   यात्रेच्या शुभारंभप्रसंगी प्रा. आय. एन. बेग, गणी पाटील, माजी ता.पं. अध्यक्ष नारायण पठाडे, जयराम मिरजकर, निकू पाटील, विठ्ठल वाघमोडे, बाबासाहेब मगदूम, सुधाकर माने, पांडुरंग मारवडकर, प्रणव पाटील, विनायक जाधव, कालिदास आपटे, शिवाजी नंदकिरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.  

निपाणीत शेतकरी भवनसाठी 1 लाख

  दरम्यान जनप्रबोधन यात्रेच्या पार्श्वभूमीवर येथील आंदोलन नगरातील शेतकरी हुतात्मा स्मारक परिसरात नगर पालिकेतर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. याचे कौतुक करण्यात आले. तसेच याठिकाणी शेतकरी भवन उभारण्यासाठी शेतकरी संघटनेतर्फे 1 लाख रुपयांचा मदतनिधी देण्याची घोषणा रघुनाथदादा पाटील यांनी केली.

Related Stories

बेळगाव शहरासह तालुक्यात हुडहुडी

Amit Kulkarni

धर्मांतर बंदी विधेयक गदारोळातच संमत

Omkar B

विमान प्रवाशांना मिळणार बस सुविधा

Patil_p

सक्रिय रुग्णांची संख्या 121 वर

Amit Kulkarni

लेकक्हय़ू हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स डे साजरा

Patil_p

कारागृहातील सावरकरांची प्रतिमा हटविण्यात आल्याने संताप

Patil_p