Tarun Bharat

‘सर्जिकल स्ट्राईक’चा देशाला अभिमान!

पंतप्रधानांनी नौशेरा सेक्टरमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी : जवानांच्या धैर्याला ठोकला सलाम

नौशेरा / वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही सीमेवर तैनात जवानांसोबत दिवाळी साजरी केली. आपल्या नौशेरा दौऱयादरम्यान त्यांनी सीमेवर तैनात जवानांशी संवाद साधला. जवान हे भारतमातेचे सुरक्षाकवच आहेत. जवानांमुळे देशातील इतर नागरिक शांतपणे झोपत आहेत आणि सणांच्या वेळी शांती आहे. आज मी जवानांसाठी 130 कोटी देशवासियांचे आशीर्वाद आणले आहेत, असे गौरवोद्गार काढत ‘सर्जिकल स्ट्राईक’मध्ये सुरक्षा दलांनी दाखवलेल्या ताकदीचा संपूर्ण देशाला अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी देशासाठी प्राणाचे बलिदान देणाऱया सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. तसेच येथे त्यांनी जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा देत मिठाईचे वाटपही केले.

दिवाळीच्या निमित्ताने केलेल्या जम्मू काश्मीर दौऱयादरम्यान आपण नौशेरामध्ये पंतप्रधान म्हणून आलेलो नसून इथल्या जवानांच्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून आलो असल्याचे मोदी म्हणाले. प्रत्येकाला आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करावी असे वाटते. आपल्या कुटुंबियांसोबत आल्यानंतर जसे मनाला समाधान वाटते, तसेच तुमच्यासोबत आल्यावर मला वाटते’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

एक दिवा तुमच्यासाठी…

आज मी इथून नव्या उत्साहाने आणि नव्या विश्वासाने जाणार आहे. आज संध्याकाळी भारतातील प्रत्येक नागरिक तुमच्या शौर्य, त्याग आणि तपश्चर्येच्या नावाने दिवाळीला दिवा लावेल. मातेच्या सेवेसाठी तुम्हाला जे सौभाग्य लाभले आहे, ते मला तुमच्या चेहऱयावरचे भाव दिसत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. भारताचा प्रत्येक नागरिक दिवाळीनिमित्ताने एक दिवा तुमच्या वीरत्वासाठी, शौर्यासाठी, पराक्रमासाठी लावून तुम्हाला अनेकानेक शुभेच्छा देईल, असे मोदी म्हणाले.

संरक्षण क्षेत्रात स्वावलंबन

पूर्वी गरज पडली की घाईघाईने शस्त्रे खरेदी केली जात असत. आज संरक्षण क्षेत्रात स्वावलंबन येत आहे. सध्या आम्ही केलेल्या नियोजनानुसार आता 200 हून अधिक शस्त्रे, उपकरणे देशातच खरेदी करण्यासंबंधी अनेक प्रयत्न सुरू आहेत. यामुळे संरक्षण क्षेत्र मजबूत होईल. त्यातून भारताची ताकद दिसून येते. आत्मनिर्भर किंवा स्वावलंबी होण्याचा हा एक मोठा मार्ग आहे. जगात वेगाने होत असलेल्या बदलांशी आपल्याला आपली तयारी जुळवून घ्यावी लागेल, असे पंतप्रधान म्हणाले. पूर्वी हत्ती, घोडे यांच्या मदतीने लढाया होत असत, पण आजच्या युद्धकलेत खूप बदल झाला आहे. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे झपाटय़ाने बदल होत आहेत, असेही पुढे त्यांनी नमूद केले.

नौशेरामधील कामगिरी स्पृहणीय

जेव्हा मी नौशेराच्या भूमीवर उतरलो तेव्हा माझे हृदय एका वेगळय़ाच थराराने भरून आले होते. तुमच्यासारख्या शूर सैनिकांच्या धाडसाचे जिवंत उदाहरण म्हणजे इथला वर्तमान. नौशेराच्या सिंहांनी नेहमीच शत्रूंना चोख प्रत्युत्तर दिले आहे. प्रत्येक कट हाणून पाडला आहे. सर्जिकल स्ट्राईकमध्ये नौशेराने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नौशेराच्या भूमीवर सैनिकांनी शौर्याच्या अनेक गाथा लिहिल्या आहेत, असेही मोदी म्हणाले.

महिला शक्तीही होतेय बळकट

तुमच्यासाठी सैन्यात भरती होणे ही नोकरी नाही, ती एक साधना आहे. तुम्ही माँ भारतीची साधना करत आहात. आम्हाला आमच्या जन्मभूमीसाठी जगायचे आहे. आमची उदार भावना आम्हाला इतरांपेक्षा वेगळी बनवते. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आता महिला शक्ती अधिक बळकट होत आहे. नौदल आणि हवाई दलात आघाडीवर तैनात झाल्यानंतर लष्करातही महिला शक्तीचा विस्तार होत आहे. अनेक लष्करी संस्थांचे दरवाजे मुलींसाठी उघडले आहेत. संरक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल देशाच्या कन्या उत्साहित आहेत, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.

सामान्य नागरिकाप्रमाणे दिल्लीतून मार्गस्थ

नौशेरा भेटीदरम्यान जेव्हा पंतप्रधान मोदींच्या ताफ्याने दिल्ली सोडली तेव्हा राजधानीच्या रस्त्यांवर एक असामान्य दृश्य दिसले. मोदींचा ताफा कमी सुरक्षा आणि कोणत्याही वाहतुकीचे बंधन न घालता नौशेराकडे मार्गस्थ झाला. गुरुवारी सकाळी पंतप्रधान जेव्हा त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडले तेव्हा तेथे फारशी सुरक्षा व्यवस्था नव्हती. यादरम्यान लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतुकीत कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे दिसून आले.

Related Stories

आग्य्रात सापडला पुराणकालिन घाट

Patil_p

मेड इन इंडिया रेल्वे इंजिन तयार

datta jadhav

निधन झालेल्या मान्यवरांना विधानसभेत श्रद्धांजली

Patil_p

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयकर परताव्याच्या मुदतीत वाढ

tarunbharat

तिरुपती देवस्थानला मुस्लीम कुटुंबाकडून 1.02 कोटी

Patil_p

‘फिनोलेक्स’ भांडवल खर्चावर देणार भर

Patil_p