Tarun Bharat

सर्वप्रथम मोफत पाण्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा खोटा

आपचे राहूल म्हांबरे यांची टीका

प्रतिनिधी /पणजी

मोफत पाणी देणारे गोवा हे देशातील पहिले राज्य असल्याचे जाहीर करून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी खोटारडेपणा केला आहे. आम आदमी पक्षाने 2015 पासून कार्यवाहित आणलेली योजना चोरून सावंत सरकारने ती स्वतःची म्हणून सादर केली आहे. यावरून आपच्या गोव्यातील वाढत्या लोकप्रियतेमुळे भाजपचे मानसिक संतुलन ढासळले आहे, असे आप ने म्हटले आहे.

केजरीवाल सरकारकडून 2015 पासून दिल्लीतील लोकांना दरमहा 20 हजार लिटर पाणी देण्यात येत आहे. गोव्यात भाजपने आपच्या योजना चोरल्या आणि चापलुसी करत त्या स्वतःच्या म्हणून भासविण्याचे त्यांचे प्रयत्न आहे, परंतु आप सोबत स्पर्धा करण्याचे हे प्रयत्न त्यांच्या अंगलट येणार आहेत, असे आपचे गोवा संयोजक राहूल म्हांबरे यांनी म्हटले आहे.

सध्या दिल्लीतील सुमारे सहा लाख घरांना मोफत पाणी योजनेचा फायदा मिळत आहे. दिल्लीच्या जल मंडळाने ही योजना कानाकोपऱयात पोहोचविण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. या उलट सावंत सरकारची ’हर घर जल’ योजना पूर्णतः फसली आहे. गोव्यातील कित्येक गावात आजही प्रचंड पाणीटंचाई आहे. लोकांना धड रोजच्या वापरास पुरेल एवढे पाणी सुद्धा मिळत नाही, अशावेळी मोफत पाणी देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा दिवास्वप्न वाटत आहे, असे म्हांबरे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी मोफत पाणी देण्यापेक्षा प्रथम लोकांना 24 तास अखंड पाणी देण्याचे आश्वासन द्यावे. बार्देश सारख्या भागात लोकांना रोज पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. पाईपलाईन फुटणे हे नित्याचेच झालेले आहे. कित्येक ठिकाणी लोकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून दिवस सारावे लागत आहेत. सांगे मतदारसंघात काही गावात लोक विहिरींवरील पंपवर अवलंबून आहेत. अनेकदा हे पंप नादुरुस्त झाल्यामुळे गावकऱयांचे पाण्याविना हाल होतात. गेल्या महिन्यातच आपच्या नेत्या गौरीशा गावकर यांच्या टीमला पाणी पुरवठय़ासाठी सांगेतील नूने गावात संघर्ष करावा लागला होता. जवळजवळ अशीच परिस्थिती अन्य कित्येक भागात असताना मुख्यमंत्री कोणत्या तोंडाने मोफत पाण्याची घोषणा करतात, असा सवाल म्हांबरे यांनी उपस्थित केला आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे एकेकाळी ’मोफत देणे परवडणारे नाही’ म्हणणाऱया भाजप सरकारवरच आज स्वतः मोफत देण्याची घोषणा करण्याची वेळ आली आहे. यावरून केजरीवाल मॉडेलच गोवा वाचवू शकतो या सत्याची जाणीव प्रमोद सावंत यांनाही झाली आहे, हेच सिद्ध होत आहे.

दरम्यान, भाजप सरकारने आमची एक योजना चोरली असली तरीही भविष्यात आम्ही अशा आणखीही अनेक योजना गोमंतकीयांसाठी आणणार आहोत, असा दावा म्हांबरे यांनी केला आहे.

Related Stories

आमदार कार्लुस आल्मेदा यांचा दाजी साळकर यांच्यावर बेकायदा जमीन हस्तांतरणाचा आरोप, जाहीरनाम्यावरही टीका

Amit Kulkarni

श्रीलंकेहून दाबोळीत 291 प्रवाशांचे आगमन

Omkar B

सांगे येथे साकारणार ‘हातमाग ग्राम’

Omkar B

नावेली आरोग्य केंद्राचे हॉस्पिटलमध्ये रूपांतर होणार : आरोग्यमंत्री

Amit Kulkarni

सम्राट क्लब पणजीतर्फे लता मंगेशकर यांना आदरांजली

Amit Kulkarni

पी.चिदंबरम, दिनेश गुंडू राव आज गोव्यात

Omkar B