ऑनलाईन टीम / नागपूर :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना नागपूरच्या किंग्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, शुक्रवारी भागवत यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. भागवत यांच्यामध्ये कोरोनाचे साधी लक्षणे आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही संघाकडून देण्यात आली आहे.


मोहन भागवत यांना कोरोना झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट केले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी लवकर बरे व्हावे यासाठी मी प्रार्थना करतो’.


तर नितीन गडकरी म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आदरनीय डॉ. मोहनजी भागवत हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त आहे. लवकरात लवकर त्यांना बरे वाटावे, अशी देवाकडे प्रार्थना करतो, असे ट्विट गडकरी यांनी केले आहे.