काँग्रेसच्या तुलनेत 5 पट अधिक : भाजपच्या खर्चातही वाढ : 2019-20 मधील आकडेवारी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
केंद्रात सत्तारुढ असलेल्या भाजपाला मिळालेली देणगी आणि खर्चात वृद्धीची नोंद झाली आहे. 2019-20 या आर्थिक वर्षाच्या अहवालानुसार पक्षाला 2018-19 मधील 2,410 कोटी रुपयांच्या देणगीच्या तुलनेत 50 टक्के वृद्धीसह 3,623 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. पण भाजपच्या खर्चामधील वाढ देखील तुलनेत अधिक राहिली आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात 1,651 कोटी रुपये खर्च केल्याचे भाजपने निवडणूक आयोगाला कळविले आहे. तर 2018-19 या आर्थिक वर्षात भाजपने 1,005 कोटी रुपयांचा खर्च केला होता. अशाप्रकारे एक वर्षात भाजपचा खर्च सुमारे 64 टक्क्यांनी वाढला आहे.
निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेल्या वार्षिक लेखापरीक्षणानुसार भाजपला 2019-20 या आर्थिक वर्षात इलेक्टोरल बाँडद्वारे 2,555 कोटी रुपये प्राप्त झाले. 2018-19 या आर्थिक वर्षात हा आकडा 1,450 कोटी रुपये राहिला होता. तर पक्षाने निवडणुकांवर अनुक्रमे 1,352 कोटी आणि 792,40 कोटी रुपये खर्च केले आहेत. भाजपने मागील आर्थिक वर्षात काँग्रेसच्या तुलनेत 5.3 पट अधिक देणगी मिळविली आहे. काँग्रेसला 682 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. भाजपने मागील आर्थिक वर्षात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसप, माकप आणि भाकप यांच्या एकूण उत्पन्नापेक्षाही अधिक रक्कम प्राप्त केली आहे.
काँग्रेसचे उत्पन्न घटले
भाजपला देणगीस्वरुपात मिळालेले उत्पन्न मागील आर्थिक वर्षात 50 टक्क्यांनी वाढले तर काँग्रेसचे 25 टक्क्यांनी घटले आहे. भाजपला 2,555 कोटी रुपये इलेक्टोरल बाँडमधून तर 844 कोटी रुपये अन्य स्रोतांद्वारे प्राप्त झाले आहेत. भाजपने जाहिरातींवर 400 कोटी रुपये खर्च केले आहेत. 2018-19 आर्थिक वर्षामधील 299 कोटी रुपयांच्या तुलनेत हा आकडा अधिक आहे. पक्षाने इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांना 249 कोटी रुपये, मुद्रित प्रसारमाध्यमांना 47.7 कोटी रुपयांच्या जाहिराती दिल्या. भाजपने स्वतःचे नेते आणि उमेदवारांच्या हवाईप्रवासावर 250.50 कोटी रुपये खर्च केले आहेत.