Tarun Bharat

सरकारी कार्यालयासह बाजारपेठेत सामाजिक अंतर राखण्याकडे दुर्लक्ष

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमिवर लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपत आला आहे. अशातच नागरिकांची विविध कामे सुरळीत सुरू झाली आहेत. सरकारी कार्यालयातील रखडलेली कामे करून घेण्यासाठी नागरिक सरकारी कार्यालयाकडे वळू लागले आहेत. पण कोरोनापासून लांब राहण्यासाठी आरोग्य खात्याने सूचविलेल्या पर्यायांचे पालन होते का? हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

  सामाजिक अंतर राखून सर्व व्यवहार करावेत, अशी सूचना आरोग्य खात्याने केली आहे. तसेच तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे. त्यामुळे नागरीक मास्क वापरत आहेत. मात्र गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतर राखण्याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून आले आहे. राज्य शासनाने महसूल वाढीसाठी प्रथम उप नोंदणी कार्यालय खुले करण्याची सूचना केली होती. प्रारंभी ऑनलाईनद्वारा नोंदणी कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र नागरिकांचा प्रतिसाद लाभला नाही. मात्र लॉकडाऊन शिथील करण्यात आल्यानंतर उप नोंदणी कार्यालयात नागरीकांची गर्दी वाढू लागली आहे. विवाह नोंदणी, जागेचे इतर व्यवहार करण्यासाठी उप नोंदणी कार्यालयात नागरीक येत आहेत. पण उप नोंदणी कार्यालय लहान असल्याने या ठिकाणी गर्दी होत आहे. अशातच सामाजिक अंतर राखले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. विविध गावातून आणि शहरामधून नागरीक येत असतात त्यामुळे सामाजिक अंतर राखणे गरजेचे आहे. पण या सूचनेला उपनोंदणी कार्यालयासह विविध सरकारी कार्यालयात वाटाण्याच्या अक्षता लावल्या असल्याचे निदर्शनास आले आहे.

विविध समस्यांचे निवरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्याकरीता नागरीक येत आहेत. पण निवेदन देताना किंवा गर्दी करताना सामाजिक अंतर राखण्याकडे दुर्लक्ष होत आहे. विविध मागण्यांसाठी नागरीकांची गर्दी होत आहे. सूचना करूनही सामाजिक अंतर राखले जात नाही. त्याचप्रमाणे सीटी सर्व्हे कार्यालय, भूमापन कार्यालयात देखील आवश्यक खबरदारी घेण्यात आलीनसल्याचे दिसून आले आहे. जुने तहसीलदार कार्यालयात उतारे घेण्यासाठी शेतकरी येत आहेत. त्या ठिकाणी काऊंटरजवळ कोणी येवू नये याकरिता दोरी बांधण्यात आली आहे. पण नागरीकांच्या हिताच्या दृष्टीनी कोणतीच खबरदारी घेण्यात आली नाही. सामाजिक अंतर राखणे किंवा कार्यालयात येणाऱया नागरिकांना सॅनिटायझर उपलब्ध करून देणे याकडे तहसीलदार कार्यालयाचे दुर्लक्ष झाले आहे.

आरटीओ कार्यालयात नागरीक विविध कामासाठी येत आहेत. त्यामुळे चलन भरण्यासाठी व कागदपत्रे जमा करण्यासाठी नागरीकांना रांगेत थांबावे लागते. पण त्या ठिकाणी देखील सामाजिक अंतर राखण्याकडे नागरीक दुर्लक्ष करीत आहे. कोरोनापासून लांब राहण्यासाठी हात स्वच्छ धुणे, तोंडाला मास्क लावणे आणि सामाजिक अंतर राखणे असे पर्याय आरोग्य खात्याने सूचविले आहेत. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लस निर्माण करण्यास अद्याप यश आले नाही. प्रतिकार शक्ती वाढवून हा आजार कमी करता येवू शकतो. असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या आजारापासून लांब राहण्यासाठी आरोग्य खात्याने सूचविलेल्या पर्यायांचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र बाजारपेठ असो किंवा सरकारी कार्यालय तसेच खासगी कार्यालय आदी सर्वच ठिकाणी सामाजिक अंतर राखण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तसेच  सॅनिटायझर उपलब्ध करण्याकडे देखील दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे कोरोनाची तिव्रता कमी झाली का? असा मुद्दा उपस्थित होत आहे.

error: Content is protected !!