Tarun Bharat

सांगलीच्या अभियंत्यांची `इलेक्ट्रिक डिलिव्हरी स्कूटर’ निर्मिती

केंद्राच्या स्टार्टअप योजनेचे मिळाले बळ पुण्यात यशस्वी चाचणी
फुड डिलेव्हरीतील नामवंत कंपन्यांना ट्रायलसाठी १०० गाड्या देणार

संजय गायकवाड / सांगली :

नोकरी नाही म्हणून हातपाय गाळणारे आणि उच्च शिक्षणानंतर चांगल्या पगाराची नोकरी मिळाली नाही म्हणून निराश होणारे अनेकजण आढळतात. पण चांगल्या पगाराची नोकरी असतानाही काही तरी वेगळे करण्याची जिद्द बाळगून असलेल्या सांगलीतील विशाल माळी आणि सुबोध करुणासागर या अभियंत्यांनी संपूर्ण स्वदेशी बनावटीची `इलेक्ट्रिक डिलिव्हरी स्कूटर’ तयार केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या बहुचर्चित स्टार्टअप योजनेअंतर्गत अशा प्रकारच्या गाडया बनविण्यासाठी केंद्राकडून या युवा अभियंत्यांना १० लाखाचा निधी मिळाला आहे.

सुबोध करुणासागर आणि विशाल माळी

घोडावत अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल विभागातून बीई झालेल्या विशाल माळी याला लार्सन ऍन्ड टुब्रोच्या गुजरात येथील प्लॉन्टमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. तर सुबोध करुणासागर याने एमटेकसाठी चेन्नई येथील आयआयटीमध्ये प्रवेश घेतला. पण काही तरी वेगळे करण्याची संकल्पना मनात घोळत असलेल्या विशाल व सुबोधने एकत्र येत इलेक्ट्रिक बाईकच्या क्षेत्रात पाऊल टाकण्याचा धाडसी निर्णय घेतला. स्टार्टअप उद्योगात अनेकजण येतात. पण योग्य मार्गदर्शन व बाजारपेठेची माहिती नसल्याने यातील बहुतांश स्टार्टअप उद्योग काही महिन्यात बंद पडतात. पण मुळात अभियंते असणाऱ्या या दोघांनी जे काही करायचे ते तडीस न्यायचे असा चंग बांधत इलेक्ट्रिक बाईक उद्योगात उतरण्याचे ठरविले. कोरोना संकट काळात व प्रचंड प्रमाणात वाढलेल्या ऑनलाईनच्या जमान्यात इलेक्ट्रिक बाईक बनविणाऱ्या अनेक बड्या कंपन्यांनी भारतात उत्पादन सुरू केले आहे. पण यातील बऱ्याच कंपन्या या डिलिव्हरीसाठी लागणाऱ्या वेगळ्या इलेक्ट्रिक बाईक बनवित नाहीत. नेमका हाच मुद्दा पकडत विशाल व सुबोध यांनी इलेक्ट्रिक डिलिव्हरी स्कूटर बनविण्याचे ठरविले.

वास्तविक इलेक्ट्रिक बाईकसाठी लागणाऱ्या बॅटरीज तयार करण्याच्या उद्योगात हे दोघेजण 2017 पासून काम करत होते. त्यापुढे जावून त्यांनी इलेक्ट्रिक बाईकमध्ये डिलिव्हरी स्कूटर बनविण्याच्या क्षेत्रात पाऊल टाकले. कोणताही नवीन उद्योग सुरू करताना कल्पना असून चालत नाही. त्यासाठी भांडवल, जागा, कुशल मनुष्यबळ आणि बाजारपेठेची माहिती असावी लागते. अशा प्रकारच्या गाड्या तयार करण्यापूर्वी विशाल व सुबोधने या सगळया गोष्टींचा अभ्यास केला.

या प्रवासामध्ये त्यांना पुण्याच्या सायन्स टेक्नॉलॉजी पार्कसह डॉ. राजेंद्र जगदाळे, विक्रम सराफ व श्रीधर करंदीकर, नलिन अग्रवाल व प्रताप राजू यांची मदत झाली. पुण्यामध्ये गाड्या तयार करत असताना अभिजीत धर्माधिकारी, अभिनिल माळी व उमेश म्हारगुडे यांच्या मदतीने इंडस्ट्रीज डिझाईन, बॅटरी आणि व्हेईकल प्रेम हे कोअर टीमचे सदस्यही बरोबर होते. टेस्ला या जगप्रसिद्ध कार निर्मिती कंपनीतील मनोज खुराणा यांचेही त्यांना चांगले मार्गदर्शन मिळाले. यासाठी त्यांना केंद्राच्या स्टार्टअप योजनेतून अटल इनोव्हेशन मिशनअंतर्गत दहा लाखाचा निधीही मिळाला.

विशाल व सुबोध यांनी इलेक्ट्रिक बाईकमध्ये एडी 100 या नाममुद्रेतील 125 सीसीची इलेक्ट्रिक डिलिव्हरी स्कूटर बनविली. या स्कूटरची पुण्यात यशस्वी चाचणी घेण्यात आली. झोमॅटो, फिल्पकार्ट, बिगबास्केट, रेबेल फुडस, फासोस आदी कंपन्यांनी या डिलिव्हरी स्कूटरमध्ये रुची दाखविली आहे. पायलट प्रोजेक्टअंतर्गत देशभरातील प्रमुख 12 वितरणामार्फत येत्या दिवाळीपर्यंत फुड डिलिव्हरी  कंपन्याना 100  गाडÎा ट्रायलसाठी पुरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इलेक्ट्रिक डिलिव्हरी स्कूटरची वैशिष्टे

अशनी कंपनीच्या ई डिलिव्हरी स्कूटरची रनिंग कॉस्ट १० पैसे प्रती कि.मी. इतकी कमी आहे. काळा व निळ्या रंगात या गाड्या उपलब्ध होणार असून गाडीचा वेग ताशी ६५ कि.मी आहे. बॅटरी लाईफ टाईम आहे. तिला पाच वर्षाची वॉरंटी दिली जाते. गाडीची किंमत सरासरी ८४ हजार ते ९० हजाराच्या आसपास आहे. पर्यावरण पूरक या गाडीवरुन २५० ते ३७३ किलोपर्यंतचे वजन वाहून नेण्याची क्षमता आहे. गाडीला जीपीएसच्या धर्तीवर इलेक्ट्रिक व्हेईकल इंटोलिजन्स प्लॅटफॉर्मची यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे गाडीचे लोकेशन समजते. जून २०२२ पर्यंत कंपनीकडून ५०० गाड्यांची निर्मिती करण्यात येणार असून यूके महाराष्ट्र मोबिलिटी युनोवेशन या उपक्रमाअंतर्गत या कंपनीकडून युरोपमध्ये गाड्या निर्यात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

सोमवारी उडुपीमध्ये शाळा, पीयू महाविद्यालये बंदच राहणार

Archana Banage

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

Tousif Mujawar

शोपियां चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; शोधमोहीम सुरूच

datta jadhav

जम्मू पोलिसांनी पाडला आयईडीने भरलेला पाकिस्तानी ड्रोन

datta jadhav

पाच जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह; नऊ अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल

Archana Banage

महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

datta jadhav
error: Content is protected !!