Tarun Bharat

सरकारात राहून विजय सरदेसाई यांनी केवळ स्वताचा स्वार्थ साधला

उपमुख्यमंत्री आजगांवकर यांची जोरदार टीका

प्रतिनिधी / मडगाव

फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी भाजप सरकारात राहून केवळ स्वताचा स्वार्थ साधला. त्यांनी फातोडर्य़ातील व गोव्यातील जनतेसाठी काहीच केलेले नाही. ते स्वार्थी राजकारणी असल्याची जोरदार टीका उपमुख्यमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगांवकर यांनी केली. फातोर्डा येथे भाजप कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या पत्रकार परिषदेला भाजपचे राज्य सरचिटणीस दामू नाईक, फातोर्डा मंडळाचे अध्यक्ष मनोहर बोरकर, दक्षिण गोवा भाजपचे सरचिटणीस सत्यविजय नाईक व भाजप अल्पसंख्याक विभागाचे हैदर शहा इत्यादी उपस्थितीत होते. चंद्रावाडो-फातोर्ड येथील सुमारे 19 मुस्लिम युवकांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री श्री. आजगांवकर यांनी त्यांना भाजपमध्ये रितसर प्रवेश दिला.

भाजपमध्ये सद्या सर्व धर्मातील लोक प्रवेश करीत आहेत. ‘सबका साथ, सबका विकास’ केवळ भाजपच साध्य करू शकतो. जेथे भाजप आहे, तेथे विकास आहे. म्हणूनच लोकांचा भाजपकडे कल असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. आजगांवकर म्हणाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे गोव्याला चांगले नेतृत्व देत आहे. त्यामुळे सुरवातीला जिल्हा पंचायत व नंतर पालिका निवडणुकीत भाजपने विजय मिळविलेला आहे. आत्ता होत असलेल्या पाच पालिकांच्या निवडणुकीत व नंतर होणाऱया विधानसभा निवडणुकीत देखील भाजपचाच विजय होणार असल्याचा दावा उपमुख्यमंत्र्यांनी केला.

गोवा फॉरवर्डला कुठेच स्थान नाही

गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी राजकारणात फटिंगपणा केला आहे. लोकांना फसवून ते दोन वेळा फातोडर्य़ातून विजयी झाले. भाजपवर सातत्याने त्यांनी टीका केली व स्वताची पोळी भाजून घेण्यासाठी भाजप सरकारात सहभागी झाले. त्यांनी फातोडर्य़ातील मतदारांचा विश्वासघात केला. सरकारात सहभागी झाल्यानंतर त्यांनी जनतेसाठी काहीच केलेले नाही. केवळ स्वताचा स्वार्थ साधला. कोटय़ावधी रूपये त्यांनी कमावले. त्यातून फातोर्डा, पणजी येथे पक्षाची कार्यालये सुरू केली. नेत्रावळी येथे फार्म हाऊस सुरू केले. त्यांनी भ्रष्ट मार्गाने पैसा कमावल्याचा आरोप उपमुख्यमंत्री श्री. आजगांवकर यांनी केला.

सरकारात जेव्हा त्यांची दादागिरी वाढली व त्यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला तेव्हा, त्यांना सरकारातून काढण्याचा निर्णय घेतला गेला. काल ते एनडीएतून बाहेर पडले. पण, ऐवढे दिवस ते का ? थांबले होते, याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यायला हवे. आपल्याला पुन्हा मंत्रीमंडळात स्थान मिळणार म्हणून ते वाट पहात होते. मात्र, आपल्या संधी मिळत नसल्याचे लक्षात येता ते एनडीएतून बाहेर पडले असे श्री. आजगांवकर म्हणाले.

फॉर्मेलिन प्रकरणी गप्प का राहिले ?

मडगावच्या घाऊक मासळी मार्केटात जेव्हा फॉर्मेलिनची मासळी सापडली, त्यावेळी ते गप्प का राहिले. त्यांनी इब्राहिम मौलांना यांच्यावर का कारवाई केली नाही हे सुद्धा जनतेला सांगाव. फॉर्मेलिनचा वापर केल्या जाणाऱया माशांतून त्यांनी लाखो रूपयांची कमाई केली. मात्र, हे मासे खाऊन अनेक लोक आजारी पडले, त्यावर सुद्धा त्यांनी जनतेला स्पष्टीकरण द्यावे लागणार असे उपमुख्यमंत्री आजगांवकर म्हणाले.

सरदेसाई हे राजकारणातील मोठी ‘कीड’

विजय सरदेसाई हे गोव्याच्या राजकारणातील मोठी ‘कीड’ आहे. ही कीड दूर करण्याची वेळ आली असून लोकांना जास्त दिवस फसविता येत नाही. हे लोकांना सुद्धा कळून चुकलेले आहे. त्यामुळेच अनेक जण त्यांची साथ सोडून भाजपमध्ये येत आहे. विजय सरदेसाई हे स्वताच्या पैशांतून विकासकामे करीत असल्याचा दावा करत आहे. त्यांच्याकडे ऐवढा पैसा आला कुठून याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे दामू नाईक म्हणाले.

रस्त्याला डांबर घालणे म्हणजे विकासकामे नव्हे. रस्त्याला डांबर घालण्याचे काम कित्येक वर्षापासून हात आहे. त्यात नाविन्य असे काहीच नाही. त्यांनी फातोडर्य़ासाठी कोणता नवीन प्रकल्प आणला ते सांगावे असे श्री. नाईक म्हणाले.

कॅसिनोवाल्यांना धमकावणाऱयांवर कारवाई होणार

कॅसिनोवाल्यांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱयांवर कारवाई होईल असे दामू नाईक म्हणाले. जलस्त्रोत खात्यात सुद्धा जे कारनामे करण्यात आलेले आहेत. त्याचा तपशील सुद्धा सरकारकडे असून योग्य वेळी कारवाई होईल असे ते म्हणाले.

यावेळी इब्राहिम मुल्ला, इरफान शेख, खलिद शेख, हनिफ शेख, अस्लम शेख, मोहम्मद सोहेल, रफिक मंजूर, फैजान शेख, शाहीद शेख, अल्तफ शेख, शहीद शेख, सोहेब खान, मुद्दसर, हरिफ शेख, शेख अहमद, शेख सय्यद, शेख मन्सूर व शेख जुनाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Related Stories

अध्यायन अध्यापन प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धती

Omkar B

सिल्वानगर-फोंडा येथे दुचाकीच्या अपघातात दोघजण गंभीर

Amit Kulkarni

युवा भंडारी समितीचे कार्य कौतुकास्पद

Patil_p

रक्तदान हे श्रेष्ट दान, सर्वांनी रक्तदान करावे

Amit Kulkarni

सातेरी क्रिकेटर्स उपान्त्य फेरीत

Amit Kulkarni

दिल्ली येथे होणाऱया पहिल्या राष्ट्रीय ग्रेपलिंग स्पर्धेसाठी गोवा संघ रावाना

Amit Kulkarni