Tarun Bharat

सहय़ाद्रि कारखान्यावर जिल्हा बँकेची खलबते

जिल्हय़ातील अनेक इच्छुकांनी घेतली सहकारमंत्र्यांची भेट; उमेदवारीची केली मागणी

प्रतिनिधी/ मसूर

सहकार क्षेत्रात अनेक पुरस्कार मिळवून देशात अग्रेसर असलेल्या सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. या बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारीसाठी अनेकांनी आपले देव पाण्यात घातले असून उमेदवारीबाबतची खलबते सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सह्याद्री कारखान्यावर सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. जिह्यातील अनेक ठिकाणांहून इच्छुक कार्यकर्ते उमेदवारीसाठी सहकारमंत्र्यांना भेटत असल्याचीही माहिती मिळाली आहे.

  खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मंत्री बाळासाहेब पाटील यांनी गेली 25 वर्षे सहकार क्षेत्रापासून राजकारणास सुरुवात केली. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व स्वर्गीय पी. डी. पाटील यांच्याकडून सहकाराचे बाळकडू मिळालेल्या बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या तत्त्वानुसार सह्याद्री साखर कारखाना उत्तम चालविला आहे. जिल्हा बँकेच्या उभारणीत व तिचा देशात नावलौकिक होण्यात आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय किसन वीर यांचे मोठे योगदान आहे. या बँकेच्या उभारणीपासूनच ही परंपरा कायम ठेवूनच वाटचाल चालू आहे. त्यामुळे या बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अचूक नियोजन व पारदर्शक कारभाराचा फायदा होणार आहे. बँकेची उमेदवारी मिळण्यासाठी सहकारमंत्र्यांकडे एक महिन्या पूर्वीपासून अनेक कार्यकर्ते संपर्कात राहून मागणी करत आहेत.

  बँकेसाठी सोसायटी मतदार संघातून प्रत्येक तालुक्यातून एक प्रतिनिधी, तालुका व जिल्हा खरेदी-विक्री संघातून एक प्रतिनिधी, दोन महिला प्रतिनिधी, भटक्या विमुक्तमधून एक प्रतिनिधी आणि अनुसूचित जाती-जमातीमधून एक प्रतिनिधी, कृषी उत्पादन प्रक्रिया संस्थांमधून एक, नागरी बँका व विविध संस्थांमधून एक, गृहनिर्माण दूध उत्पादक व इतर संस्थांमधून एक, औद्योगिक ग्राहक संस्था व पाणीपुरवठा आदी संस्थांमधून एक व इतर मागासवर्गीयमधून एक अशा एकूण 21 प्रतिनिधींची निवड केली जाणार आहे. जिल्हय़ातील सर्वपक्षीय प्रमुख कार्यकर्त्यांनी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे उमेदवारी मिळण्यासाठी संपर्क चालू ठेवला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर या जिह्यातील राजकारण नेहमीच सहकारावर अवलंबून राहिले आहे. लोकांना रोजगार उपलब्ध झाल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे. त्यामुळे सातारा जिह्यातील सहकाराला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून जिह्यात असणाऱया विविध सहकारी संस्थांच्या भोवती राजकारण फिरत असल्याचे दिसून येत आहे.

  दरम्यान, सहकाराचा प्रदीर्घ अनुभव असलेले बाळासाहेब पाटील हे सर्व प्रमुख ज्येष्ठ नेत्यांना बरोबर घेवून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचाराने व अजितदादा पवार, रामराजे नाईक निंबाळकर, जयंत पाटील, सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हय़ातील सर्व आमदार, खासदार, पदाधिकारी, नेते व ज्येष्ठांना तसेच सहकारातील धुरिणांना सोबत घेऊन निवडणूक ही निर्विवादपणे पार पाडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

Related Stories

पाच दिवसानंतर रूग्णवाढ पुन्हा दोनशेच्या वर

datta jadhav

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन

Patil_p

चंदगड तालुक्यात दुसरे पोलीस स्टेशन उभारण्यासंदर्भात शासन सकारात्मक

Archana Banage

प्रशासनाने सातार्‍यात हेल्मेट सक्ती करु नये- आ. शिवेंद्रसिंहराजे

Archana Banage

पालिकेची अर्थसंकल्पीय सभा सोमवारी

datta jadhav

मिनीबस नदीत कोसळली; 5 ठार

Patil_p