Tarun Bharat

सर्व वयोगटातील पुणेकरांना कोविड प्रतिबंध लस विनामूल्य उपलब्ध करून द्या

  • भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पत्र


ऑनलाईन टीम / पुणे : 


राज्यातील कोरोनाची स्थिती हाताळण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. जबाबदारी घेण्यापेक्षा ती सर्वसामान्य जनतेवर ढकलण्याचा सरकारचा कल आहे. त्यामुळे पुण्यासारख्या शहरात कोरोनाची स्थिती हाताबाहेर जात आहे. लॉकडाऊन सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारी वर्गाचा विरोध आहे. आरोग्याची आणि आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. या गंभीर स्थितीचा विचार करून सर्व वयोगटातील पुणेकरांना कोरोना प्रतिबंध लस तातडीने विनामूल्य उपलब्ध करून द्यावी अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पत्र लिहून केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशातील एकूण कोरोना बाधित रूग्णांपैकी 71.69 टक्के रूग्ण महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांत आहेत. त्यातही पुणे शहरात गेल्या आठवड्यात रूग्ण वाढीचा वेग वाढला आहे. गेल्या 24 तासांत 1805 नागरिक नव्याने कोरोनाबाधित झाले. कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण 21 टक्के इतके मोठे आहे. त्यामुळे ही गंभीर स्थिती हाताळण्यासाठी सर्व वयोगटातील पुणेकर नागरिकांना तातडीने विनामूल्य कोविड प्रतिबंध लस द्यावी, असे मुळीक यांनी पत्रात म्हटले आहे.


कोरोनाचा वेगाने फ़ैलाव होत असताना त्याचा मुकाबला करण्यात राज्य शासनाचे प्रयत्न अतिशय तुटपुंजे आहेत. उपाययोजना करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेले नाही. सर्वसामान्य नागरिकांना, व्यापार्‍यांना, बारा बलुतेदारांना दिलासा देणारी कोणतीही घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा लॉकडाऊन करण्याकडे भर दिसतो. परंतु सामान्य नागरिक आणि व्यापार्‍यांचा लॉकडाऊनला तीव्र विरोध आहे. लॉकडाऊन झाल्यास सर्वांचीच आर्थिक स्थिती अतिशय हलाखीची होणार आहे. त्यामुळे व्यापार, उद्योग, माहिती-तंत्रज्ञान, शिक्षण आदी क्षेत्रांत आघाडीवर असणार्‍या पुणे शहराला मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा विचार करून सर्व वयोगटातील पुणेकर नागरिकांना तातडीने विनामूल्य कोविड लस उपलब्ध करून द्यावी आणि त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी मुळीक यांनी डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे.

Related Stories

वानखेडेंवर कारवाई झाली पाहिजे : गृहमंत्री

datta jadhav

११ एप्रिलला होणारी एमपीएससी परीक्षा पु़ढे ढकलली

Archana Banage

विवाहितेला मृतदेहाच्या हाडांची पावडर खाण्याची जबरदस्ती

datta jadhav

राष्ट्रपतींना भेटण्यापूर्वी सर्वपक्षीय प्रतिनिधी संभाजीराजेंच्या निवासस्थानी

Archana Banage

शिंदे गटानं संपर्कात असलेल्या खासदारांची नावं जाहीर करावी-अरविंद सावंत

Abhijeet Khandekar

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढी उपलब्ध

datta jadhav