Tarun Bharat

सरकारी कर्मचाऱयांना मास्क पुरवणार

कोरोनापासून सावधगीरीसाठी निर्णय, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची माहिती

पणजी

कोरोना व्हायरसच्या दृष्टीने काळजी घेण्यासाठी सरकारी कार्यालयातील कर्मचारी आणि इस्पितळ कर्मचाऱयांना मास्क पुरविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जागतिक पातळीवर कोरोना व्हायरसची लागण झाल्याने सरकारने हा निर्णय घेतल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सरकारी कर्मचारी, इस्पितळातील कर्मचारी, विद्यालये आणि महाविद्यालये यामध्ये सुरक्षेचे उपाय हाती घेण्यात येणार आहे. सेनिटायझरचा वापर विद्यालये आणि महाविद्यालयांमध्ये महत्वाचा आहे. त्यामुळे या अंमलबजावणीला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे, असेही राणे यांनी सांगितले.

विदेशींना भारतात येण्यास बंदी

कोरोना व्हायरसचा फैलाव वेगाने होत आहे. इटलीमध्ये हजारो प्रकरणे आढळून आली आहेत. युरोपमधून येणाऱया प्रवाशांवर देशात बंदी घातली आहे. काही देशातील लोकांना भारतात व्हिसा देऊ नये असा निर्णय घेण्यात आला आहे. प्रथमच अशा प्रकारचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कुवेतमध्येही बंदी घातली आहे. प्रथमच  हाज यात्रेला  येऊ नये, असे सूचित केले आहे.

थंडी, खोकला येणाऱयांना वेगळे ठेवावे

आपण स्वतः राज्याच्या मुख्य सचिवांना सूचित केले आहे की प्रत्येक खात्याच्या कर्मचाऱयांना मास्क पुरविण्याची गरज आहे. कुणाला थंडी, खोकला येत असेल तर त्याला वेगळे ठेवण्याची गरज आहे. आपण इस्पितळातही कडक आदेश दिले आहेत. गोमेकॉत येणाऱया प्रत्येकाने हाताला सेनिटाईज करावे व मास्क घालून आत जावे. नर्स, स्टाफ या सर्वानी मास्कचा वापर करावा.

उद्योजकांनीही कर्मचाऱयांना सावध करावे

उद्योगाच्या मालकांनी आपल्या कर्मचाऱयांना स्वच्छता राखण्यासाठी सूचित करावे. रेस्टोरेंटमध्ये सेनिटाईज करणे व मास्क वापरावर भर द्यावा. गर्दीच्या ठिकाणी जाताना, रेल्वे, विमान प्रवासात मास्क घालण्याची गरज आहे. ज्यांना सर्दी झाली त्याना दूर करण्याची गरज आहे. लोकानी धोका पत्करु नये. केंद्र सरकारनेही काही देशातील लोक येतात सिंगापूर, चीन, जपान चौदा देशांची यादी दिलेली आहे. भारतातील लोक जरी या देशातून येत असतील तर त्यांनी चौदा दिवस वेगळे रहावे, अशी काळजी घेण्यात येत आहे.

लोकांनी जमावात जाऊ नये

लोकानीही जमावापासून दूर रहावे शिगमोत्सव यावर्षीही होणार आणि पुढच्या वर्षीही येणार आहे. पण लोकानी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. आपण स्वतः जमावापासून दूर रहाणार आहे. लोकानीही जमावाचे कार्यक्रम करु नयेत.

युरोप, अमेरिकेत काळजी घेतली जाते. विद्यालयाना सुट्टी दिलेली आहे. ऑनलाईन क्लासेस चालतात. त्यामुळे सर्वानीच काळजी घ्यावी. वास्को येथील एक रुग्ण कोरोना रुग्णाच्या संपर्कात आला होता. त्याला गोमेकॉत दाखल केले आहे. मात्र लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

कोरोनाबाबत फोंडा उपजिल्हा  इस्पितळात नियंत्रण कक्ष सज्ज  

फोंडा

कोरोना विषाणू (कोविड-19)च्या संसर्गसंबंधी सोशल मीडिया व इतर माध्यमातून अफवा व गैरसमज पसरवू नयेत. सर्वाच्या सहकार्याने खबरदारी स्वीकारून लढा देणे  आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येकांनी याबाबत जागृती करावी, असे आवाहन डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांनी काल बुधवारी फोंडा येथे मार्गदर्शन करताना केले.

फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळ आयोजित कोरोना व रॅबिज विषयावर मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी इस्पितळाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास कुवेलकरसह वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत 70 जणांनी यांचा लाभ घेतला. शहरात संशयित रूग्ण सापडल्यास भीतीचे वातावरण पसरवू नये, संशयित रूग्णांसाठी यंत्रणा सज्ज करण्यात आल्याची माहिती डॉ. कुवेलकर यांनी दिली असून इस्पितळात एकूण 12 खाटीचा वेगळा वॉर्ड यंत्रणेसह सज्ज करण्यात आला आहे. फोंडयात अजून एकही संशयित रूग्ण आढळलेला नाही. 

फोंडय़ात नियंत्रण कक्ष सज्ज

यावेळी डॉ. सुर्यवंशी म्हणाले फोंडेकरानो आम्ही तुमच्यासोबत आहोत, व्यवस्थित काळजी घ्या. काम नसेल तर शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाण्यास टाळा, प्रशासन योग्य काळजी घेत आहे. फार्मा कंपन्यानी फेस मास्कसाठी अवाढव्य किंमत आकारू नये, नागरिकांसाठी मास्क सर्वासाठी उपलब्ध करा असा सल्ला दिला.  संशयित रूग्णांचे नमूने पुणे येथे पाठवून छाननी करण्यात आली असून सुदैवाने गोव्यात अजुनपर्यंत एकही रूग्ण सापडलेला नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका, राज्यातील आरोग्य व्यवस्था मजबूत आहे. रूग्ण सापडल्यास त्यासंबंधी वैद्यकीय बुलेटीन काढून माहिती उपलब्ध करेल अशी ग्वाही त्यांनी योवळी बोलताना दिली.

Related Stories

कला मंदिरच्या घुमट आरती स्पर्धेला प्रारंभ

Amit Kulkarni

कुंकळ्ळीतील मार्केट 11 पर्यंत बंद

Amit Kulkarni

डिचोलीतील मतदार या निवडणुकीत मंत्र्याला निवडून आणणार

Amit Kulkarni

कोरोना चाचणीचे प्रमाण वाढविणार

Patil_p

‘फास्टॅग’ही होणार कालबाह्य

Amit Kulkarni

कोरोनाचे दिवसभरात चार बळी

Amit Kulkarni